आज सर्वत्र महाराष्ट्र दिन अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. या विशेष पर्वावर मुंबईतील इराणच्या वाणिज्य दूतावासाने एक खास ट्विट करत सर्वांची मने जिंकली आहेत. या दूतावासाने चक्क मराठी भाषेतून राज्यातील माणुसकीचे आणि इथल्या संस्कृतीचे मोठे कौतुक केले आहे. या सकारात्मक ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक आणि धार्मिक सौहार्दाचा एक अत्यंत सुंदर संदेश दिला आहे.
मुंबईतील इराणच्या वाणिज्य दूतावासाने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून ही खास पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या निसर्गसौंदर्यापासून ते इथल्या अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक गोष्टींची स्तुती केली. पण या ट्विटचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यांनी वापरलेली मराठी भाषा होय. "माणुसकीची ऊबच महाराष्ट्राची खरी ओळख आहे," असे अत्यंत भावस्पर्शी वाक्य त्यांनी अस्सल मराठीत लिहिले आहे.
Jai #Maharashtra!
Grateful to witness the warmth of the people, the remarkable economic energy, & the sheer beauty of nature here.
We had heard so much, but experiencing it firsthand was something else entirely.
माणुसकीची ऊबच महाराष्ट्राची खरी ओळख आहे ❤️ pic.twitter.com/Hk7UHDSsie— Iran in Mumbai (@IRANinMumbai) May 1, 2026
Maharashtra Day: 'जय महाराष्ट्र' म्हणत निसर्गाचे कौतुक
या विशेष ट्विटची सुरुवात 'जय महाराष्ट्र' या शब्दांनी करण्यात आली आहे. इथल्या लोकांची आपुलकी, राज्याची उल्लेखनीय आर्थिक ऊर्जा आणि निसर्गाचे अफाट सौंदर्य अनुभवल्याबद्दल दूतावासाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. आम्ही महाराष्ट्राबद्दल खूप काही ऐकले होते, पण इथला प्रत्यक्ष अनुभव काहीसा वेगळा आणि भन्नाट आहे, अशी भावना त्यांनी या ट्विटमध्ये मांडली आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एका परदेशी आणि विशेषतः इस्लामिक प्रजासत्ताक इराणच्या दूतावासाने दिलेला हा संदेश खूप महत्त्वाचा मानला जात आहे. राज्याची ओळख केवळ विकासामध्ये नसून ती इथल्या माणुसकीत दडली आहे, याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा संदेश दोन देशांमधील मैत्री आणि राज्याच्या धार्मिक तसेच सामाजिक सौहार्दाचे एक उत्तम उदाहरण बनला आहे. सोशल मीडियावर या ट्विटला मोठा प्रतिसाद मिळत असून मराठी बांधवांकडून त्यांचे आभार मानले जात आहेत.