मीर अल्ताफ
भारत सध्या आपल्या लोकसंख्या आणि अर्थव्यवस्थेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. देशाचे सरासरी वय अवघे २८ वर्षे आहे. जगात सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला आपला देश जागतिक विकासाचे प्रमुख इंजिन बनण्याच्या तयारीत आहे. या मोठ्या स्थित्यंतरात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. २०११ च्या जनगणनेनुसार, देशाच्या लोकसंख्येत १४.२ टक्के वाटा असलेला मुस्लीम तरुण स्वतःला या विकासगाथेत कुठे पाहतो? आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, भविष्यासाठी तो स्वतःची कोणती जागा निश्चित करत आहे?
अनेक दशकांपासून मुस्लीम तरुणांबाबतची चर्चा केवळ भेदभाव, असुरक्षितता आणि तक्रारींच्याच चष्म्यातून पाहिली गेली आहे. काही प्रमाणात संरचनात्मक अडचणी नक्कीच आहेत आणि त्यांची पाळेमुळे इतिहासात दडलेली आहेत. पण सतत स्वतःला 'पीडित' मानण्याच्या मानसिकतेमुळे एका संपूर्ण पिढीचे मोठे नुकसान होत आहे. ज्यावेळी भारत आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या वेगाने झेप घेत आहे, नेमक्या त्याच वेळी ही पिढी मानसिकदृष्ट्या स्वतःला एका कोंडीत अडकवून घेत आहे.
सतत रडत बसण्याची किंमत
जेव्हा तरुण पिढी आपली ओळख आणि संधी केवळ तक्रारींच्या आणि अन्यायाच्या दृष्टिकोनातून पाहू लागते, तेव्हा खरा धोका निर्माण होतो. सध्याचे युग वेगाने डिजिटल होत आहे. स्टार्टअप्स, फ्रीलान्सिंग आणि नव्या दमाचे उद्योग जुन्या आणि पारंपारिक अडथळ्यांच्या भिंती पाडत आहेत. अशा वेळी समाजातील विषमतेपेक्षा मानसिकदृष्ट्या अलिप्त राहणे जास्त नुकसानकारक ठरू शकते.
आज भारतात जगातील सर्वात वेगाने वाढणारी स्टार्टअप परिसंस्था (Ecosystem) आहे. इथे पारंपारिक वारशापेक्षा तुमच्यातील कौशल्य आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता जास्त महत्त्वाची ठरत आहे. जर मुस्लीम तरुणांनी स्वतःला देशाच्या प्रगतीच्या प्रवाहातून मानसिकदृष्ट्या वेगळे केले, तर ते स्वतःच्याच हाताने नवीन संधींचे दरवाजे बंद करून घेतील.
केवळ सामावून घेण्यापेक्षा योगदानावर भर हवा
मुस्लीम तरुणांनी आता आपली विचारसरणी बदलण्याची वेळ आली आहे. "आम्हाला कधी सामावून घेतले जाईल?" असा प्रश्न विचारण्याऐवजी, "आम्ही देशासाठी काय योगदान देऊ शकतो?" असा विचार त्यांनी केला पाहिजे. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे 'विकसित भारत' हे एक अत्यंत महत्त्वाकांक्षी ध्येय आहे. यात नाविन्य, उद्योजकता आणि तांत्रिक क्षमतेला सर्वाधिक महत्त्व दिले आहे.
यासाठी मुस्लीम तरुणांनी खालील गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे :
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या क्षेत्रातील शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साक्षरता आणि डिजिटल कौशल्ये.
उद्योजकता आणि स्टार्टअप्समध्ये सक्रिय सहभाग.
प्रशासकीय सेवा (Civil Services) आणि संस्थात्मक नेतृत्व.
आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून जागतिक स्तरावर संवाद साधण्याची कौशल्ये.
महिलांचे शिक्षण आणि त्यांना रोजगार क्षेत्रात आणण्यासाठी प्रोत्साहन.
