अमीर सुहैल वानी
भगवद्गीता सर्वात प्राचीन धर्मग्रंथांपैकी एक आहे. हा ग्रंथ सनातन धर्मापुरता मर्यादित नाही. कर्तव्य, नैतिकता, आत्म-साक्षात्कार आणि व्यक्ती व देव यांच्यातील संबंधांवरचा हा मानवजातीचा महान संवाद आहे. गीतेची मुळं भारताच्या आध्यात्मिक मातीत रुजलेली आहेत. तरीही या ग्रंथाने धर्म, भूगोल आणि संस्कृतीच्या सीमा कित्येकदा ओलांडल्या आहेत. विविध पार्श्वभूमीच्या वाचकांना या ग्रंथाने सतत आकर्षित केलं आहे.
या प्रदीर्घ इतिहासात एक लक्षवेधी अध्याय आहे. मुस्लिम विद्वान, सूफी संत, अनुवादक आणि विचारवंतांनी गीतेचा सखोल अभ्यास केला. त्यांनी पर्शियन आणि उर्दू भाषेत गीतेचे अनुवाद केले. तसेच गीतेच्या शिकवणीवर स्वतःचे तत्त्वज्ञानात्मक विचार मांडले. हे कार्य या असाधारण धर्मग्रंथाच्या वैश्विकतेचा चिरंतर पुरावा आहे.
मुस्लिम विद्वान या ग्रंथाला नैतिक आणि आध्यात्मिक (मेटाफिजिकल) ज्ञानाचा सखोल साठा मानत आले. काळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आणि अभ्यासपूर्ण अर्थ लावण्यासाठी हा ग्रंथ अतिशय योग्य असल्याचं मानत आले.
राजकुमार दारा शिकोह आणि पर्शियन अनुवाद
या अभ्यासाचे सर्वात जुने किंबहुना सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे सम्राट शाहजहानचा मोठा मुलगा राजकुमार दारा शिकोह हा होय. तुलनात्मक धर्माच्या इतिहासात दारा शिकोहला अद्वितीय स्थान आहे. इस्लामिक गूढवादाचा (विशेषतः इब्न अरबी आणि कादिरी सुफी पंथाच्या शिकवणीचा) त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.
इस्लाम आणि भारताच्या आध्यात्मिक परंपरा यांच्यात समन्वय साधण्यासाठी त्यांनी आपलं बरंचसं आयुष्य वेचलं. त्यांनी उपनिषदांचा 'सिर्र-ए-अकबर' (द ग्रेट सिक्रेट) या नावाने पर्शियन भाषेत अनुवाद केला. त्यांची ओळख या कार्यासाठी आहे. पण त्यांच्या बौद्धिक वर्तुळाने भगवद्गीतेच्या अभ्यासाला आणि अनुवादालाही मोठं प्रोत्साहन दिलं.
श्रीकृष्णाची तत्त्वज्ञानात्मक शिकवण म्हणजे आत्मा, अलिप्तता, भक्ती आणि परमात्मा यांच्या स्वरूपावरील सखोल विचार आहे, असे दारा मानत असे. त्यांचे हे प्रयत्न राजकीय फायद्यासाठी किंवा धार्मिक तडजोडीसाठी नव्हते. दैवी ज्ञानावर कोणाचीही मक्तेदारी असू शकत नाही, हा त्यांचा ठाम विश्वास होता. अनेक बाबतीत त्यांचे हे कार्य म्हणजे आधुनिक आंतरधर्मीय संवादाची पूर्वकल्पना होती.
भारतीय उपखंडाच्या बहुतांश भागात अनेक शतकांपासून पर्शियन भाषा प्रशासन, साहित्य आणि अभ्यासाची भाषा होती. त्यामुळेच अनेक मुस्लिम विद्वानांनी हिंदू धर्मग्रंथांचा पर्शियन भाषेत अनुवाद हाती घेणं स्वाभाविक होतं. या अनुवादांमुळे पूर्णपणे नवीन बौद्धिक क्षितिजं खुली झाली. यातून मुस्लिम विद्वानांना कर्म, धर्म, योग आणि मोक्ष यांसारख्या संकल्पनांचा थेट अभ्यास करणं शक्य झालं.
त्याच वेळी या अनुवादांनी इराण, मध्य आशिया आणि पर्शियन भाषिक जगाच्या इतर भागांतील विद्वानांना हिंदू तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली. अशा प्रकारे भगवद्गीता इस्लामिक तत्त्वज्ञान आणि सुफी अध्यात्माच्या व्यापक चर्चेचा महत्त्वाचा भाग बनला.
