दानिश अली
१४ ऑगस्टच्या सकाळी किश्तवाडच्या पड्डर परिसरातील चिसोती गावात भक्ती, सामुदायिक उत्साह आणि धार्मिक ऊर्जा पाहायला मिळाली. १०० वर्षांहून अधिक जुने हे गाव मचैल माता यात्रेचा शेवटचा मोटर मार्गावरील थांबा आहे. दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी थांबतात. सकाळी जयघोष आणि लंगरने हे गाव गजबजले होते. परंतु याच दरम्यान दुपारपर्यंत गावचे दृश्य किंचाळ्या आणि विध्वंसात बदलले.
एका भयंकर ढगफुटीच्या घटनेने काही क्षणांत गावचे चित्र बदलले. जोरदार पाण्याच्या वेगाने दगडांच्या भिंत कोसळल्या. यामुळे त्याठीकाणचे सर्व काही उद्ध्वस्त झाले. मंदिर, निवारे, दुकाने आणि शेकडो जीव चिनाब नदीच्या उधाणलेल्या पाण्यात वाहून गेले. या भीषण आपत्तीत आतापर्यंत ६५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात दोन पुजारीही आहेत. १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत आणि सुमारे ७० भाविक अद्याप बेपत्ता आहेत.
“आम्ही पळण्याचा प्रयत्न केला, पण पाणी खूप वेगाने आले...”
हे शब्द त्या हजारो तीर्थयात्रींपैकी एकाचे आहेत, जे त्या दिवशी तिथे उपस्थित होते. सुमारे २,५०० लोकांनी जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावपळ केली. २२ वर्षीय सावंत सिंग यांनी आपल्या उद्ध्वस्त घराच्या मलब्याकडे बोट दाखवत सांगितले, “जेव्हा पूर आला, तेव्हा माझी आई आणि बहीण रोट्या विकत होत्या. दोघीही पाण्यात वाहून गेल्या.”
सावंत यांच्यासारख्या शेकडो कुटुंबांची उपजीविका तीर्थयात्रींवर अवलंबून आहे. ही आपत्ती केवळ रोजगाराची हानी नाही, तर आपली माणसे गमावण्याचे दुख आहे. हे दुख शब्दांत मांडणे अशक्य आहे.
“असा विनाश यापूर्वी कधीच पाहिला नव्हता”
डोडा जिल्ह्यातील ३७ वर्षीय उमर इकबाल बचाव कार्यात सहभागी होते. ते म्हणाले, “आम्ही ६३ मृतदेह बाहेर काढले. १०० वर्षांहून अधिक काळापासून वसलेले हे गाव काही मिनिटांत पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.”
जम्मूच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयाचे कॉरिडॉर जखमी, त्यांचे नातेवाईक आणि स्वयंसेवकांनी भरलेले आहे. डॉक्टरांनी सांगितले की ७५ हून अधिक जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. शवागारात ११ मृतदेह आणि एक अवयव ठेवण्यात आला होता. नंतर औपचारिकतांनंतर हे कुटुंबांना सुपूर्द करण्यात आले.
“असे दृश्य कोणालाही आयुष्यात पाहावे लागू नये”
चाव पथकासह गावात प्रथम पोहोचलेले ४३ वर्षीय डॉ. मुज्तबा अहमद यांनी आपत्तीची भयावह परिस्थिती सांगितली. ते म्हणाले, “जेव्हा मी घटनास्थळी पोहोचलो तेव्हा मलब्यात दबलेले मृतदेह, तुटलेले निवारे, रडणारे-आक्रोश करणारे नातेवाईक पाहणे मला असह्य झाले. मी एका भावाला त्याच्या बहिणीचा मृतदेह शोधताना पाहिले. एका वडिलांना मलब्यात आपल्या मुलाचा शोध घेताना पाहिले.”
पुढे ते भावूक होऊन म्हणाले, “मला तिथून निघावे लागले. मी ते दृश्य आणखी पाहू शकत नव्हतो. त्या कुटुंबांच्या किंचाळ्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या.” खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत असल्याचे त्यांनी सांगितले. हे एक-दोन दिवसांचे काम नाही, तर दीर्घ प्रक्रिया असल्याचेही ते म्हणाले.
मानवतेची मिसाल
या आपत्तीत अबाबील आणि फुरकान वेल्फेअर ट्रस्टसारख्या मुस्लिम स्वयंसेवी गटांनी आशेचा किरण बनून पीडित आणि त्यांच्या कुटुंबांसाठी धावून आले. त्यांनी जखमींसाची मदत केली.
अबाबीलचे स्वयंसेवक बशीर अहमद यांनी सांगितले की, “आम्ही जखमींसाठी रक्तदान केले. अन्नाची व्यवस्था केली. मृतदेह गावापर्यंत पोहोचवले. अंत्यसंस्कारातही मदत केली. हा धर्माचा प्रश्न नाही, तर मानवतेच्या सेवेचा काळ आहे.”
या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात सामुदायिक स्वयंपाकघरे उभारली. मृतदेहांसाठी कफनाची व्यवस्था केली. दुर्गम गावांतील पीडित कुटुंबांपर्यंत पोहोचले. जेव्हा गरज सर्वाधिक होती, तेव्हा या कार्यकर्त्यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन सेवेची मिसाल पेटवली.
प्रशासन आणि लष्कराची तत्परता
या आपत्तीनंतर स्थानिक प्रशासन, लष्कर, पोलिस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर पथकांनी एकत्र येऊन अप्रतिम शौर्य आणि तत्परता दाखवली. लष्कराच्या १७ राष्ट्रीय रायफल्सने डोंगराळ भागात पूल बांधून बचाव कार्याला गती दिली. स्थानिक अधिकारी, विशेषतः एआरटीओ तस्लीम, चोवीस तास कार्यरत राहिले. उमर इकबाल म्हणाले, “प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन जबरदस्त काम करत आहेत. ही एकता अप्रतिम आहे.”
तीर्थयात्रा आता शोक आणि श्रद्धांजलीचा केंद्र
दरवर्षी धार्मिक उत्सवाचे प्रतीक असणारी मचैल माता यात्रा आता शोक आणि श्रद्धांजलीचे केंद्र बनली आहे. ही यात्रा दशकांपासून जम्मू-काश्मीरमधील विविध समुदायांना जोडत आहे. परंतु यंदा मात्र ती करुणा, एकता आणि माणुसकीचा नवा अर्थ घेऊन आली आहे.
जेव्हा मंदिरे वाहून गेली, दुकाने मलब्यात दबली आणि खोऱ्यात शोक पसरला, तेव्हा धर्माच्या भिंती कोसळल्या आणि फक्त एकच धर्म उरला, तो म्हणजे माणुसकी. किश्तवाडच्या या आपत्तीने एक अविस्मरणीय धडा दिला. आपत्ती कितीही मोठी असली, तरी माणुसकी जिवंत असेल तर आशेचा किरण कधीच विझत नाही.