भारताच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांना संगीतमय मानवंदना देणारा अभूतपूर्व सोहळा रविवारी पंजाबमधील अटारी सीमेवर पाहायला मिळाला. ऑस्कर विजेते प्रख्यात संगीतकार ए. आर. रहमान यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच अटारी सीमेवर 'लाईव्ह' सादरीकरण करत सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांना अनोखी आणि हृदयस्पर्शी मानवंदना दिली.
जेसीपी स्टेडियमवर पार पडलेल्या 'बीटिंग रिट्रीट' सोहळ्यादरम्यान "जय हो — अ म्युझिकल सॅल्यूट टू द ब्रेव्हहार्ट्स" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी 'मैं वापस आऊंगा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर या भव्य कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती.
हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात रहमान यांनी त्यांच्या 'चंदा सुरज लाखो तारे' या सुमधुर रचनेने केली. त्यानंतर 'मैं वापस आऊंगा' चित्रपटातील गाण्यांची बहारदार मैफल रंगली. नीलांजना घोष आणि फाळणीपूर्वीच्या भारतातील एका तरुणाची भूमिका साकारणारा अभिनेता वेदांग रैना यांनी 'मस्करा' हे गाणे सादर केले. त्यानंतर प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी पूजा तिवारी आणि नर्गिस यांच्या साथीने 'इश्क मस्ताना' हे गाणे गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या अविस्मरणीय सांगीतिक सोहळ्याची सांगता रहमान यांच्या अंगावर काटा आणणाऱ्या आणि देशभक्तीने भारलेल्या 'माँ तुझे सलाम' या जगप्रसिद्ध रचनेने झाली.
याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली, ए. आर. रहमान, अभिनेता वेदांग रैना यांच्यासह 'बिर्ला स्टुडिओज'च्या निर्मात्या अनन्या बिर्ला आणि 'विंडो सीट फिल्म्स'चे मोहित चौधरी उपस्थित होते. या संपूर्ण टीमने चित्रपटाचा हा म्युझिक अल्बम भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांच्या शौर्य आणि बलिदानाला समर्पित केला.
याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “हे सादरीकरण म्हणजे आपल्या राष्ट्रीय भावनेला, सीमेवरील शूरवीरांना, बीएसएफ आणि भारतीय लष्कराला तसेच आपल्या सर्वांना बांधून ठेवणाऱ्या प्रेम आणि एकतेच्या भावनेला दिलेली सांगीतिक मानवंदना आहे.
रहमान पहिल्यांदाच पंजाबमध्ये आल्याचा आनंद व्यक्त करताना अली पुढे म्हणाले, "आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही ए. आर. रहमान यांचे पहिल्यांदाच पंजाबमध्ये, अटारी येथे स्वागत करू शकलो. ते यापूर्वी कधीही पंजाबमध्ये आले नव्हते. त्यांनी येथे येऊन अटारी सीमेवर परफॉर्म केले, हे आमचे भाग्य आहे. इतर कोणत्याही कलाकाराला हा सन्मान मिळालेला नाही."
चित्रपटाच्या कथेचा संदर्भ देत इम्तियाज अली यांनी पुढे सांगितले की, "हा चित्रपट फाळणीवर आधारित आहे आणि पंजाबला फाळणीच्या वेदना चांगल्याच माहीत आहेत. ही एक अतिशय हृदयस्पर्शी प्रेमकथा आहे. चित्रपटाचे नाव 'मैं वापस आऊंगा' असण्यामागे एक भावनिक कारण आहे. फाळणीच्या वेळी ज्या लोकांनी आपली घरे सोडली, त्यांनी परत येण्याचे वचन दिले होते. अनेकांनी आपल्या घराबाहेर पत्रे सोडली, शेजाऱ्यांकडे आपले दागिने दिले, अगदी मुलांनाही शेजाऱ्यांकडे सोपवले होते. अशाच भावना गुंफलेल्या या चित्रपटाचे संगीत आज आम्ही बीएसएफ आणि भारतातील सर्व सशस्त्र दलांना समर्पित करत आहोत."
हेही वाचा : ४१ वर्षांनंतर 'मासूम'चा सीक्वेल; ए. आर. रहमान करणार निर्मिती आणि संगीत दिग्दर्शन
भारत-पाक फाळणीच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या या 'क्रॉस बॉर्डर' ड्रामामध्ये त्या काळातील प्रेम आणि विरहाच्या अस्वस्थ करणाऱ्या कथा मांडण्यात आल्या आहेत. या चित्रपटात दिलजित दोसांझ, नसीरुद्दीन शाह, शर्वरी वाघ आणि वेदांग रैना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक इम्तियाज अली, संगीतकार ए. आर. रहमान आणि गीतकार इर्शाद कामिल या 'रॉकस्टार', 'तमाशा' आणि 'अमर सिंग चमकीला' सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या यशस्वी त्रिकुटाची पुन्हा एकदा भट्टी जमून आली आहे.
येत्या १२ जून रोजी हा बहुचर्चित चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांच्या साक्षीने आणि रहमान यांच्या सुरांच्या साथीने झालेला हा सोहळा सीमेवर उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी एक आयुष्यभराचा ठेवा ठरला.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -