युद्ध थांबवण्यासाठी इराणने ठेवल्या ३ अटी; राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची आक्रमक भूमिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान

 

अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी तीन प्रमुख अटी जाहीर केल्या आहेत. आखाती अरब देशांवरील ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले थांबवण्यासोबतच इराणने आता युद्धातील नुकसानीची भरपाई, इराणच्या कायदेशीर अधिकारांना मान्यता आणि भविष्यातील हल्ल्यांविरुद्ध ठोस आंतरराष्ट्रीय हमी देण्याची मागणी केली आहे. बुधवारी उशिरा 'X' वर केलेल्या विधानात पेझेश्कियान यांनी या अटी मांडल्या.

पेझेश्कियान म्हणाले, "रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी संवाद साधताना मी प्रादेशिक शांततेसाठी इराणच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. झिओनिस्ट राजवट आणि अमेरिकेने पेटवलेले हे युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इराणच्या कायदेशीर अधिकारांची ओळख, नुकसानीची भरपाई आणि भविष्यात पुन्हा आक्रमण होणार नाही याची आंतरराष्ट्रीय खात्री मिळणे हाच आहे." त्यांनी एका वेगळ्या पोस्टमध्ये पुन्हा जोर देऊन सांगितले की, रशिया आणि पाकिस्तानच्या अध्यक्षांशी संपर्क साधून त्यांनी शांततेचा संदेश दिला असला तरी, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धखोरीमुळे सुरू झालेल्या या युद्धाचा शेवट इराणच्या निर्विवाद हक्कांच्या स्वीकृतीवरच अवलंबून आहे.

'इराणचे कायदेशीर अधिकार' म्हणजे नक्की काय, याचा सविस्तर खुलासा त्यांनी केला नसला तरी, शांततापूर्ण अणू कार्यक्रमाचा हक्क असल्याचे इराणने वारंवार सांगितले आहे. मात्र, अमेरिका आणि इस्रायल इराणवर अण्वस्त्रे बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहेत. राष्ट्राध्यक्षांनी भरपाईसाठी कोणत्याही विशिष्ट रकमेचा उल्लेख केलेला नाही. गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षात इराणमधील १,३०० हून अधिक लोकांचा बळी गेला असून अमेरिका-इस्रायलच्या बॉम्बफेकीत लष्करी तळांसह अनेक नागरी ठिकाणांचे मोठे नुकसान झाले आहे.

युद्धाची दाहकता कायम
२८ फेब्रुवारीला सुरू झालेले इराणचे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या लष्करी शक्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा दावा करत विजयाची घोषणा केली असली तरी, त्यांच्या या दाव्याला कोणताही ठोस आधार मिळालेला नाही. असे असतानाही अमेरिका, इस्रायल आणि इराण या तिन्ही देशांनी अजून काही आठवडे युद्ध सुरू ठेवण्याची तयारी दर्शवली आहे.

इराणने इस्रायलसह सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार आणि बहरीन यांसारख्या आखाती देशांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स डागणे सुरूच ठेवले आहे. इराणने व्यापारी जहाजांवर केलेल्या हल्ल्यांमुळे जगातील एकूण तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला 'होर्मुझची सामुद्रधुनी' हा मार्ग प्रभावीपणे बंद झाला आहे. यामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत मोठी खळबळ माजली आहे.

या संपूर्ण संघर्षात वॉशिंग्टन आणि तेल अवीव यांची उद्दिष्टे विसंगत राहिली आहेत. सुरुवातीला दोन्ही देशांनी तेहरानमधील सत्तापालट हे आपले ध्येय असल्याचे सुचवले होते. मात्र, युद्धाच्या सुरुवातीच्या हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेल्यानंतरही इराणने माघार घेतलेली नाही. याउलट, खामेनी यांचा कट्टरपंथी मुलगा 'मोजताबा' याला नवा सर्वोच्च नेता म्हणून नियुक्त करून इराणने लष्करी प्रत्युत्तर देणे सुरूच ठेवले असून यामुळे ट्रम्प यांची नाराजी वाढली आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिका आणि इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी इराणची सत्ता उलथवण्याऐवजी आपली उद्दिष्टे मर्यादित केली आहेत. यामध्ये इराणची क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करणे आणि त्यांच्या नौदलाला निकामी करणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.