अग्रीपाड्यातील आठ वर्षीय हसनैनची बँकॉकमध्ये ऐतिहासिक कामगिरी!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 23 h ago
मोहम्मद हसनैन
मोहम्मद हसनैन

 

जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर एखादी व्यक्ती आभाळाला कसं गवसणी घालू शकते, याचं जिवंत उदाहरण मुंबईच्या अग्रीपाड्यातील मोहम्मद हसनैनने जगासमोर ठेवलं आहे. बँकॉकमध्ये नुकत्याच पार पडलेल्या १० वर्षांखालील जागतिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये ८ वर्षांच्या हसनैनने तब्बल ६ सुवर्णपदके पटकावली. त्याने आपल्या यशातून जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा डौलाने फडकवला आहे.

१५ देशांतील स्पर्धकांवर मात

थाई कॅनेडियन स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या या स्पर्धेत जगातील १५ हून अधिक देशांतील खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत हसनैनने आपल्या चपळाईने सर्वांना थक्क केले. त्याने फ्लोअर एक्सरसाइज, हॉरिझॉन्टल बार, पॅरलल बार, पोमेल हॉर्स, स्टील रिंग्स आणि वॉल्ट या ६ वेगवेगळ्या श्रेणींच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. या सहाही श्रेणींमध्ये एकही फाऊल न करता सुवर्णपदकांवर आपली मोहोर उमटवली. या स्पर्धेत माटुंगा स्पोर्ट्स पार्क अकॅडमीच्याच झैन फिरोज मकला यानेही २ सुवर्ण आणि १ रौप्य पदक जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

 
इन्किलाब वाहिनीशी संवाद साधताना हसनैन अभिमानाने सांगतो की, "मला भारतासाठी आशियाई आणि ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे आहे आणि आपल्या कौशल्याने देशाचे नाव उज्ज्वल करायचे आहे."

यापूर्वी हसनैनने दिल्ली आणि हैदराबादमध्येही हसनैनने २ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदक जिंकले होते. कमी वयात राज्य स्तरावर सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके जिंकण्याचा त्याचा प्रयत्न आजही तितक्याच जोशात सुरु आहे. असे करत असताना आता त्याने थेट जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. 

वयाच्या पाचव्या वर्षीपासून प्रशिक्षणाला सुरुवात

मुंबईतील अग्रीपाडा येथील मोअरलँड रोडजवळ हसनैन राहतो. सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूलमध्ये तिसरीत शिकणारा हसनैन आपल्या ५ भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. त्याचे वडील झुहेब कलवा अत्तर विक्रीचा व्यवसाय करतात. त्याच्या पालकांनी तो ५ वर्षांचा असतानाच त्याच्यातील कौशल्य ओळखले आणि त्याचे प्रशिक्षण सुरु केले. 
 

झुहेब यांनी खंत व्यक्त केली की, "अनेकदा आर्थिक ओढाताण असल्यामुळे हसनैनला मोठ्या स्पर्धांना मुकावे लागले आहे. जागतिक स्तरावर खेळण्यासाठी मोठा खर्च येतो आणि प्रयत्न करूनही स्पॉन्सरशिप मिळत नाही. जर अशा गुणवान खेळाडूंना सरकारी किंवा खासगी स्तरावरून मदत मिळाली, तर ते देशाचे नाव जगभरात मोठे करतील." 

हसनैन हा सध्या माटुंगा येथील स्पोर्ट्स पार्क ऑफ इंडिया अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक अभिषेक चेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून तो कठोर सराव करत आहे. कौशल्य, एकाग्रता आणि अपार मेहनत हीच हसनैनच्या यशाची त्रिसूत्री आहे. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्याने गाजवलेला पराक्रम येणाऱ्या काळात आशियाई खेळ आणि ऑलिंपिकमध्ये तिरंग्याची शान नक्कीच वाढवेल.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter