भक्ती चाळक
सांस्कृतिक पुणे शहरात इतिहासाच्या कितीतरी पाऊलखुणा विखुरलेल्या दिसतात. शहरातील अनेक कुटुंबांनी हा इतिहास प्रत्यक्षात जगला आहे. पुण्यातील सोहेल शमशुद्दीन शेख यांचे घर म्हणजे अशाच एका जिवंत इतिहासाचे प्रतीक आहे. छत्रपती शहाजीराजे भोसलेंपासून ते पेशवाईपर्यंतच्या आपल्या पूर्वजांच्या सेवेचा आणि पराक्रमाचा वारसा त्यांनी जपून ठेवला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा हा अभिमान आहे पिढ्यानपिढ्या जपलेल्या राजनिष्ठेचा आणि शौर्याचा.
ही कहाणी सुरू होते सुमारे चारशे वर्षांपूर्वी. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी सोहेल शेख यांच्या पूर्वजांना खास सनद बहाल केली होती. ही सनद आजही सोहेल शेख यांनी जीवापाड जपून ठेवली आहे. ते केवळ कागदपत्र नाहीत तर त्यांच्या कुटुंबाच्या गौरवशाली इतिहासाची आणि भोसले घराण्याशी असलेल्या अतूट नात्याची ती साक्ष आहे. शहाजी महाराजांनंतरही शेख कुटुंबाची ही सेवा अविरत सुरू राहिली. पुढे पेशवाईच्या काळातही त्यांचे पूर्वज काझी या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. तब्बल आठ ते दहा पिढ्यांनी स्वराज्याची आणि त्यानंतर पेशव्यांची सेवा केली.
सोहेल शेख यांनी शिवकालीन न्यायनिवाड्याची अनेक कागदपत्रे आणि ऐतिहासिक दाखलेही जपून ठेवलेले आहेत. या कागदपत्रांमधून त्यांच्या पूर्वजांच्या कार्याचा आणि तत्कालीन समाजव्यवस्थेचा अभ्यास करता येतो. आज त्यांची चौदावी पिढी पुण्यात स्थायिक आहे आणि विशेष म्हणजे सेवेचा हा वारसा आजही त्यांनी जपला आहे. त्यांचे पूर्वज जसे राजाच्या आणि राज्याच्या सेवेत होते त्याचप्रमाणे आजची पिढी शासनाच्या सेवेत आहे. खुद्द सोहेल शेख हे आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवत पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलीस दलात सेवा करणारी त्यांची ही पाचवी पिढी आहे.
‘सामाजिक बांधिलकी मिलन समारोप’
दुर्दैव असे की, सोहेल शेख यांच्या कुटुंबाचे हे महान कार्य दुर्लक्षितच होते. परंतु त्यांची ही कहाणी ‘आवाज मराठी’ने व्हिडीओच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचवली आहे. आणि त्यांचा समृद्ध वारसा यामाध्यमातून प्रकाशझोतात आला. त्यानंतर अनेक लहान-मोठ्या न्यूज चॅनल्सनी त्यांच्या मुलाखती घेतल्या. आणि महाराष्ट्रभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात असलेल्या महत्वाच्या पदी असलेले काझी हैदर यांचे वंशज म्हणून त्यांना लोकमान्यता मिळाली. याचेच पुढचे पाऊल म्हणून २ नोव्हेंबरला एक ऐतिहासिक घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांचे भाऊ तंजावरचे राजे व्यंकोजी महाराज यांचे १३ वे वंशज, बाबासाहेब उर्फ फत्तेसिंह राजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव वकील व पारसनिस काझी हैदर शेख यांचे १३ वे वंशज काझी सोहेल शेख यांची ऐतिहासिक भेट झाली.
इतिहासातील धार्मिक सौहार्द वर्तमानातही जपला जातोय, याचेच हे उदाहरण आहे. ही भेट घडवण्यात ‘आवाज मराठी’चे मोठे योगदान आहे. या ऐतिहासिक भेटीविषयी बोलताना सोहेल शेख म्हणतात, “‘आवाज मराठी’ने घेतलेल्या माझ्या मुलाखतीमुळे ही भेट घडून आली. माझा तो व्हिडीओ फत्तेसिंह राजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी लगेच मला संपर्क साधला. त्यानंतर भेटीची तारीख देऊन ते मला भेटायला आले. ही भेट ऐतिहासिक आणि सामाजिक बांधिलकी जपणारी होती म्हणून आम्ही त्या समारंभाला ‘सामाजिक बांधिलकी मिलन समारोप’ नाव दिले.”
