IPL 2026 SRH vs CSK: ईशान किशन आणि कमिन्सच्या जोरदार खेळीमुळे हैदराबादची प्लेऑफमध्ये धडक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 21 h ago
चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई सुपर किंग्स

 

पॅट कमिन्सची भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर ईशान किशनने झळकावलेल्या ७० धावांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सवर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह हैदराबादने आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.

चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर १८१ धावांचे आव्हान गाठणे सोपे नव्हते. मात्र, ईशान किशनने ४७ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७० धावांची खेळी केली. त्याला हेनरिक क्लासेनची (२६ चेंडूंत ४७ धावा) उत्तम साथ मिळाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत हैदराबादला १९ षटकांत ५ बाद १८१ धावांपर्यंत पोहोचवले.

हैदराबाद आणि गुजरातचे प्लेऑफमध्ये तिकीट

या विजयामुळे हैदराबादचे १६ गुण झाले असून त्यांनी प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे. त्यांच्या या विजयाचा फायदा गुजरात टायटन्सलाही झाला असून, १६ गुणांसह तेही बाद फेरीत पोहोचले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (१८ गुण) यापूर्वीच प्लेऑफमध्ये पोहोचले असल्याने आता उर्वरित एका जागेसाठी इतर संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे, १३ सामन्यांत १२ गुण असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान अद्याप पूर्णपणे संपुष्टात आलेले नाही.

तत्पूर्वी, हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड लवकर माघारी परतला, तर अभिषेक शर्मालाही सूर गवसला नाही. त्याने २१ चेंडूंत केवळ २६ धावा केल्या. पॉवर प्लेमध्ये हैदराबादला केवळ १ बाद ४५ धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, नूर अहमदच्या गोलंदाजीवर १८ धावांवर जीवदान मिळालेल्या क्लासेनने ईशान किशनसोबत मिळून सामन्याचे चित्र पालटले. या जोडीने अकिल होसेन आणि नूर अहमद या चेन्नईच्या फिरकीपटूंचा समर्थपणे सामना केला.

कमिन्सच्या माऱ्यापुढे चेन्नईची अडखळती खेळी

सामन्याच्या सुरुवातीला चेन्नईने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. संजू सॅमसनने नितीश कुमार रेड्डीला सलग ६, ४, ४ असे फटके मारून पहिल्याच षटकात १७ धावा वसूल करत चेन्नईला धडाकेबाज सुरुवात करून दिली होती. प्रफुल्ल हिंगेच्या षटकातही त्याने सलग तीन चौकार मारले. मात्र, तिसऱ्या षटकात गोलंदाजीला आलेल्या कर्णधार पॅट कमिन्सने सॅमसनला बाद करत चेन्नईला मोठा धक्का दिला.

त्यानंतर रुतुराज गायकवाड (२१ चेंडूंत १५ धावा) आणि कार्तिक शर्मा (१९ चेंडूंत ३२ धावा) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण कमिन्सने कार्तिक आणि गायकवाड दोघांनाही तंबूचा रस्ता दाखवला. डेवाल्ड ब्रेव्हिस (२७ चेंडूंत ४४ धावा) आणि शिवम दुबे (२६ धावा) यांच्यामुळे चेन्नईला ७ बाद १८० धावांपर्यंत पोहोचता आले. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने २८ धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेतले.