आखाती देशांत अडकलेल्या भारतीयांसाठी 'रेस्क्यू' मिशन! आज ५८ विशेष विमाने भरणार उड्डाण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या लष्करी संघर्षामुळे आखाती देशांतील (Middle East) विमान वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर, तिथे अडकलेल्या हजारो भारतीय प्रवाशांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय विमान कंपन्या आज (४ मार्च २०२६) आखाती देशांसाठी ५८ विशेष उड्डाणे (Flights) चालवणार आहेत.

या ५८ उड्डाणांमध्ये इंडिगोची ३० आणि एअर इंडियासह एअर इंडिया एक्सप्रेसची २३ उड्डाणे समाविष्ट आहेत. याशिवाय स्पाईसजेट आणि आकासा एअर देखील काही विशेष फेऱ्या चालवणार आहेत. मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र (Airspace) बंद असल्यामुळे आतापर्यंत भारतीय कंपन्यांची १,२२१ आणि परदेशी कंपन्यांची ३८८ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणि अडकलेले लोक पाहता, सरकारने विमान कंपन्यांना अतिरिक्त क्षमता वापरण्याचे आदेश दिले आहेत.

पर्यायी मार्गांचा वापर

इराण आणि इस्रायलच्या आकाशातून प्रवास करणे सध्या धोक्याचे आहे. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांनी 'कॅलिब्रेटेड ॲडजस्टमेंट' म्हणजेच नियोजित बदल केले आहेत. ही विमाने आता प्रतिबंधित हवाई क्षेत्र टाळून लांबच्या पर्यायी मार्गाने प्रवास करत आहेत. यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असला तरी प्रवाशांची सुरक्षितता हीच सरकारची प्राथमिकता असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

तिकीट दरांवर सरकारची करडी नजर

अशा संकटकाळी विमान तिकिटांच्या दरांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असते. मात्र, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ते विमान कंपन्यांच्या संपर्कात असून तिकीट दरांवर सतत लक्ष ठेवले जात आहे. कोणत्याही विमान कंपनीने प्रवाशांची अडवणूक करू नये आणि रिफंड किंवा रिशेड्युलिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावास देखील दुबई, दोहा, मस्कत आणि जेद्दाह सारख्या शहरांमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या सतत संपर्कात आहेत. त्यांना जेवण, राहण्याची सोय आणि प्रवासाची माहिती देण्यासाठी हेल्प डेस्क कार्यान्वित करण्यात आले आहेत.