मुंबई
दिग्दर्शक इम्तियाज अली आणि संगीतकार ए. आर. रहमान यांच्या जोडीचा 'मैं वापस आऊंगा' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या चित्रपटाचा संपूर्ण संगीत अल्बम प्रदर्शित झाला असून, यात संगीताची जादू अनुभवता येणार आहे. यामधली 'क्या कमाल है', 'मस्कारा' आणि 'इश्क मस्ताना' यांसारखी गाणी प्रचंड लोकप्रिय झाली आहेत.
चित्रपटातील संगीतावर भाष्य करताना ए. आर. रहमान म्हणाले, "काही कथा अशा असतात जिथे संगीत अव्यक्त, अबोल गोष्टींची भाषा बनते. जे शब्दांत सांगता येत नाही किंवा जे दाखवता येत नाही, ते संगीत व्यक्त करते. 'मैं वापस आऊंगा' मध्ये कथेतील मौनाचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. आशा आहे की प्रेक्षकांना या संगीतात स्वतःचा आवाज सापडेल."
इम्तियाज अली यांनी या अल्बमच्या निर्मितीमागचा दृष्टिकोन स्पष्ट केला. ते म्हणाले, "संगीत हे पंजाबचे हृदय आहे आणि पंजाब हे 'मैं वापस आऊंगा' या चित्रपटाचे हृदय आहे. १९४७ च्या पंजाबमधील लोकसंगीत आणि पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव आम्ही या अल्बममध्ये पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ए. आर. रहमान आणि इरशाद कामिल यांनी या चित्रपटासाठी अत्यंत खोलवर जाऊन संगीताचा शोध घेतला आहे."
या अल्बमच्या माध्यमातून अनेक नवीन गायकांना संधी देण्यात आली आहे. फाहीम अब्दुल्ला, शिल्पा राव, अंतरा नंदी, दीपाली सहाय, विपिन अनेजा, अरमान खान, रोमी आणि अदित्या आरके यांसारख्या कलाकारांनी यातील गाण्यांना आवाज दिला आहे. नवीन गायकांच्या या ऊर्जेबद्दल आपल्याला अभिमान असल्याचे इम्तियाज अली यांनी सांगितले. दिलजित दोसांज, नसीरुद्दीन शहा, शर्वरी आणि वेदांग रैना यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १५ जून रोजी प्रदर्शित झाला असून त्याचे संगीत टिप्स म्युझिकवर उपलब्ध आहे.