टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर ८ फेरीतील अत्यंत महत्त्वाच्या आणि 'करो या मरो'च्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा ५ गडी राखून पराभव केला आहे. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर रंगलेल्या या सामन्यात संजू सॅमसन भारताच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. संजूने ५० चेंडूंत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ९७ धावांची खेळी करत भारताला दिमाखात उपांत्य फेरीत (Semi-final) पोहोचवले आहे.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने २० षटकांत ४ गडी गमावून १९५ धावांचे तगडे आव्हान भारतासमोर ठेवले होते. विंडीजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक ४० धावा केल्या, तर जेसन होल्डर (३७*) आणि रोव्हमन पॉवेल (३४*) यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत धावसंख्या १९० च्या पार नेली. भारताकडून जसप्रीत बुमराहने २ बळी घेत विंडीजच्या धावसंख्येला लगाम घालण्याचा प्रयत्न केला.
१९६ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा (१०) आणि इशान किशन (१०) स्वस्त्यात बाद झाले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसनने कर्णधार सूर्यकुमार यादव (१८) सोबत डाव सावरला. सूर्या बाद झाल्यानंतरही संजूने आपला आक्रमक पवित्रा सोडला नाही. त्याने टिळक वर्मा (२७) आणि हार्दिक पांड्या (१७) यांच्या साथीने भारताला विजयाच्या जवळ नेले.
अखेरच्या षटकात विजयासाठी ७ धावांची गरज असताना संजूने पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत ४ चेंडू राखून भारताला विजय मिळवून दिला. या खेळीसह संजूने टी-२० वर्ल्ड कपमध्ये यशस्वी पाठलाग करताना सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विराट कोहलीचा विक्रमही मोडीत काढला. कोहलीने यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध ८२ धावांची नाबाद खेळी केली होती.
भारताचा हा वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला आहे. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले असून, आता ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. संजू सॅमसनला त्याच्या ऐतिहासिक खेळीसाठी 'सामनावीर' (Player of the Match) पुरस्काराने गौरवण्यात आले.