मेक्सिको सिटी
मेक्सिकोच्या फुटबॉल संघाने फिफा वर्ल्ड कपमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवत तब्बल ४० वर्षांचा नॉकआउट सामन्यातील विजयाचा दुष्काळ संपवला आहे. मंगळवारी रात्री खेळल्या गेलेल्या सामन्यात मेक्सिकोने इक्वेडोरचा २-० असा पराभव करत 'राउंड ऑफ १६' मध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. या विजयामुळे मेक्सिकन चाहत्यांचा गेल्या चार दशकांपासून असलेला नॉकआउट सामन्यातील पराभवाचा सिलसिला खंडाला आहे.
सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये जूलियन क्विनोनेस आणि राऊल जिमेनेझ यांनी ९ मिनिटांच्या अंतरात दोन गोल करत मेक्सिकोला मजबूत आघाडी मिळवून दिली. क्विनोनेसने २२ व्या मिनिटाला पहिला गोल केला, तर ३१ व्या मिनिटाला जिमेनेझने गोल करत संघाची स्थिती भक्कम केली. १९८६ मध्ये स्वदेशात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये बल्गेरियाविरुद्ध नॉकआउट सामना जिंकल्यानंतर मेक्सिकोला नॉकआउटमध्ये विजय मिळवता आला नव्हता. योगायोगाने, सध्याचे प्रशिक्षक जेविअर अग्युएरे हे १९८६ च्या त्या ऐतिहासिक संघात खेळाडू म्हणून मैदानात होते.
विजयानंतर भावनिक झालेल्या प्रशिक्षक जेविअर अग्युएरे म्हणाले की, "एक खेळाडू म्हणून मला नॉकआउटमध्ये पुढे जाता आले नव्हते, परंतु आता प्रशिक्षक म्हणून ही विजयी घोडदौड पाहणे खूप सुखावह आहे. आमचा संघ एका कुटुंबासारखा खेळतोय आणि चाहत्यांशी असलेली आमची ही 'कनेक्शन' खरोखरच नेत्रदीपक आहे."
मेक्सिकोने सलग १२ सामने अपराजित राहण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. तसेच, फिफा वर्ल्ड कपच्या नॉकआउट सामन्यात दक्षिण अमेरिकन संघाला (CONMEBOL) पराभूत करणारा मेक्सिको हा पहिला 'कॉन्काकॅफ' (CONCACAF) संघ ठरला आहे. या विजयामुळे मेक्सिकोचे मनोबल उंचावले असून, आता रविवारच्या सामन्यात त्यांचा सामना इंग्लंड किंवा काँगो यांपैकी विजेत्या संघाशी होणार आहे. ऐतिहासिक 'एझ्टेका स्टेडियम'वर मेक्सिकोची वर्ल्ड कपमधील अजेय कामगिरी सुरूच आहे.