Vaibhav Sooryavanshi : ख्रिस गेलचा 'तो' मोठा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
वैभव सूर्यवंशी
वैभव सूर्यवंशी

 

१५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आपल्या अद्भूत फलंदाजीने प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध केले आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या ३८ चेंडूत ९३ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याच्या या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २२१ धावांचे कठीण आव्हान अवघ्या ७ गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. 

या दणदणीत विजयामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत अत्यंत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. पुढच्या महिन्यात भारतीय वरिष्ठ संघासोबत डब्लिन दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज असलेल्या वैभवने या सामन्यात १० गगनचुंबी षटकार ठोकले.

मिचेल मार्शची झुंजार खेळी ठरली अपुरी
यापूर्वी फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सने निर्धारित २० षटकात ५ बाद २२० धावांचा डोंगरासारखा पल्ला उभारला होता. लखनऊकडून मिचेल मार्शने ५७ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकांरांच्या मदतीने ९६ धावांची वादळी खेळी केली. चालू हंगामात तिसऱ्यांदा ९० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या मार्शला जोस इंग्लिसच्या ६० धावांची चांगली साथ मिळाली. 

या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या ८ षटकात १०९ धावांची भागीदारी केली. मात्र, शेवटच्या षटकात जोफ्रा आर्चरने अचूक गोलंदाजी करत केवळ ५ धावा दिल्या आणि मार्शला शतकापासून वंचित ठेवले, ज्यामुळे राजस्थानच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

वैभव सूर्यवंशीचे मयंक यादवच्या ओव्हरमध्ये २९ धावांचे तांडव
२२१ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने लखनऊच्या गोलंदाजांची पुरती दाणादाण उडवून दिली. आयपीएल २०२४ मध्ये भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून नावारूपास आलेल्या मयंक यादवच्या एकाच षटकात वैभवने तब्बल २९ धावा कुटल्या. वैभवचे ख्रिस गेलच्या एका हंगामात सर्वाधिक ५९ षटकार ठोकण्याचा विक्रम मोडण्याचे लक्ष्य आता अगदी जवळ आले असून त्याने चालू हंगामात ५३ षटकार पूर्ण केले आहेत. 

वैभव अवघ्या ७ धावांनी आपल्या शतकापासून मुकला असला तरी त्याने राजस्थानचा विजय सोपा केला होता. त्यानंतर ध्रुव जुरेलने ३८ चेंडूत नाबाद ५३ धावा करत संघाला विजयाच्या पार नेले. आता राजस्थान रॉयल्सला प्ले-ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्सविरुद्धचा शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे.