एप्रिल महिन्यात देशातील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनाने आजवरचा सर्वोच्च विक्रम नोंदवला आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये एकूण जीएसटी संकलन ८.७ टक्क्यांनी वाढून तब्बल २.४३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. देशांतर्गत व्यवहार आणि आयातीमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे हा ऐतिहासिक टप्पा गाठता आला आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात २.२३ लाख कोटी रुपयांचे विक्रमी जीएसटी संकलन झाले होते. यंदा हा जुना विक्रम मोडीत निघाला आहे. एप्रिल २०२६ मध्ये देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा महसूल ४.३ टक्क्यांनी वाढला. यातून सरकारला १.८५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे.
आयातीमधून मिळणाऱ्या जीएसटीमध्ये २५.८ टक्क्यांची प्रचंड मोठी वाढ झाली आहे. यातून ५७,५८० कोटी रुपयांचे संकलन झाले. एप्रिल महिन्यात परताव्याच्या (रिफंड) रकमेतही १९.३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. हा आकडा ३१,७९३ कोटी रुपयांवर गेला आहे.
हे सर्व परतावे वजा केल्यानंतर सरकारचे निव्वळ जीएसटी संकलन २.११ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.३ टक्क्यांची वाढ झाली आहे.