झुबिनच्या आठवणीत मस्जिदमधून घुमले सद्भावनेचा सूर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
झुबिन गर्ग यांना मस्जिदमधून श्रद्धांजली
झुबिन गर्ग यांना मस्जिदमधून श्रद्धांजली

 

अरिफुल इस्लाम

प्रसिद्ध सांस्कृतिक प्रतीक असलेले झुबिन गर्ग हे आपल्या संपूर्ण आयुष्यात नेहमीच आसामसाठी एक unifying force राहिले आहेत. आणि त्यांच्या मृत्यूनेही तेच सिद्ध केले. या 'युथ आयकॉन'च्या अकाली निधनाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, ते आपल्या गाण्यांप्रमाणेच आसामला एकत्र जोडणारी शक्ती आहेत. जात, पंथ, धर्म, भाषा आणि वैचारिक मतभेद विसरून, आसाम शुक्रवारपासून प्रत्येक प्रार्थनेत केवळ एकाच नावाची आठवण काढत आहे, आणि ते नाव आहे झुबिन गर्ग.

शुक्रवारी दुपारी सिंगापूरमध्ये समुद्रात पोहताना आकडी आल्याने (seizure attack) गायक-संगीतकार-गीतकार-चित्रपट निर्माता-अभिनेता झुबिन गर्ग यांच्या मृत्यूची बातमी आल्यापासून, संपूर्ण आसाम दुःखात बुडाला आहे. सर्व काही उत्स्फूर्तपणे थांबले. हजारो चाहत्यांनी मंदिरांमध्ये आणि मशिदींमध्ये त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांची प्रत्येक कलाकृती घुमत होती. गुवाहाटीतील ऐतिहासिक 'बुराह जामा मशीद'ही याला अपवाद नव्हती.

शनिवारी संध्याकाळी, नेहमीच्या 'आयात आणि सुरा' (कुराणमधील श्लोक) पठणाच्या प्रथेला छेद देत, प्रिय कलाकाराला आदरांजली वाहण्यासाठी बुराह मशिदीच्या परिसरात झुबिन यांचे सुपरहिट गाणे 'मायाबिनी रातिर बुकुत...' घुमले. मशीद व्यवस्थापनाने आणि मशिदीच्या वसतिगृहातील रहिवाशांनी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यासोबतच, वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी 'जय झुबिनदा', 'झुबिनदा अमर हो' यांसारख्या घोषणा देत, शहरातील मध्यवर्ती भागातील दिघोलीपुखुरीच्या काठापर्यंत मेणबत्ती मोर्चाही काढला.

झुबिन गर्ग यांना तरुण पिढीमध्ये आझान पीर यांचे प्रसिद्ध 'जिकिर' (एक प्रकारचे भक्तिगीत) 'मोर मोन्टो भेद भाय नाय ओ अल्लाह...' (हे देवा, माझ्या मनात कोणताही भेद नाही...) लोकप्रिय करण्याचे श्रेय दिले जाते.

सनी नावाच्या एका वसतिगृह रहिवाशाने सांगितले, "आमचे प्रिय झुबिन गर्ग आता आमच्यात नाहीत. आम्ही, बुराह जामा मशीद वसतिगृहाच्या रहिवाशांनी, मशीद परिसरातून दिघोलीपुखुरीपर्यंत मेणबत्ती मोर्चा काढला. झुबिन गर्ग यांचे निधन हे आमच्या आसाम आणि आसामी समाजासाठी मोठे नुकसान आहे."

मशिदीच्या व्यवस्थापन समितीचे सचिव निजामुल हक म्हणाले, "झुबिन गर्ग ही एक संस्था होती. ते प्रत्येक आसामीच्या हृदयात आहेत. जात, धर्म, वंश आणि भाषा यांच्यापलीकडे ते सर्वांना प्रिय आहेत. पण झुबिन यांच्या मृत्यूने आसामच्या लोकांच्या मनात शंका निर्माण केली आहे की, हा मृत्यू कसा आणि का झाला? याची योग्य चौकशी झाली पाहिजे. आम्ही आसाम सरकारकडे झुबिन यांच्या मृत्यूच्या रहस्याची सखोल चौकशी करण्याची मागणी करतो. सीबीआयने याची चौकशी करावी. आणि, जर झुबिन यांच्या मृत्यूमागे कोणताही घातपात असेल, तर जबाबदार लोकांना सोडले जाऊ नये."

 

 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter