डॉ. फैय्याझ अहमद फैजी
२१ ऑगस्ट हा तोच दिवस आहे जेव्हा महान सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी सनईच्या सूरांनी जागतिक संगीत क्षेत्रात भारताची खास ओळख निर्माण केली आणि यामुळेच संपूर्ण देशाला गौरव मिळाला. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सनईला जीआय टॅगची मान्यता दिली. ही मान्यता उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्याशी अविभाज्यपणे जोडलेल्या या परंपरेला पुन्हा एकदा अधोरेखित करते.
उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या संगीत प्रतिभेने दीडशे वर्षे जुन्या असलेल्या या वाद्याला मोठ्या मंचांवर सादरीकरण करून लोकप्रिय केले. त्यानंतरच हे वाद्य संगीत समारंभ, चित्रपट, संगीत अल्बम आणि इतर माध्यमांत अप्रतिम कौशल्याने वाजू लागले. यामुळे सनईची कीर्ती उपखंडाच्या लोकसंगीतापलीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरली. बनारसच्या पवित्र आध्यात्मिक भावनेला संगीतातून मूर्त रूप देणारा हा कलावंत पस्मान्दा मुस्लिम होता. हा सुखद विरोधाभास केवळ भारतातच घडू शकतो.
जीवनप्रवास...
बिस्मिल्ला खान यांचा जन्म बक्सर जिल्ह्यातील डुमराव गावातील पटहेरी मुहल्ल्यातील भिरुंग साह गल्लीत झाला. ते बचई मियाँ आणि मिठ्ठन बीबी यांच्या घरी जन्माला आले. नातवाला पाहून आजोबांनी ‘बिस्मिल्ला’उच्चारले आणि त्यांचे नाव बिस्मिल्लाच ठेवले गेले. लहानपणी बिस्मिल्ला आपल्या वडिलांसोबत डुमराव किल्ल्यातील बिहारीजी मंदिरात सनई वाजवण्यासाठी जायचे. वयाच्या १०व्या वर्षी ते आपल्या ननिहाल बनारसला गेले आणि तिथलेच झाले. काशी विश्वनाथ मंदिरात त्यांचे चुलते आणि नंतर मामा आरतीच्या वेळी सनई वाजवायचे.
बिस्मिल्ला यांचे मामा विलायती मियाँ यांनी त्यांना शिष्य बनवून संगीताचे शिक्षण दिले. लहान बिस्मिल्ला लवकरच सनई वाजवण्यात निपुण झाले. त्यांनी मामा विलायती मियाँ यांच्यासोबत विश्वनाथ मंदिरात कायमस्वरूपी सनई वाजवण्याचे काम सुरू केले आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी हेच सुरु ठेवले. बनारस पलीकडेही त्यांची ओळख निर्माण झाली. ते सादरीकरणासाठी इतरत्र गेले, मात्र त्यांनी ज्या मातीत कला अवगत केली ती धरती त्यांनी सोडली नाही.
साधी राहणी उच्च विचार
बिस्मिल्ला यांचे संपूर्ण आयुष्य साधेपणा आणि उच्च विचारांनी व्यतीत झाले. त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व नव्हता. धन-दौलतीची हाव त्यांना अजिबात नव्हती. ते पसमंदा हालालखोर मुस्लिम समाजातून आले होते. हा उत्तर भारतातील दलित मुस्लिम समुदाय आहे. पसमंदा मुस्लिम हे अत्यंत आध्यात्मिक असतात आणि बिस्मिल्ला यांचे व्यक्तिमत्त्वही तसेच होते. ते पाच वेळा नमाज पढायचे आणि रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास करायचे. ते काशी विश्वनाथ मंदिरात सनई वाजवायचे आणि गंगेच्या काठावर तासन्तास रियाज करायचे. त्यांचे बनारसी चाहते त्यांना अल्लाह, विश्वनाथ बाबा, माता सरस्वती आणि गंगा मातेचे उपासक मानायचे. त्यांच्यासाठी पसमंदा कवी नझीर बनारसी यांच्या ओळी तंतोतंत लागू होतात...
