इराणने भारतीय नागरिकांसाठी असलेली 'व्हिसा-मुक्त प्रवेश सुविधा' (Visa Waiver Facility) स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नोकरीच्या खोट्या आश्वासनांवरून किंवा इतर देशांमध्ये पाठवण्याच्या बहाण्याने भारतीयांना इराणमध्ये बोलावून त्यांची फसवणूक केली जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) यासंदर्भात माहिती दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (१७ नोव्हेंबर २०२५) स्पष्ट केले की, इराण सरकारने सामान्य भारतीय पासपोर्ट धारकांसाठी उपलब्ध असलेली ही व्हिसा सवलत २२ नोव्हेंबर २०२५ पासून स्थगित केली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून या सुविधेचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या तारखेपासून सामान्य पासपोर्ट असलेल्या भारतीय नागरिकांना इराणमध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा तिथून ट्रान्झिट (दुसऱ्या देशात जाण्यासाठी थांबा) करण्यासाठी व्हिसा घेणे अनिवार्य असेल.
सरकारचे लक्ष अशा अनेक घटनांकडे वेधले गेले आहे, जिथे भारतीय नागरिकांना रोजगाराची खोटी आश्वासने देऊन किंवा तिसऱ्या देशात पाठवण्याचे आमिष दाखवून इराणला नेले जात होते. व्हिसा-मुक्त प्रवासाच्या सुविधेचा फायदा घेऊन या व्यक्तींची फसवणूक केली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे, इराणमध्ये पोहोचल्यानंतर अनेक भारतीयांचे खंडणीसाठी अपहरण केले गेल्याचे प्रकारही घडले आहेत.
या पार्श्वभूमीवर, इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताक सरकारने सामान्य भारतीय पासपोर्ट धारकांसाठीची ही सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः, जे एजंट व्हिसा-मुक्त प्रवासाची किंवा इराणमार्गे तिसऱ्या देशात पाठवण्याची ऑफर देत असतील, त्यांच्यापासून दूर राहण्याचे आणि अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन सरकारने केले आहे.