सुफी परंपरा आणि गीतेतील शिकवण
विशेषतः सुफी परंपरेने भारताच्या आध्यात्मिक वारशाबद्दल मोकळेपणा दाखवला. ज्ञान ही दैवी देणगी आहे. ती वेगवेगळ्या भूमीत आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये प्रकट होऊ शकते, असा अनेक सुफी विद्वानांचा विश्वास होता. प्रत्येक राष्ट्रात प्रेषित पाठवले गेल्याचं खुद्द कुराण सांगतं. अनेक मुस्लिम विचारवंतांनी या वैश्विक दृष्टिकोनाचा वेगळा अर्थ लावला. इतर संस्कृतींच्या नैतिक आणि आध्यात्मिक यशाचा अभ्यास करण्याचं ते मोठं निमित्त मानलं गेलं.
त्यामुळेच गीतेतील स्वयंशिस्त, अहंकाराचे शुद्धीकरण, ऐहिक इच्छांपासून अलिप्तता आणि देवाला पूर्ण शरण जाणे ही शिकवण अनेक सुफी विद्वानांना परिचयाची वाटली. या शिकवणीत आणि इस्लामिक गूढवादात (mysticism) वर्णन केलेल्या आध्यात्मिक मार्गात त्यांना मोठं साम्य आढळलं. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.
अंतर्गत परिवर्तनावर (बदलावर) भर देण्यात त्यांना आश्चर्यकारक साम्य दिसून आलं. अनेक सुफींसाठी स्वतःच्या वाईट प्रवृत्तींविरुद्धचा (lower self) संघर्ष हीच सर्वात मोठी लढाई होती. वासना, राग, आसक्ती आणि अहंकार यावर विजय मिळवण्याच्या भगवद्गीतेच्या सततच्या शिकवणीमध्ये या संकल्पनेचे मोठे पडसाद उमटलेले दिसतात.
उर्दूतील भगवद्गीता आणि नवल किशोर प्रेस
उत्तर भारताची मुख्य साहित्यिक भाषा म्हणून पर्शियनची जागा हळूहळू उर्दूने घेतली. तेव्हा मुस्लिम विद्वानांनी भगवद्गीतेचा उर्दूमध्ये अनुवाद करून ही परंपरा पुढे चालू ठेवली. यातील सर्वात आदरणीय नावांपैकी ख्वाजा दिल मुहम्मद हे होय. त्यांच्या अनुवादाने असंख्य उर्दू वाचकांना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाची स्पष्ट आणि सुंदर गद्यात ओळख करून दिली.
त्यांच्या या कार्यातून गीतेचा इस्लामिक चौकटीतून नव्याने अर्थ लावण्याचा किंवा तिची वेगळी तत्त्वज्ञानात्मक ओळख कमी करण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. याउलट या धर्मग्रंथाला अत्यंत प्रामाणिकपणे सादर करणे हा यामागील मुख्य उद्देश होता. तसेच गीतेचे सखोल नैतिक विचार अशा वाचकांपर्यंत पोहोचवणे हे ध्येय होतं. अन्यथा या वाचकांचा गीतेशी कधीही संबंध आला नसता.
अशा अनुवादांतून अनेक मुस्लिमांना मोठी गोष्ट समजली. गीता सर्वसामान्य मानवी प्रश्नांची उत्तरे देते. नैतिक अनिश्चिततेचा सामना करताना माणसाने कसं वागावं? दुःखातही ठाम कसं राहावं? कृती आणि त्याग यातील संबंध काय आहे? भीती, दुःख आणि निराशेवर मात कशी करावी? हे प्रश्न धार्मिक संलग्नतेच्या (धर्माच्या) सीमा ओलांडतात आणि प्रत्येक विचारी माणसाला मार्गदर्शन करतात.
एकोणिसाव्या शतकात लखनौच्या प्रसिद्ध 'नवल किशोर प्रेस'ने प्रकाशन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. यातून अनुवादाच्या या वाढत्या संस्कृतीला आणखी बळ मिळालं. हे प्रकाशन गृह संस्कृत, पर्शियन, अरबी आणि उर्दूतील उत्कृष्ट साहित्य छापण्याचं सर्वात मोठं केंद्र बनलं. ग्रंथांचे संपादन आणि अनुवाद करण्यासाठी तिथे अनेकदा वेगवेगळ्या धार्मिक समुदायांतील विद्वानांची नेमणूक केली जायची. इस्लामिक धर्मग्रंथ, पर्शियन कविता आणि शास्त्रीय साहित्यासोबत भगवद्गीतेसह इतर हिंदू धर्मग्रंथही तिथे प्रकाशित केले गेले. यातून असे बौद्धिक वातावरण तयार झाले. परस्परांकडून ज्ञानाची देवाणघेवाण झाली.
अशा संस्थांनी भारताच्या संमिश्र संस्कृतीचं उत्तम प्रतिनिधित्व केलं. तिथे विद्वानांचं मूल्यमापन त्यांच्या लेखकाच्या धार्मिक ओळखीवरून नाही, तर त्यांच्या बौद्धिक क्षमतेवरून केलं जायचं. भारताचा शास्त्रीय वारसा जतन करणं आणि त्याचा प्रसार करणं यासाठी हिंदू आणि मुस्लिम विद्वानांनी एकत्र काम केलं. दक्षिण आशियाई इतिहासातील सांस्कृतिक सहअस्तित्वाचं हे उत्तम उदाहरण आहे.
