प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या चित्रपटांचे शेवट नेहमीच प्रेक्षकांना भावुक किंवा थक्क करणारे असतात. 'रॉकस्टार'मधील अपूर्ण राहिलेली लव्ह स्टोरी असो किंवा 'अमर सिंग चमकीला' या चित्रपटाचा दुःखद शेवट असो, इम्तियाज यांच्या चित्रपटांचे शेवट ट्रॅजिक (दुःखद) का असतात, असा प्रश्न चाहत्यांना नेहमी पडतो.
यावर बोलताना इम्तियाज अली यांनी स्पष्ट केले की, चित्रपटांचे असे शेवट करणे हा त्यांचा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय नसतो, तर ती कथा सांगण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया असते. ते त्यांच्या आगामी 'मेन वापस आऊंगा' (Main Vaapus Aaunga) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात बोलत होते.
ए आर रहमान आणि इरशाद कामिल यांची साथ
'जब वी मेट', 'लव्ह आज कल', 'हायवे' आणि 'तमाशा' यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे इम्तियाज अली पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक भावनिक कथा घेऊन येत आहेत. 'मेन वापस आऊंगा' हा चित्रपट भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यामध्ये वेदांग रैना आणि शर्वरी वाघ यांच्या मुख्य भूमिका असून, ही कथा दोन वेगवेगळ्या कालखंडात उलगडते.
जेष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे मुख्य पात्राची वयाने मोठी आवृत्ती साकारत आहेत, तर प्रसिद्ध गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ हा त्यांच्या नातवाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने इम्तियाज अली, ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान आणि गीतकार इरशाद कामिल ही त्रिमूर्ती पुन्हा एकदा एकत्र आली आहे.
कलाकारांनी केले दिग्दर्शकाचे कौतुक
या कार्यक्रमात बोलताना दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी इम्तियाज अली यांच्या लेखन आणि दिग्दर्शन शैलीचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले की, एखाद्या अभिनेत्याचे यश हे पूर्णपणे लेखक आणि दिग्दर्शकावर अवलंबून असते. इम्तियाज यांनी अतिशय सुंदर पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तर अभिनेत्री शर्वरी वाघ आणि अभिनेता वेदांग रैना यांनी इम्तियाज अली यांच्या शांत स्वभावाचा आणि मानवी भावनांची अचूक समज असण्याचा उल्लेख करत त्यांच्यासोबत काम करणे हा एक मोठा सन्मान असल्याचे सांगितले.
दिलजीत दोसांझ सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असल्याने तो या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही, मात्र त्याने व्हिडिओ संदेशाद्वारे चाहत्यांना ट्रेलर शेअर करण्याचे आवाहन केले आहे. बिर्ला स्टुडिओ आणि अप्लॉज एंटरटेनमेंट निर्मित हा चित्रपट १२ जून रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.