डिजिटल क्रांतीमुळे जुने अडथळे आता बऱ्याच अंशी दूर झाले आहेत. श्रीनगर किंवा सीलमपूरमध्ये बसलेला एखादा कोडर, अलीगढ किंवा भोपाळमधील डिझायनर आणि मल्लपुरममधील एखादा 'कंटेंट क्रिएटर' आता कोणत्याही भौगोलिक सीमेची पर्वा न करता जागतिक बाजारपेठेत आपले कौशल्य दाखवू शकतो. संधींचे क्षितिज आता पूर्वीपेक्षा खूप विस्तारले आहे. जे या बदलत्या काळानुसार स्वतःला बदलतील, ते नक्कीच प्रगती करतील. पण जे परिपूर्ण न्यायाची वाट पाहत बसतील, ते कदाचित आयुष्यभर वाटच पाहत राहतील.
दोन टोकाच्या विचारांतून बाहेर पडण्याची गरज
आज मुस्लीम तरुणांसमोर एक मोठा मानसिक अडथळा आहे. धार्मिक ओळख आणि राष्ट्रीय एकात्मता या दोन गोष्टींमध्ये नेहमीच एक प्रकारचा ताण आहे, असे त्यांना वाटत असते. अनेकांना असा प्रश्न पडतो की, स्वतःच्या धर्माचे रक्षण करायचे की राष्ट्राच्या उभारणीत सहभागी व्हायचे? पण मुळात हा विचारच चुकीचा आहे. 'विकसित भारत' या संकल्पनेत अशा दोन टोकाच्या विचारांना अजिबात थारा नाही.
भारताची संस्कृती आणि ताकद कधीही एकाच रंगात रंगलेली नाही. विविध ओळखी, संस्कृती आणि परंपरांना एका राजकीय आणि आर्थिक चौकटीत गुण्यागोविंदाने एकत्र आणणे, हेच भारताचे खरे वैशिष्ट्य राहिले आहे. प्राचीन भारतातील तत्त्वज्ञानाच्या चर्चांपासून ते स्वातंत्र्यलढ्यातील सर्वसमावेशक परंपरेपर्यंत भारताच्या इतिहासाने हेच दाखवून दिले आहे की, स्वतःची ओळख आणि राष्ट्रीयत्व या दोन गोष्टी कधीही एकमेकांच्या विरोधात नाहीत.
त्यामुळे मुस्लीम तरुणांनी आपली धार्मिक ओळख हा राष्ट्रीय प्रगतीतील अडथळा मानण्याची अजिबात गरज नाही. धर्म आणि देशाचे भविष्य एकत्र नक्कीच हातात हात घालून चालू शकतात. संस्कृतीची मुळे घट्ट धरून ठेवूनही आधुनिक स्वप्ने साकार करता येतात. देशाच्या विकासात तुमचे खरे योगदान हे केवळ तुमची ओळख सांगून सिद्ध होणार नाही. तर संस्था उभारणीत, नाविन्यपूर्ण संकल्पना आणण्यात आणि देशाची बौद्धिक व आर्थिक वाटचाल ठरवण्यात तुमचा सक्रिय सहभाग किती आहे, यावरून ते सिद्ध होईल.
बदलाचे वारे वाहू लागलेत
एक अत्यंत सकारात्मक आणि आशादायी गोष्ट म्हणजे, भारतभरात आता एक शांत आणि मोठा बदल होताना दिसत आहे. अनेक मुस्लीम तरुण आता केवळ तक्रारींचा पाढा वाचण्याऐवजी, आपल्या कर्तृत्वातून स्वतःची नवी ओळख निर्माण करत आहेत. ते प्रशासकीय सेवेत (Civil Services) दाखल होत आहेत, स्वतःचे स्टार्टअप्स उभारत आहेत, डिजिटल विश्वात आपला ठसा उमटवत आहेत आणि जागतिक स्तरावरही उत्तम कामगिरी करत आहेत.
ते आपली धार्मिक किंवा सांस्कृतिक ओळख पुसून टाकत नाहीत. त्याचबरोबर स्वतःला देशाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळेही ठेवत नाहीत. त्याऐवजी, ते स्वतःच्या वारशाचा अभिमान बाळगत भारताच्या सामूहिक प्रगतीतही तितक्याच निष्ठेने सहभागी होत आहेत. याची काही प्रेरणादायी उदाहरणे पाहूया:
२००९ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देशातून पहिला आलेला शाह फैसल हा संपूर्ण देशातील तरुणांसाठी एक मोठा आदर्श बनला. जम्मू-काश्मीरमधील फैसल खूप लहान असतानाच दहशतवाद्यांनी त्याच्या वडिलांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर भावनिक आणि आर्थिक संकटांचा डोंगर कोसळला.
