Riyan Parag Vaping IPL 2026: रियान परागवर मॅच फीच्या २५ टक्के दंडाची कारवाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 h ago
आयपीएल २०२६ च्या सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग
आयपीएल २०२६ च्या सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग

 

नवी दिल्ली :

आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट (व्हेपिंग) ओढल्याप्रकरणी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. खेळाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत गुरुवारी त्याला त्याच्या मॅच फीच्या २५ टक्के इतका दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आता राजस्थान रॉयल्स संघावर आणि अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

मंगळवारी रात्री मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात रियान परागचे हे कृत्य थेट कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. मैदानावरील पंच तन्मय श्रीवास्तव आणि नितीन मेनन यांनी सामन्याच्या लगेचच मॅच रेफरी अमित शर्मा यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली नव्हती. पण नंतर व्हिडीओ पुरावे पाहिल्यानंतर अमित शर्मा यांनी परागला आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी ठरवले.

Riyan Parag Vaping: बीसीसीआयची कडक भूमिका

या गुन्ह्यासाठी लेव्हल १ अंतर्गत २५ टक्के मॅच फी कपात आणि एक डिमेरिट पॉईंट अशी शिक्षा आहे. आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, "रियानने आपला गुन्हा मान्य केला असून मॅच रेफरी अमित शर्मा यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे." आयपीएलची प्रतिष्ठा कायम राहावी यासाठी दोषी संघ, अधिकारी आणि खेळाडूंवर कठोर कारवाई करण्याचे इतर पर्यायही बीसीसीआय शोधत असल्याचे या निवेदनात स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, "निवेदनात स्पष्टपणे लिहिल्याप्रमाणे आम्ही संघावर कोणती कारवाई करता येईल याची चाचपणी करत आहोत. अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही." भारतात २०१९ पासूनच ई-सिगारेटच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी आहे. कायद्यानुसार पहिल्यांदा असा गुन्हा करणाऱ्याला एक वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे.

IPL Code of Conduct: आयपीएलचे नेमके नियम काय?

आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२१ नुसार खेळाची बदनामी करणाऱ्या कोणत्याही कृत्यावर कारवाई केली जाते. यात गैरवर्तन, सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन किंवा खेळाच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या वक्तव्यांचा समावेश होतो. गुन्ह्याचे गांभीर्य ठरवताना ही कृती हेतुपुरस्सर होती की अपघाती, याचाही विचार केला जातो. लेव्हल १ चा गुन्हा असल्याने या प्रकरणी कोणत्याही सुनावणीची गरज भासली नाही.

या हंगामात बॅटने फारशी चमक न दाखवू शकलेल्या परागला पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्याच्या थेट प्रक्षेपणादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये व्हेपिंग करताना पाहिले गेले. राजस्थानने हा सामना जिंकून पंजाब किंग्जची विजयी मालिका खंडित केली होती. मात्र या हंगामात राजस्थान संघ वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही.

या महिन्याच्या सुरुवातीला डगआऊटमध्ये फोन वापरताना आढळल्याने संघ व्यवस्थापक रोमी भिंडर यांना पीएमओए (PMOA) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. आयपीएल आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी टीव्ही कॅमेरे आणि सोशल मीडियाच्या युगात रियान परागच्या या कृत्याला अत्यंत निष्काळजीपणाचे लक्षण म्हटले आहे. राजस्थानचा पुढचा सामना शुक्रवारी रात्री जयपूरमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.