ZP SCHOOLS: जिल्हा परिषदेच्या शाळा ९० टक्के खासगी शाळांपेक्षा सरस; मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 Months ago
रायगड जिल्ह्यात डिजिटल प्रयोगशाळेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रायगड जिल्ह्यात डिजिटल प्रयोगशाळेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई 

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळा आता ९० टक्के खासगी शाळांपेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे शिक्षण देत आहेत, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. रायगड जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत डिजिटल प्रयोगशाळेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

झेडपी शाळांविषयीचा दृष्टिकोन बदलला

एका काळी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पायाभूत सुविधांविषयी आणि इमारतींविषयी नकारात्मक प्रतिमा होती, ती आता मोठ्या प्रमाणावर पुसली गेली आहे. आज या शाळा खासगी शाळांच्या बरोबरीने, काही ठिकाणी तर त्याहून अधिक सक्षमपणे उभ्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये खासगी शाळांमधून विद्यार्थी आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

डिजिटल साक्षरतेवर भर

उद्घाटन करण्यात आलेली नवीन डिजिटल प्रयोगशाळा सर्व वर्गांसाठी ऑडिओ-व्हिज्युअल अभ्यासक्रम उपलब्ध करून देईल. यासोबतच, ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठीही ही सुविधा उपयुक्त ठरेल. "आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर करण्यासाठी हे एक उत्कृष्ट साधन आहे," असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घटनात्मक मूल्ये आणि नागरिक म्हणून कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी 'मूल्य शिक्षण' सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षणातील या सकारात्मक बदलांसाठी शिक्षक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करत, मुख्यमंत्र्यांनी पालकांना आणि गावकऱ्यांना शाळा सुधारणेत सहभागी होण्याचे आवाहन केले. ज्या शाळांमध्ये पालक आणि शाळा व्यवस्थापन समित्या सक्रिय असतात, त्या शाळा सर्वोत्तम संस्था म्हणून उदयास आल्या आहेत, असेही ते म्हणाले. देशाच्या निर्मितीसाठी शिक्षणाचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत, अधिकाऱ्यांनी हे प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.