MP Mob Lynching Case Verdict : अमरावतीच्या नझीर यांच्या हत्येप्रकरणी १४ आरोपींना जन्मठेप

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने दोषींच्या नातेवाईकांचा आक्रोश
न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने दोषींच्या नातेवाईकांचा आक्रोश

 

मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये गोवंश तस्करीच्या संशयावरून महाराष्ट्रातील अमरावती येथील एका मुस्लिम व्यक्तीची मॉब लिंचिंग (जमावाकडून हत्या) केल्याप्रकरणी न्यायालयाने १४ जणांना जन्मठेपेची कडक शिक्षा सुनावली आहे. सिवनी माळवा-नर्मदापुरम येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तबस्सुम खान यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला आहे.
 
सत्र न्यायालयाने निर्णय दिला की, आरोपी व्यक्तींनी नाझीर अहमद यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या इतर दोन व्यक्तींना गंभीर जखमी करणाऱ्या हिंसक हल्ल्यात भाग घेतला होता, हे सिद्ध करण्यात फिर्यादी पक्षाला (प्रोसेक्युशन) कोणत्याही वाजवी संशयापलीकडे पूर्णपणे यश आले आहे. या हल्ल्यादरम्यान मृताला अत्यंत क्रूरतेची वागणूक देण्यात आली होती, असे निरीक्षण निकालात नोंदवण्यात आले.

नेमकं काय घडलं होतं?
३ ऑगस्ट २०२२ ला मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील सिवनी माळवा परिसरात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. महाराष्ट्रातील अमरावती येथून गोवंश घेऊन जाणारा एक ट्रक मध्य रात्री १ च्या सुमारास बराखड गावाजवळून जात असताना १० ते १५ जणांच्या जमावाने तो अडवला. ट्रकमध्ये गोवंश असल्याचे पाहून या जमावाने ट्रक चालक आणि त्यामध्ये बसलेल्या इतर दोन व्यक्तींवर लाठ्या-काठ्यांनी बेदम आणि अमानुष हल्ला केला.

पोलिसांनी वेळेत पोहोचून केले रुग्णालयात दाखल
या प्राणघातक हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या तिन्ही व्यक्तींना जमावाच्या तावडीतून सोडवून उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले अमरावतीचे रहिवासी नझीर अहमद यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रकमधील इतर दोन व्यक्तींवर वेळेत उपचार झाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या घटनेनंतर पोलिसांनी १४ आरोपींविरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू केला होता.

या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुमारे तीन वर्षे सुरू होती. शुक्रवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे तपासून अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सर्व १४ आरोपींना दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये दीपक उर्फ बाबा केवट (३८), अज्जू उर्फ अजय राठोड (३६), प्रकाश कौशल (३३), चेतन मराठा (२३), पवन बाथव (३१), अमर उर्फ भोला बाथव (३८), कन्हैया बाथव (३२), देवेंद्र उर्फ छोटू कोरी (२२), संदीप उर्फ राजा कौशल (२६), अनुज उर्फ बल्लू रघुवंशी (२४), संजू उर्फ राजेंद्र कौशल (३९), आकाश उर्फ पिंतोली बाथव (३१), गौरव यादव (२४) आणि आकाश सरथे (३३) यांचा समावेश आहे.

निकालानंतर कोर्टाबाहेर नातेवाईकांचा गोंधळ
न्यायालयाने शिक्षा सुनावल्याची माहिती मिळताच दोषींच्या नातेवाईकांनी कोर्टाच्या आवारात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पोलीस जेव्हा सर्व दोषींना कारागृहात नेण्यासाठी पोलीस वाहनात बसवत होते, तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. काही नातेवाईक तर वाहनाचा रस्ता रोखण्यासाठी गाडीच्या समोर जमिनीवर झोपले होते. 

कोर्टाच्या या निर्णयामुळे आरोपींच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून कोर्टाबाहेर त्यांचे रडणे सुरू होते. आमची मुले गोसेवा आणि गोरक्षणासाठी गेली होती, परंतु त्यांना या घटनेचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत, असा दावा काही नातेवाईकांनी केला. न्यायालयाने मात्र कायद्याचा आदर राखत हिंसाचार करणाऱ्यांना कठोर संदेश दिला आहे.