आधुनिक विचारवंत आणि गीतेचा प्रभाव
अनेक आधुनिक मुस्लिम विचारवंतांनीही भगवद्गीतेला जगातील सर्वात महान तत्त्वज्ञानात्मक ग्रंथांपैकी मानलं आहे. सय्यद अब्दुल लतीफ यांच्यासारख्या विद्वानांनी एका गोष्टीवर विशेष भर दिला. निःस्वार्थ कृती, नैतिक जबाबदारी, आंतरिक शिस्त आणि भक्ती यावरील गीतेच्या शिकवणीला वैश्विक महत्त्व आहे, असं ते म्हणाले.
त्याचप्रमाणे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि जामिया मिलिया इस्लामियाचे कुलगुरू मुहम्मद मुजीब यांनी अनेकदा आपला युक्तिवाद मांडला. भगवद्गीतेसह भारताच्या प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय भारतीय मुस्लिमांना आपली संस्कृती पूर्णपणे समजू शकणार नाही, असं ते नेहमी सांगत. दुसऱ्या धर्माच्या धर्मग्रंथाचा अभ्यास केल्याने आपल्या स्वतःच्या धर्माला धोका निर्माण होतो, हा विचार अशा विद्वानांनी पूर्णपणे नाकारला.
याउलट त्यांचा विचार अगदी वेगळा होता. खऱ्या ज्ञानामुळे धार्मिक श्रद्धा कमी होण्याऐवजी अधिक दृढ होते. पण अज्ञानामुळे नेहमी गैरसमज आणि पूर्वग्रह निर्माण होतात. त्यांच्या या अभ्यासवृत्तीतून मोठा बौद्धिक आत्मविश्वास दिसून येतो. आजच्या ध्रुवीकरण झालेल्या जगात हा आत्मविश्वास कितीतरी मौल्यवान आहे.
थेट अनुवादाचा अभाव होता, तिथेही मुस्लिम विचारवंतांवर गीतेचा प्रभाव असल्याचं स्पष्ट दिसून येतं. व्यापक तत्त्वज्ञानाच्या चर्चांमधून हे सहज लक्षात येतं. कवी-तत्त्वज्ञ मुहम्मद इक्बाल इस्लामिक धर्मशास्त्रातला किडा. तरीही त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाच्या अनेक पैलूंचं भरपूर कौतुक केलं. नैतिक सामर्थ्य, हेतुपूर्ण कृती आणि आध्यात्मिक आत्म-साक्षात्कारावर भर देणारा त्यांचा 'खुदी'चा सिद्धांत प्रसिद्ध आहे. या सिद्धांताची तुलना अनेकदा गीतेतील 'निष्काम कर्म' या शिकवणीशी केली जाते. वैयक्तिक फळाची अपेक्षा न करता आपलं कर्तव्य पार पाडणं, हा या शिकवणीचा अर्थ आहे.
या दोन्ही व्यवस्थांमध्ये महत्त्वाचे धार्मिक मतभेद नक्कीच आहेत. पण दोघेही दैववाद आणि निष्क्रियपणे हार मानणं नाकारतात. माणसाने धैर्य, शिस्त आणि देवावरील अतूट विश्वासाने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असं आवाहन दोघेही करतात. या समानतांमधून मोठी गोष्ट स्पष्ट होते. धार्मिक परंपरांचा मूळ पाया वेगळा असला, तरी त्यांच्यातून सखोल नैतिक विचार अनेकदा समानच असतात. त्यामुळेच मुस्लिम विद्वानांनी केलेले भगवद्गीतेचे अनुवाद हे परस्पर आदर, बौद्धिक कुतूहल आणि आध्यात्मिक विनम्रतेवर आधारित संस्कृतीचे मोठे प्रतीक आहेत.
भगवद्गीता हिंदूंच्या भक्तीला आणि तत्त्ववेत्त्यांच्या शोधाला नेहमीच प्रेरणा देत असते. राजकारण्यांच्या नैतिकतेला, मानवी मन समजून घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञांना आणि जीवनाचा अर्थ शोधणाऱ्या कोणत्याही पार्श्वभूमीच्या साधकांना गीता नेहमीच दिशा दाखवते. नामांकित मुस्लिम विद्वानांनी या उल्लेखनीय ग्रंथाचं भाषांतर करण्यासाठी आणि त्याचा अर्थ लावण्यासाठी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षं वेचली. हा या ग्रंथाच्या वैश्विकतेचा सर्वात भक्कम पुरावा आहे.
भाषा, संस्कृती आणि पंथाच्या सीमा ओलांडण्याची ज्ञानाची ताकद चिरंतर असते. आपली प्रार्थना करण्याची आणि आपल्या श्रद्धा व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. पण सत्य, न्याय, आत्मसंयम आणि ईश्वराचा शोध हा सर्वांचा सामायिक वारसा आहे. ही गोष्ट यातून पुन्हा पुन्हा स्पष्ट होते.