सनरायझर्स हैदराबादचा बंगळुरूवर ५५ धावांनी मोठा विजय; आरसीबी अव्वल स्थानावर कायम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 12 h ago
सनरायझर्स हैदराबादचा बंगळुरूवर ५५ धावांनी मोठा विजय
सनरायझर्स हैदराबादचा बंगळुरूवर ५५ धावांनी मोठा विजय

 

सनरायझर्स हैदराबादने आपल्या नेहमीच्याच आक्रमक फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ५५ धावांनी पराभव केला. मात्र, या मोठ्या विजयानंतरही हैदराबादचा संघ गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांमध्ये जागा मिळवू शकला नाही. या पराभवानंतरही उत्तम नेट रनरेटच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ च्या लीग स्टेजच्या शेवटी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने ४ बाद २५५ धावांचा प्रचंड डोंगर उभा केला होता. अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांच्या फटकेबाजीमुळे हैदराबादला ही धावसंख्या गाठता आली. आरसीबीसमोर प्लेऑफच्या पहिल्या दोन स्थानांमध्ये राहण्यासाठी केवळ १६६ धावांचे आव्हान होते, जे त्यांनी सामना गमावूनही सहज पूर्ण केले. आरसीबीचा डाव ४ बाद २०० धावांवर संपला.

 

तिन्ही संघांचे समान १८ गुण

 

या सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत मोठी रंजक स्थिती निर्माण झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (+०.७८३ नेट रनरेट), गुजरात टायटन्स (+०.६९५ नेट रनरेट) आणि सनरायझर्स हैदराबाद (+०.५२४ नेट रनरेट) या तिन्ही संघांचे समान १८ गुण झाले आहेत. मात्र, सरस रनरेटमुळे बंगळुरू पहिल्या तर गुजरात दुसऱ्या स्थानावर राहिले, ज्यामुळे त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील. हैदराबादला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

 

२५६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली. व्यंकटेश अय्यरने १९ चेंडूंत ४४ धावांची खेळी केली. मात्र, विराट कोहली १५ धावांवर तर देवदत्त पडिक्कल २१ धावांवर बाद झाले. सामना जिंकणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर रजत पाटीदार (३९ चेंडूंत ५६ धावा) आणि कृणाल पंड्या (३१ चेंडूंत नाबाद ४१ धावा) यांनी १६६ धावांच्या 'मॅजिक फिगर'वर लक्ष केंद्रित केले. या दोघांनी ८४ धावांची भागीदारी केली. पाटीदारने पॅट कमिन्सला मारलेल्या षटकारामुळे आरसीबीचे टॉप २ मधील स्थान पक्के झाले. हैदराबादकडून ईशन मलिंगाने २ बळी घेतले, तर साकिब हुसेनने १ बळी घेतला.

 

हैदराबादच्या फलंदाजांचे वादळ

 

तत्पूर्वी, हैदराबादकडून अभिषेक शर्माने २२ चेंडूंत ५६ धावा करताना पुन्हा एकदा अवघ्या २० चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर सलग षटकार मारून त्याला स्थिरावू दिले नाही. उपकर्णधार ईशान किशनने मैदानाच्या चहुबाजूने फटकेबाजी करत ४४ चेंडूंत ७९ धावा कुटल्या.

 

तिसऱ्या क्रमांकावर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या हेनरिक क्लासेनने २४ चेंडूंत ५१ धावा केल्या. त्याने जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या जोश हेझलवूडच्या एकाच षटकात तब्बल २७ धावा वसूल केल्या. शेवटच्या षटकांमध्ये नितीश रेड्डीने १२ चेंडूंत नाबाद २९ धावा करत संघाला २५० च्या पार पोहोचवले. हैदराबादच्या फलंदाजांनी संपूर्ण डावात २० चौकार आणि १६ षटकार ठोकले.