DIWALI IN USA: अमेरिकन टपाल विभागातर्फे दिवाळीचे टपाल तिकीट जाहीर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 2 h ago
अमेरिकन टपाल विभागातर्फे दिवाळीनिमित्त प्रसिद्ध झालेले विशेष टपाल तिकीट
अमेरिकन टपाल विभागातर्फे दिवाळीनिमित्त प्रसिद्ध झालेले विशेष टपाल तिकीट

 

वॉशिंग्टन 

भारतीय संस्कृती आणि सणांचा प्रभाव आता जागतिक स्तरावर उमटतो आहे. अमेरिकेच्या 'यूएस पोस्टल सर्व्हिस' (USPS) ने यंदाच्या दिवाळी सणानिमित्त एक खास टपाल तिकीट प्रसिद्ध करण्याची घोषणा केली आहे. या टपाल तिकिटावर रांगोळीचे एक सुंदर नक्षीकाम रेखाटण्यात आले आहे.

रांगोळीची जागतिक ओळख

या टपाल तिकिटासाठी वापरण्यात आलेली रांगोळी ह्युस्टनस्थित भारतीय कलाकार संगीता भुतडा यांनी तयार केली आहे, तर त्याचे छायाचित्रण विनय दीक्षित यांनी केले आहे. रांगोळी ही शुभ मानली जाणारी कला आहे, हे यूएस पोस्टल सर्व्हिसने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. रंगीत तांदळाची पावडर, खडू आणि फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून ही कलाकृती तयार करण्यात येते, असेही त्यांनी नमूद केले. हे टपाल तिकीट जेनिफर अर्नोल्ड यांनी डिझाइन केले असून, ऑक्टोबर महिन्यात ते अधिकृतरीत्या प्रसिद्ध केले जाणार आहे.

हिंदू कॅलेंडरमधील महत्त्वाचा सण

यूएस पोस्टल सर्व्हिसने दिवाळीचे महत्त्व सांगताना म्हटले की, हा हिंदू कॅलेंडरमधील अत्यंत महत्त्वाचा सण आहे, जो असत्यावर सत्याचा विजय साजरा करतो. दिवाळी साधारणपणे पाच दिवस साजरी केली जाते आणि २०२६ मध्ये या सणाचा मुख्य दिवस ८ नोव्हेंबरला आहे. दिवाळीसोबतच अमेरिकन टपाल विभागाने ख्रिसमस, हनुक (ज्यू सण) आणि क्वान्झा (आफ्रिकन-अमेरिकन संस्कृतीचा सण) यांसारख्या विविध सणांवर आधारित टपाल तिकिटेही प्रसिद्ध करण्याची घोषणा केली आहे.



Latest News