ऐतिहासिक क्षण
या विशेष समारंभाला अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली. याविषयी सोहेल शेख म्हणाले, “हा समारंभ खरोखरच ऐतिहासिक ठरला. कारण यावेळी महाराजांच्या मुस्लीम आणि मराठे सरदारांचे वंशज, पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभली होती. हे सगळं पाहून फत्तेसिंह राजे प्रचंड खुश झाले. त्यांनी भारावलेल्या स्वरात परंतु अभिमानाने सर्वांशी संवाद देखील साधला. माझ्या निवास्थानाबाहेर माझ्या पूर्वजांच्या इतिहासाचे दाखले देणारे फलक आम्ही लावले आहेत, त्याचे अनावर राजेंच्या हस्ते केले.”
ते पुढे म्हणाले, “महाराजांशी बोलून आम्हाला नवा इतिहास समजला. पावणे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कर्नाटक स्वारीवर होते तेव्हा ते गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत इतर सरदारांबरोबरच आमचे पूर्वज काजी हैदर हे देखील गेले होते. त्याचवेळी व्यंकोजी आणि माझ्या पूर्वजांची भेट झाली होती.”
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याची भेट गर्वाची गोष्ट’
सोहेल शेख अभिमानाने सांगतात की, “छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सुरुवातीपासून आमच्या मनात आदराचे स्थान आहे. आणि त्यांच्या घराण्याशी आमचे संबंध जोडले जावेत ही खरोखरच खूप गर्वाची गोष्ट आहे. आज पावणे चारशे वर्षानंतर फत्तेसिंह राजे आणि माझी भेट घडण्याचा हा सुवर्ण क्षण होता. या सुवर्ण क्षणाचे भागीदार होण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले याचा आनंद आहे.”
छत्रपती शिवाजी महाराजांचे भाऊ तंजावरचे राजे व्यंकोजी महाराज यांचे १३ वे वंशज, बाबासाहेब उर्फ फत्तेसिंह राजे भोसले यांनी ‘आवाज मराठी’ला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “समाजात एकोपा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने ही भेट अतिशय महत्वाची होती. आज समाजात सुरु असलेले हिंदू-मुस्लिमांमधील वाद थांबावेत आणि पुन्हा आधीसारखे सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे, हा या भेटीमागचा महत्वाचा उद्देश होता.”
ते पुढे म्हणाले, “बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजी राजेंचे जे तत्व होते तेच आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. आणि पुन्हा शिवराज्य स्थापन करायचे आहे. शिवाजी महाराजांच्या धर्तीवरती बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याचे आपल्या सर्वांना पालन करायचे आहे.”
फत्तेसिंह राजे भोसले यांनी समाजात सलोखा निर्माण करण्याच्या दृष्टीने ही भेट घडली असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “आज जातीपातींमध्ये वाद लावून राजकीय लोक आपली पोळी भाजून घेतायेत, ते कुठेतरी थांबले पाहिजे. आणि सर्व समाजाने आपला एकोपा टिकवून ठेवला पाहिजे. एवढीच आमची मनापासून इच्छा आहे.”
विशेष उपस्थिती
या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. त्यामध्ये, फत्तेसिंह राजे भोसले यांच्या पत्नी शुभांगी भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांचे संगमेश्वर फुनगुस येथील अंगरक्षक सरदार नूर खान यांचे वंशज अंजुम हसन खान, संगमेश्वर फुनगुस येथील घोडदळातील सरदार बाबाजी सावंत (देसाई) यांचे वंशज सुनील सावंत देसाई, छत्रपती शिवाजी महाराजांचे मुरुड येथील सरनोबत नाईक यांचे वंशज, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विचारमंचचे अध्यक्ष मुजफ्फर सैय्यद, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विचारमंचचे उपाध्यक्ष दिनेश माटे, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विचारमंचचे सहसचिव लियाकत काळसेकर, शाहू महाराज जयंती उत्सवाचे अध्यक्ष सरदेसाई, खडकचे ए.पी.आय व्हटकर आणि सोहेल शेख यांचे संपूर्ण कुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित होते.