ASSAM FLOOD: अद्याप १३ हजार कुटुंबांचा वीजपुरवठा खंडित, पाणी ओसरल्यानंतर पुनर्रचना सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 17 h ago
आसाममधील पूरपरिस्थिती अद्याप कायम; १३ हजार कुटुंबांचा वीजपुरवठा अद्याप खंडित.
आसाममधील पूरपरिस्थिती अद्याप कायम; १३ हजार कुटुंबांचा वीजपुरवठा अद्याप खंडित.

 

गुवाहाटी

आसाममधील पूरग्रस्त भागांत पुराचे पाणी ओसरत असले तरी, अद्याप जवळपास १३ हजार कुटुंबांना वीजपुरवठा मिळालेला नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आल्यानंतर सुमारे ११ दिवस लोटले तरी वीज यंत्रणा पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर माहिती दिली की, प्रशासनाकडून पूरस्थितीचा सतत आढावा घेतला जात असून वीज जोडण्या पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. वीज नसलेल्या ग्राहकांच्या संख्येत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. पाणी ओसरत असताना सुरक्षेची खात्री करून वीज पुरवठा सुरळीत केला जात आहे. आसाम पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडने (APDCL) दिलेल्या अहवालानुसार, सिवासागर इलेक्ट्रिकल वर्तुळात १२,७५६ ग्राहक अजूनही विनावीज आहेत, ज्यामध्ये गौरिसागर, सिवासागर, नाजिरा, आमगुरी आणि डेमोंग या भागांचा समावेश आहे.

पूरपरिस्थिती आणि हवामान अंदाज

राज्यातून पुराचे पाणी बऱ्याच भागांतून ओसरले असले तरी मृतांचा आकडा ७८ वर पोहोचला आहे आणि तीन लाखांहून अधिक नागरिक अद्याप पुराच्या विळख्यात आहेत. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) आगामी तीन दिवसांत आसामसह अरुणाचल प्रदेश आणि नागालँडच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.