IPL 2026 : समीर रिझवीने खिंड लढवत दिल्ली कॅपिटल्सला काढले पराभवाच्या छायेतून बाहेर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
समीर रिझवी
समीर रिझवी

 

समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यातील अभेद्य भागीदारीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चालू इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आपल्या पहिल्याच सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर ६ गडी राखून मात केली. बुधवारी भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडला.

लखनऊने १८.४ षटकांत १४१ धावा केल्यावर हा सामना कमी धावसंख्येचा असूनही अटीतटीचा होईल असे वाटत होते. मात्र, दिल्लीच्या मधल्या फळीने चिकाटी दाखवत १७ चेंडू राखून विजय खेचून आणला. आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली होती, परंतु समीर रिझवी (४७ चेंडूंत ७० धावा) आणि ट्रिस्टन स्टब्स (३२ चेंडूंत ३९ धावा) यांनी सामन्याचे चित्र पालटले.

दिल्लीच्या डावाची सुरुवात धक्कादायक झाली. लखनऊकडून पदार्पण करणाऱ्या मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर के.एल. राहुलला शून्यावर बाद केले. त्यानंतर लगेचच मोहसिन खानने नितीश राणाला (१५) बाद केले. प्रिन्स यादवने एकाच षटकात दोन बळी मिळवले. यात कर्णधार अक्षर पटेलला शून्यावर बाद करून त्याने दिल्लीची स्थिती ५ षटकांत ३०/४ अशी दयनीय केली होती.

अशा कठीण प्रसंगी समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स एकत्र आले. या जोडीने सुरुवातीला सावध पवित्रा घेतला आणि नंतर गिअर बदलला. रिझवीने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ३७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने स्टब्ससोबत ७६ चेंडूंत ११९ धावांची नाबाद भागीदारी करून यजमानांच्या हातून सामना हिरावून घेतला. लखनऊच्या मोहसिन खान (४ षटकांत १/१९) आणि पदार्पण करणाऱ्या प्रिन्स यादवने (३ षटकांत २/२०) चांगली गोलंदाजी केली, तरीही १४२ धावांचे लक्ष्य रिझवी आणि स्टब्सच्या संयमी खेळीसमोर छोटे ठरले.
दिल्ली कॅपिटल्सने आता आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध सलग पाच विजय मिळवले आहेत. सनरायझर्स हैदराबाद (२०२०-२०२३) आणि राजस्थान रॉयल्स (२०१८-२०२०) नंतर दिल्लीने सलग पाच सामने जिंकलेला लखनऊ हा तिसरा संघ ठरला आहे.

समीर रिझवीला त्याच्या मॅच-विनिंग खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामन्यानंतर रिझवीने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षकांचा पाठिंबा आणि घरच्या परिस्थितीच्या अभ्यासाला दिले. तो म्हणाला, "सराव सत्रात मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगण्यात आले होते आणि प्रशिक्षकांकडून खूप पाठिंबा मिळाला. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा झाला, कारण माझी स्टेट लीग येथेच होते. मला पॉवरप्लेमध्ये आक्रमक खेळायचे होते, पण दोन गडी बाद झाल्याने परिस्थिती बदलली. स्टब्सने मला परिस्थितीनुसार खेळण्याचा सल्ला दिला. एकदा खेळपट्टीचा अंदाज आल्यावर आम्ही आमचा नैसर्गिक खेळ खेळू शकलो. मी ५० धावा पूर्ण झाल्यावरच फटकेबाजी सुरू केली असे नाही. मला खराब चेंडूवर प्रहार करायचा होता आणि तशी संधी मिळताच मी चेंडू सीमारेषेपलीकडे धाडला."

तत्पूर्वी, लखनऊचा डाव १४१ धावांवर आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनऊसाठी ऋषभ पंत आणि मिचेल मार्श सलामीला आले होते. या जोडीने चांगली सुरुवात केली होती, पण पंतच्या दुर्दैवी धावबाद होण्याने गड्यांची रांग लागली. मार्शने मारलेला सरळ फटका मुकेश कुमारच्या हाताला लागून यष्ट्यांना जाऊन धडकला. यावेळी पंत क्रिजच्या बाहेर असल्याने त्याला बाद व्हावे लागले. एडन मार्करमने एक षटकार आणि चौकार मारला खरा, पण अक्षर पटेलने त्याला त्रिफळाचीत केले. 

टी. नटराजनने आयुष बदोनीला स्वस्त्यात बाद केले. निकोलस पूरन दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही आणि लुंगी एनगिडीच्या चेंडूवर झेलबाद झाला. मिचेल मार्शची २८ चेंडूंत ३५ धावांची झुंजार खेळी कुलदीप यादवने संपवली. त्याने मुकुल चौधरीलाही बाद केले. अब्दुल समदने २५ चेंडूंत ३६ धावा केल्या आणि शाहबाज अहमदसोबत (नाबाद १५) सातव्या गड्यासाठी ३३ धावा जोडल्या. लुंगी एनगिडीने तळाच्या फलंदाजांना बाद करून लखनऊचा डाव १४१ धावांवर रोखला. दिल्लीसाठी एनगिडी आणि नटराजन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर कुलदीप यादवने दोन बळी मिळवले. कर्णधार अक्षर पटेलनेही मार्करमची महत्त्वाची विकेट घेतली.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -
Awaz Marathi WhatsApp Group 

Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter