ट्रम्प यांच्या खेळीने जग थक्क, हमासच्या घोषणेनंतर जगभरातून कौतुकाचा वर्षाव!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

हमासने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शांतता प्रस्ताव स्वीकारून बंधकांची सुटका करण्याची तयारी दाखवताच, संपूर्ण जगाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. कॅनडा, फ्रान्स, ब्रिटन, कतार आणि संयुक्त राष्ट्रांसारख्या प्रमुख जागतिक शक्तींनी या भूमिकेचे कौतुक करत, मध्य-पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे एक "महत्वपूर्ण पाऊल" असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आलेल्या या बातमीने जगभरातील राजनैतिक वर्तुळात सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध देशांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत:

  • कॅनडा : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी हमासच्या निर्णयाचे स्वागत केले. "आम्ही दोन्ही बाजूंना शांततेसाठी वचनबद्ध राहण्याचे आवाहन करतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या नेतृत्वाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो," असे ते म्हणाले.

  • फ्रान्स : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले की, "बंधकांची सुटका आणि युद्धविराम आता आवाक्यात आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असून, फ्रान्स शांततेसाठी पूर्ण सहकार्य करेल."

  • ब्रिटन : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी हमासने अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारणे हे "एक मोठे आणि सकारात्मक पाऊल" असल्याचे म्हटले.

  • कतार : या शांतता चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कतारनेही हमासच्या घोषणेचे स्वागत केले आहे. "आम्ही इजिप्त आणि अमेरिकेसोबत मिळून युद्ध संपवण्यासाठी चर्चा सुरू ठेवली आहे," असे कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

  • संयुक्त राष्ट्र (UN) : संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही हमासच्या भूमिकेचे स्वागत करत, सर्व पक्षांना हा संघर्ष संपवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी तात्काळ आणि कायमस्वरूपी युद्धविराम, सर्व बंधकांची बिनशर्त सुटका आणि मानवतावादी मदतीची मागणी पुन्हा एकदा केली.

जगभरातून मिळत असलेला हा पाठिंबा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय मानला जात आहे. त्यांच्या एका कठोर आदेशाने आणि यशस्वी वाटाघाटीने अनेक महिन्यांपासून सुरू असलेला हा रक्तरंजित संघर्ष आता संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.