हिंदू को तो यकीन है कि मुसलमान है नज़ीर,
कुछ मुसलमानों को शक है कि हिंदू तो नहीं...
गंगा आणि बनारसशी अतूट नाते
बिस्मिल्ला गंगेला माता मानायचे. पाच वेळा नमाज जितके महत्त्वाचे होते, तितकेच गंगेत स्नान करणे त्यांच्यासाठी आवश्यक होते. ते रोज सकाळी गंगा घाटावर सनईचा रियाज करायचे आणि तिथेच स्नान करायचे. एकदा अमेरिकेतील एका विद्यापीठाने त्यांना संगीतकार म्हणून येण्याचे निमंत्रण दिले. तेव्हा बिस्मिल्ला यांनी एक अट ठेवली. ते म्हणाले की, मी अमेरिकेत तेव्हाच राहतील,जेव्हा माता गंगा, विश्वनाथ बाबांचे मंदिर आणि संपूर्ण बनारस माझ्यासोबत येईल. हे उत्तर ऐकून अमेरिकन थक्क झाले. परदेशात असताना त्यांना भारताची आठवण यायची आणि भारताच्या इतर भागात असताना बनारसची आठवण यायची. पसमंदा कवी नझीर बनारसी यांनी हे सत्य काही अशा पद्धतीने मांडले,
'सोएंगे तेरी गोद में एक दिन मरके,
हम दम भी जो तोड़ेंगे तेरा दम भरके,
हमने तो नमाजें भी पढ़ी हैं अक्सर,
गंगा तेरे पानी से वजू कर के...'
चित्रपटांमध्ये योगदान
उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी अनेक चित्रपटांत त्यांच्या सनईचे कौशल्य दाखवले. विशेषतः सत्यजित रे यांच्या बंगाली चित्रपट ‘जलसाघर’ (१९५८), विजय भट्ट यांच्या ब्लॉकबस्टर ‘गूंज उठी शहनाई’ (१९५९), विजय यांच्या कन्नड चित्रपट ‘सनादी अप्पण्णा’ (१९७७) मध्ये सुपरस्टार डॉ. राजकुमार यांनी ग्रामीण सनईवादकाची भूमिका साकारली होती. यात ‘बाजे शहनाई हमार अंगना’ (१९८२) या भोजपुरी चित्रपटाचाही समावेश आहे. हा चित्रपट बिस्मिल्ला मूळ गावी डुमराव येथे चित्रित झाला.
आशुतोष गोवारीकर यांच्या ‘स्वदेश’ (२००४) चित्रपटाच्या साउंडट्रॅकसाठी त्यांनी सनई वाजवली, विशेषतः ‘ये जो देस है तेरा’ या गीतातही योगदान दिले. याशिवाय गौतम घोष यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘संगे मील से मुलाकात’ या वृत्तचित्रात उस्ताद स्वतः दिसतात. यात त्यांची एका तरुण सनईवादकापासून भारतातील सर्वश्रेष्ठ कलावंतापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास दाखवला आहे. या योगदानानंतर बिस्मिल्ला चित्रपटसृष्टीत फारसे गुंतले नाहीत. त्यांना सेल्युलॉइड विश्वातील चमक आणि बनावटपणा फारसा आवडत नव्हता. त्यांचे मुख्य लक्ष शास्त्रीय संगीत आणि सनईवर होते. त्यांनी सनईला संगीत समारंभांच्या मंचावर आणले आणि तिचे स्थान अधिक उंचावले.
पुरस्कार आणि सन्मान
उस्ताद बिस्मिल्ला खान यांना २००१ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात आला. ब्राह्मण समाजातील पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शिफारशीवरून दलित समाजातील राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी पसमंदा दलित समाजातील सनई वादकाला भारतरत्नने सन्मानित केल्याचा हा अनोखा योगायोग होता. १९८० मध्ये त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मविभूषण मिळाला. १९६८ मध्ये तिसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मभूषण मिळाला. १९६१ मध्ये चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्री मिळाला. १९५६ मध्ये भारताच्या राष्ट्रीय संगीत, नृत्य आणि नाट्य अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार दिला. मध्य प्रदेश सरकारने त्यांना तानसेन पुरस्काराने सन्मानित केले. १९९२ मध्ये इराण प्रजासत्ताकाने तालार मौसिकी पुरस्कार दिला. १९९४ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचे फेलो बनवले गेले. पुरस्कारांचा हा सिलसिला १९३७ पासून सुरू झाला. तेव्हा कोलकात्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांना तीन पदके मिळाली होती.
परदेश दौरे
१९६६ पर्यंत त्यांनी परदेशातील सादरीकरणाचे निमंत्रण नाकारले होते. पण भारत सरकारने एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवात सादरीकरणासाठी आग्रह केल्यावर ते तयार झाले. यामुळे त्यांना पाश्चिमात्य देशांमध्ये लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी युरोप आणि उत्तर अमेरिकेत अनेकदा सादरीकरण केले. लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉल आणि न्यूयॉर्कमधील कार्नेगी हॉलसह काही प्रतिष्ठित ठिकाणी त्यांनी सादरीकरण केले. याशिवाय कॅन फिल्म कला महोत्सव, ओसाका व्यापार मेळावा आणि मॉन्ट्रियलमधील विश्व प्रदर्शनात जागतिक प्रेक्षकांसाठी सादरीकरण केले.
बिस्मिल्ला यांच्या संगीताने लाल किल्ल्यावर स्वातंत्र्याचा जल्लोष केला. १५ ऑगस्ट १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर जश्न-ए-आझादीसाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उस्ताद बिस्मिल्ला खान यांना बोलावले होते. त्यांच्या जादुई सनईने स्वातंत्र्याच्या उत्सवाला चार चाँद लावले. २६ जानेवारी १९५० मध्ये पहिल्या प्रजासत्ताक दिन समारंभातही त्यांनी सादरीकरण केले. दरवर्षी १५ ऑगस्टला पंतप्रधानांच्या भाषणानंतर सनई वाजवण्याची परंपरा सुरु ठेवली. बिस्मिल्ला यांचे सादरीकरण बराच काळ स्वातंत्र्य दिन समारंभाचे मुख्य आकर्षण मानले जायचे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि शांतिनिकेतनच्या विश्व भारती विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली.
अखेरचा निरोप
२१ ऑगस्ट २००६ मध्ये वयाच्या ९० व्या वर्षी उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची सनई त्यांच्यासोबत फातमान कब्रिस्तानात एका लिंबाच्या झाडाखाली त्यांच्या कबरीत दफन करण्यात आली. त्यावेळी भारत सरकारने एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला होता. भारतीय लष्कराने त्यांच्या अंत्यसंस्कारात २१ तोफांची सलामी दिली. त्यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या स्मृतीत अकादमी स्थापन करण्याची घोषणा केली. २००७ मध्ये संगीत नाटक अकादमीने ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार’ सुरू केला. हा पुरस्कार नृत्य, संगीत आणि रंगमंच क्षेत्रातील तरुण कलावंतांना दिला जातो.
त्यांच्या आठवणीत २१ ऑगस्ट २००८ मध्ये भारतीय टपाल विभागाने ५ रुपयांच्या उत्सव डाक टिकटांची घोषणा केली. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उस्ताद बिस्मिल्ला खान यांना चित्रित करणारे खास डाक टिकट जारी केले. त्यांच्या १०२ व्या जयंतीदिनी गूगलने डूडल बनवून श्रद्धांजली वाहिली. त्यांचे संगीत काळाच्या शेवटपर्यंत टिकेल, “जग संपले तरी संगीत जिवंत राहील.” असे ते स्वतः म्हटले होते. उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी पसमंदा समाजाला आणि भारताला गर्वाचे अनेक क्षण दिले. त्यांनी सनईला जागतिक स्तरावर लोकप्रिय केले. जिथे जिथे सनईचा उल्लेख होईल, तिथे तिथे त्यांची आठवण येत राहील.