अशा अत्यंत बिकट परिस्थितीतही त्याने शिक्षणाची कास सोडली नाही. चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्याने भारतातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत पहिले स्थान पटकावले. त्याच्या या यशाने हजारो तरुणांना, विशेषतः दुर्गम आणि मागासलेल्या भागातील विद्यार्थ्यांना एक मोठा विश्वास दिला. प्रचंड मेहनत आणि शैक्षणिक यशाच्या जोरावर देशातील सर्वोच्च प्रशासकीय सेवेची दारे उघडता येतात, हे त्याने सिद्ध करून दाखवले.
नुकतीच एक मोठी घटना घडली. महाराष्ट्रातील यवतमाळमधील एका रिक्षाचालकाची मुलगी अदीबा अनम हिने इतिहास रचला. २०२४ च्या 'यूपीएससी' परीक्षेत १४२ वी रँक मिळवून ती महाराष्ट्रातून ही परीक्षा उत्तीर्ण होणारी पहिली मुस्लीम महिला ठरली. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि पहिल्या दोन प्रयत्नांत आलेले अपयश यावर मात करत तिने तिसऱ्या प्रयत्नात हे मोठे यश मिळवले.
आसाममधील गुवाहाटीची हुमा अबिया कांता ही 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) संशोधक म्हणून काम करणारी तरुणी तंत्रज्ञानातील वाढत्या आत्मविश्वासाचे एक उत्तम उदाहरण आहे. शालेय जीवनातच तिने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदांमध्ये 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' आणि 'नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग' या विषयांवर आपले शोधनिबंध सादर केले आहेत. असा पराक्रम करणारी ती सर्वात तरुण भारतीयांपैकी एक आहे.
ती 'desiCodes' या तरुणांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या उपक्रमाची संस्थापक आहे. या माध्यमातून भारतीय भाषांमध्ये 'प्रोग्रामिंग टूल्स' विकसित करण्याचे काम केले जात आहे. 'asPy' या आसामी-पायथन प्रोग्रामिंग इंटरफेसच्या माध्यमातून ईशान्य भारतात डिजिटल साक्षरता वाढवण्याचे मोठे काम ती करत आहे.
राजस्थानच्या मेवात भागातील शबनम खान ही तिच्या भागातील पहिली महिला इंजिनिअर ठरली. ती लहानपणी कधीही शाळेत गेली नव्हती. मात्र एका स्थानिक संस्थेच्या 'ब्रिज कोर्स'च्या माध्यमातून तिने आपले रखडलेले शिक्षण पूर्ण केले आणि पुढे सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. आज ती सरकारच्या जलसंपदा विभागात काम करत असून, ग्रामीण भागातील बांधकाम प्रकल्पांची देखरेख करते.
रिझवान साजन यांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर मुंबईच्या गल्लीबोळात दूध आणि स्टेशनरी विकण्याचे काम केले. आज ते 'डॅन्यूब ग्रुप'चे (Danube Group) संस्थापक आहेत. ही कंपनी बांधकाम साहित्य आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील एक मोठा जागतिक ब्रँड बनली असून, त्यांची उलाढाल १.३ अब्ज डॉलर्सपेक्षा (सुमारे १०,८०० कोटी रुपये) जास्त आहे. मुंबईच्या झोपडपट्टीतून थेट यूएईमधील सर्वात श्रीमंत भारतीय वंशाच्या व्यावसायिकांपैकी एक बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर गरिबीवरही कशी मात करता येते, हे त्यांनी सिद्ध केले.
क्रीडा क्षेत्रातही अशीच उदाहरणे आहेत. मोहम्मद सिराजने हैदराबादमधील एका अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज बनण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. हा प्रवास केवळ आर्थिक परिस्थितीवर मात करण्याचा नाही, तर मोठी स्वप्ने, शिस्त आणि देशाभिमानाचे एक उत्तम उदाहरण आहे.
आणि या सर्वांच्या वर एक मोठे आणि अढळ नाव आहे, ते म्हणजे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम! एक महान शास्त्रज्ञ, देशाचे राष्ट्रपती आणि धर्म, ज्ञान व देशसेवा यांचा उत्तम संगम कसे साधता येतो, याचे ते सर्वात मोठे प्रतीक आहेत. देशाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी कलामांनी आपली ओळख कधीही लपवली नाही, तर ती एका मोठ्या राष्ट्रीय उद्देशाशी जोडली.
ही उदाहरणे अतिशय महत्त्वाची आहेत. कारण ती एका मोठ्या आणि धोकादायक गैरसमजाला तडा देतात. समाजातील काही जुने अडथळे किंवा अडचणी म्हणजे कायमचे वेगळेपण नव्हे, हे यातून स्पष्ट होते.
भविष्याची उभारणी आणि पुढचा रस्ता
एकत्र येणे आणि सामावून घेणे ही नेहमीच दुतर्फा चालणारी प्रक्रिया असते. सरकारी संस्था आणि व्यवस्था नेहमीच सर्वांसाठी खुल्या आणि न्याय्य असल्या पाहिजेत. जिथे कुठे भेदभाव असेल, तो त्वरित दूर केला पाहिजे. पण सगळ्या गोष्टी अगदी शंभर टक्के बरोबर होण्याची वाट पाहत आपण आपली प्रगती थांबवू शकत नाही. सर्वात मोठा आणि अर्थपूर्ण बदल हा आतूनच येतो. त्यासाठी कौशल्ये आत्मसात करणे, उद्योजकता वाढवणे, नागरी कर्तव्यात सहभाग नोंदवणे आणि संस्थात्मक पातळीवर पुढे येणे गरजेचे आहे.
जो समाज आधुनिक शिक्षणाला महत्त्व देतो, महिलांना प्रगतीच्या प्रवाहात सामावून घेतो आणि एकमेकांना मार्गदर्शन करणारी व्यवस्था उभी करतो, तो समाज आपली आर्थिक आणि सामाजिक स्थिती नक्कीच बदलतो.
आर्थिक प्रगती हा समाजातील दरी मिटवणारा सर्वात मोठा घटक आहे. येणारी दोन दशके तंत्रज्ञान आणि उत्पादकतेच्या जोरावर भारताचे सामाजिक चित्र पूर्णपणे बदलून टाकतील. जे समाज नवीन कौशल्ये आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा स्वीकार करतील, ते सतत अन्यायाचे गाऱ्हाणे गात बसणाऱ्या समाजापेक्षा खूप वेगाने पुढे जातील.
तंत्रज्ञान, नाविन्य आणि तरुणांच्या महत्त्वाकांक्षेच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था आज वेगाने विस्तारत आहे. 'विकसित भारत'चे हे स्वप्न देशातील तरुणांनाच समर्पित आहे. सरकारदेखील तरुणांच्या सक्षमीकरणाला केंद्रस्थानी ठेवून अनेक धोरणे आणि योजना राबवत आहे.
आता प्रश्न हा नाहीये की भारताची ही विकासगाथा पुढे जाईल की नाही. खरा प्रश्न हा आहे की, मुस्लीम तरुण स्वतःला या विकासाच्या सीमेवर उभे पाहणार की अगदी केंद्रस्थानी? इतिहासाने कधीही वेळ काढू लोकांसाठी थांबण्याची तसदी घेतलेली नाही. या पिढीवर एक मोठी जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्याची सुवर्णसंधीही त्यांच्याकडेच आहे.
त्यांनी स्वतःला केवळ तक्रारी आणि अन्यायाच्या चौकटीत न अडकवता, देशाच्या विकासात योगदान देणारे नागरिक म्हणून आपली नवी ओळख निर्माण केली पाहिजे. जे लोक तक्रारीकडून योग्यतेकडे, चिंतेकडून महत्त्वाकांक्षेकडे आणि जुन्या आठवणींकडून एका नव्या गतीकडे वळतील, भविष्य केवळ त्यांचेच असेल!
(लेखक काश्मीर येथील शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि कवी आहेत.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -