संस्कृती मंत्रालय ७ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर राष्ट्रीय गीत "वंदे मातरम" च्या १५० वर्षांच्या स्मरणोत्सवाचा उद्घाटन सोहळा आयोजित करणार आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. हा कार्यक्रम ७ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२६ या वर्षभराच्या देशव्यापी सोहळ्याचा औपचारिक शुभारंभ असेल, जो भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि आजही राष्ट्रीय अभिमान व एकता जागृत करणाऱ्या या अजरामर रचनेची १५० वर्षे साजरी करेल.
२०२५ हे 'वंदे मातरम'चे १५० वे वर्ष आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे आपले राष्ट्रीय गीत "वंदे मातरम", ७ नोव्हेंबर १८७५ रोजी अक्षय नवमीच्या शुभ मुहूर्तावर लिहिले गेले असे मानले जाते. 'वंदे मातरम' हे गीत प्रथम 'बंगदर्शन' या साहित्यिक नियतकालिकात, त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीचा भाग म्हणून क्रमशः प्रसिद्ध झाले आणि नंतर १८८२ मध्ये ते एका स्वतंत्र पुस्तकाच्या रूपात आले.
त्या काळात भारत मोठ्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय बदलांमधून जात होता आणि राष्ट्रीय ओळख व वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या प्रतिकाराची जाणीव वाढत होती. मातृभूमीला शक्ती, समृद्धी आणि देवत्वाचे प्रतीक मानणाऱ्या या गीताने भारताच्या जागृत होत असलेल्या एकता आणि स्वाभिमानाला काव्यात्मक अभिव्यक्ती दिली. ते लवकरच राष्ट्राप्रती असलेल्या भक्तीचे एक चिरंतन प्रतीक बनले.
२४ जानेवारी १९५० रोजी, संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी घोषित केले की, "वंदे मातरम" ने स्वातंत्र्यलढ्यात ऐतिहासिक भूमिका बजावल्यामुळे, त्याला राष्ट्रगीत "जन गण मन" प्रमाणेच समान सन्मान दिला जाईल.
या सोहळ्याची सुरुवात सकाळी १० वाजता "वंदे मातरम" च्या पूर्ण आवृत्तीच्या सामूहिक गायनाने होईल, जे पंतप्रधानांच्या उपस्थितीतील मुख्य कार्यक्रमासोबतच, देशभरातील सार्वजनिक ठिकाणी आयोजित केले जाईल. यात सर्व नागरिक, शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, अधिकारी, निवडून आलेले प्रतिनिधी, पोलीस कर्मचारी, डॉक्टर, शिक्षक, ड्रायव्हर, दुकानदार आणि समाजातील इतर सर्व घटकांचा सहभाग असेल.
या गीताचे ऐतिहासिक महत्त्व आणि राष्ट्रीय महत्त्व ओळखून, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने १ ऑक्टोबर २०२५ रोजी 'वंदे मातरम'ची १५० वर्षे साजरी करण्यासाठी देशव्यापी उत्सवाला मंजुरी दिली होती. त्यानंतर, राष्ट्रीय अंमलबजावणी समितीने २४ ऑक्टोबर २०२५ रोजी ७ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२६ या वर्षभराच्या सोहळ्याला मंजुरी दिली.
उद्घाटन सोहळ्याच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी एक सांस्कृतिक कार्यक्रम होईल. तसेच, 'वंदे मातरम'च्या १५० वर्षांच्या इतिहासावर आधारित एका विशेष प्रदर्शनाचा (Curated Exhibition) दौरा होईल. भारत मातेला पुष्पांजली वाहिली जाईल. 'वंदे मातरम: नाद एकम्, रूपम् अनेकम्' हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य मंचावर सादर होईल, ज्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिन वादक डॉ. मंजुनाथ म्हैसूर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ७५ संगीतकार विविध पारंपारिक भारतीय संगीत प्रकारांचा संगम सादर करतील.
'वंदे मातरमची १५० वर्षे' या विषयावर एक लघुपट (डॉक्युमेंटरी) दाखवला जाईल. एक स्मारक टपाल तिकीट आणि नाणे यांचे प्रकाशन केले जाईल. व्यासपीठावरील मान्यवर आणि निमंत्रित पाहुण्यांची भाषणे होतील, आणि शेवटी प्रमुख पाहुण्यांचे (पंतप्रधानांचे) मुख्य भाषण होईल. कार्यक्रमाचा समारोप 'वंदे मातरम'च्या सामूहिक गायनाने होईल.
उद्घाटन सोहळ्याशी एकरूपता साधत, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय मंत्रालये/विभाग आणि त्यांची संलग्न/अधीनस्थ कार्यालये आपापल्या कार्यालयाच्या आवारात "वंदे मातरम" चे सामूहिक गायन आयोजित करतील. देशभरातील कार्यालये आणि संस्थांमध्ये एकत्रितपणे पाहण्यासाठी पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण देखील आयोजित केले जाईल.
संस्कृती मंत्रालयाने या मोहिमेसाठी https://vandemataram150.in/ ही एक समर्पित वेबसाइट सुरू केली आहे. यावर सामान्य नागरिक आणि संस्थात्मक सहभागासाठी विविध सुविधा उपलब्ध असतील. यामध्ये मोहिमेचे ब्रँडिंग साहित्य (होर्डिंग, बॅनर), लघुपट आणि प्रदर्शन, सामूहिक गायनासाठी गीताचे बोल असलेले ऑडिओ, तसेच 'कराओके विथ वंदे मातरम' (Karaoke with Vande Mataram) हे वैशिष्ट्य असेल. या 'कराओके'द्वारे नागरिक स्वतः गायलेले गाणे रेकॉर्ड करून पोर्टलवर अपलोड करू शकतील. समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना यात सहभागी होऊन मातृभूमीप्रती आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
देशाच्या सर्व नागरिकांना या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आग्रहाचे आवाहन करण्यात येत आहे. हा आपल्या राष्ट्रीय गीताचा सन्मान करण्यासाठी देशभक्ती आणि कृतज्ञतेचा एक सामूहिक अविष्कार असेल, जे आपल्याला आजही अभिमान, आदर आणि सामायिक ओळखीमध्ये बांधून ठेवते.