भारतातील अजमेर शरीफचे हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती (र.) यांच्या पवित्र दर्ग्याचे २६ वे गादीनशीन आणि चिश्ती फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी 'कॅनडा लिटरेचर फेस्टिव्हल (CLF) २०२६' मध्ये हजेरी लावली. १३ ते १८ मे दरम्यान कॅनडातील मिसिसागा आणि टोरंटो शहरात हा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
त्यांच्या या उपस्थितीमुळे भारताचा ८०० वर्षांचा महान सुफी वारसा आणि कॅनडाची बहुसांस्कृतिक मूल्यं एकाच वेळी एकाच मंचावर आली. त्यांनी आंतरधर्मीय चर्चासत्रांमध्ये भाग घेतला. तसेच सुफी कविता आणि अध्यात्मावर विशेष मार्गदर्शन केलं. यातून शांतता, एकता आणि आंतरधर्मीय सामंजस्याचा जागतिक संदेश देण्यात आला.
हाजी सय्यद सलमान चिश्ती यावेळी म्हणाले, "चिश्ती सुफी परंपरेने गेली ८०० वर्षं एकच शिकवण दिलीय. निर्मितीवर बिनशर्त प्रेम करणं आणि सेवा करणं, हाच ईश्वराकडे जाण्याचा खरा मार्ग आहे. अजमेर शरीफमधील ख्वाजा गरीब नवाज यांच्या पवित्र दर्ग्यापासून ते लेक ओंटारियोच्या किनाऱ्यापर्यंत आमचा एकच संदेश आहे - 'सर्वांवर प्रेम, कोणाविषयीही द्वेष नाही'."

भारत-कॅनडा संबंधांना सांस्कृतिक जोड
या विशेष कार्यक्रमांना कॅनडातील भारताचे उच्चायुक्त दिनेश के. पटनायक आणि टोरंटोतील भारताचे महावाणिज्यदूत महावीर सिंघवी आवर्जून उपस्थित होते. दिनेश के. पटनायक तिथे बोलताना म्हणाले की, "कॅनडा लिटरेचर फेस्टिव्हलसारखं व्यासपीठ हे दाखवून देतं की, आंतरधर्मीय शांतता आणि सौहार्द हाच द्विपक्षीय संबंधांचा खरा पाया आहे. भारताची गूढ परंपरा आणि आध्यात्मिक संस्कृती बहुलवाद आणि परस्पर आदराच्या मूल्यांवर उभी आहे. भारत आणि कॅनडा आम्ही दोन्ही राष्ट्र हीच मूल्यं मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत." तर महावीर सिंघवी म्हणाले, " कॅनडा लिटरेचर फेस्टिव्हल २०२६ मध्ये दिसलेली एकता भारत-कॅनडा द्विपक्षीय संबंधांचं खरं सार दर्शवते."
या दोघांच्या उपस्थितीने भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी सांस्कृतिक मुत्सद्देगिरीचं महत्त्व अधोरेखित झालं.
'सीकिंग द इन्फिनिट' पुस्तकाचं प्रकाशन
याकोब मॅथ्यू यांच्या 'सीकिंग द इन्फिनिट: महाकुंभ २०२५' या बहुचर्चित पुस्तकाचं प्रकाशन या महोत्सवाचं मुख्य आकर्षण ठरलं. या पुस्तकात जगभरातील ५० हून अधिक जागतिक विचारवंतांचे विचार संकलित केले आहेत. टोरंटोमधील भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर आंतरधर्मीय संवाद आणि आध्यात्मिक एकतेवर यावेळी मोठी चर्चा रंगली.
"अनंत म्हणजे इन्फिनिट हे पोहोचण्याचं ठिकाण नाही, तर ते एक लक्षात ठेवण्याचं सत्य आहे. तुमच्या आत एक अमर्याद क्षितिज दडलेलं आहे. टोरंटोमधील या मेळाव्याने हे सिद्ध केलंय की, अनंताचा शोध कोणत्याही मानवनिर्मित सीमा मानत नाही." अशी याकुब मॅथ्यू यांची प्रतिक्रिया होती.

मिसिसागा येथील अपोलो कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 'अ कॉन्फ्लुएन्स ऑफ फेथ्स: सीकिंग द इन्फिनिट' या विषयावर एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. यात हाजी सय्यद सलमान चिश्ती प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. केंब्रिज विद्यापीठाचे प्रसिद्ध प्राध्यापक प्रभू गुप्तारा यांनी या सत्राचं सूत्रसंचालन केलं. याकुब मॅथ्यू, लामा आरिया ड्रोल्मा, राकेश कौल आणि हॅरी मान यांसारख्या मान्यवरांनीही यात सहभाग घेतला.
तसेच, मिसिसागा येथील प्रसिद्ध 'नोएल रायन थिएटर'मध्ये हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी सुफी कवितांचा एक बहारदार कार्यक्रम सादर केला. यामुळे कॅनडातील प्रेक्षकांना चिश्ती सुफी परंपरेचा आणि गूढवादाचा थेट अनुभव घेता आला.
कॅनडा लिटरेचर फेस्टिव्हल २०२६चे आयोजक अजय मोदी म्हणाले की, "वंश, भाषा, धर्म आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून ज्ञान आणि संवादाचा उत्सव साजरा करण्यासाठी कॅनडा लिटरेचर फेस्टिव्हलची स्थापना झाली. असे साहित्य महोत्सव हे आंतरधर्मीय शांतता आणि जागतिक सामंजस्याचं एक प्रभावी साधन बनू शकतात, हे या महोत्सवानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय."
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter