दर्ग्यामधील वसंतोत्सव : भारताच्या सामायिक संस्कृतीचे जिवंत लेणे

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 h ago
दर्ग्यामधील वसंतोत्सव : भारताच्या सामायिक संस्कृतीचे जिवंत लेणे
दर्ग्यामधील वसंतोत्सव : भारताच्या सामायिक संस्कृतीचे जिवंत लेणे

 

हजरत सय्यद नसीरुद्दीन चिश्ती

भारत ही केवळ एक भौगोलिक सीमा नाही, तर शतकानुशतके एकत्र विकसित झालेल्या परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतींचा संगम आहे. या सामायिक वारशाचे सर्वात जिवंत दर्शन म्हणजे दर्गामध्ये साजरा होणारा वसंतोत्सव. ही परंपरा भारताच्या संमिश्र संस्कृतीची आणि बहुविधतेची साक्ष आजही देत आहे.

दर्गामध्ये बसंत साजरा करण्याची मुळे इतिहासात आणि प्रामुख्याने सुफी अध्यात्मात खोलवर रुजलेली आहेत. सुफी संतांनी धर्माला कधीही केवळ कर्मकांडापुरते मर्यादित ठेवले नाही. त्याऐवजी त्यांनी धर्माला प्रेम, मानवता आणि वैश्विक बंधुभावाचा संदेश मानले. बसंतसारख्या सांस्कृतिक उत्सवांच्या माध्यमातून त्यांनी अशा जागा निर्माण केल्या, जिथे विविध धर्मांचे लोक धार्मिक आणि सामाजिक भिंती ओलांडून एकत्र येऊ शकले.

 

बसंत हा सण वसंत ऋतूचे आगमन आणि जीवनाच्या नूतनीकरणाचे प्रतीक आहे. हा सण आनंद, आशा आणि सलोख्याशी जोडलेला आहे. जेव्हा हा उत्सव दर्गामध्ये साजरा होतो, तेव्हा त्याला अधिक गहिरा सांस्कृतिक अर्थ प्राप्त होतो. विविध धर्म आणि समुदायांचे भाविक यात एकत्र सहभागी होतात, प्रार्थना करतात आणि परस्परांबद्दल आदर व्यक्त करतात. या सोहळ्यातील ही विविधता भारताच्या सहअस्तित्वाच्या परंपरेचे दर्शन घडवते.

भारताच्या सामायिक संस्कृतीने नेहमीच धार्मिक परंपरांना नैसर्गिकरीत्या एकमेकांत मिसळण्याची संधी दिली आहे. दर्गामधील बसंत उत्सव हे याचे उत्तम उदाहरण आहे की, सांस्कृतिक पद्धती कशा प्रकारे एका धर्माच्या चौकटीबाहेर जाऊन विकसित होतात. हे सिद्ध करते की भारतातील अध्यात्म ऐतिहासिकदृष्ट्या सर्वसमावेशक आणि मानवी मूल्यांनी समृद्ध राहिले आहे. धर्म हा मुळात लोकांना जोडण्यासाठी असतो, तोडण्यासाठी नाही, यावर अशा परंपरा भर देतात.

दर्गा हे पारंपारिकपणे शांतता आणि सलोख्याचे केंद्र राहिले आहेत. अजमेर शरीफ आणि देशातील इतर प्रमुख दर्गांनी धर्म, भाषा किंवा सामाजिक दर्जाचा विचार न करता सर्व स्तरांतील लोकांचे स्वागत केले आहे. या पवित्र जागांवर बसंत साजरा करणे, सामाजिक बंध अधिक घट्ट करते आणि जातीय सलोख्याला प्रोत्साहन देते.

आजच्या काळात, जेव्हा धार्मिक मतभेदांचा वापर समाजात फूट पाडण्यासाठी केला जातो, तेव्हा दर्गामधील बसंत उत्सवाचे महत्त्व अधिक वाढते. हा उत्सव असहिष्णुतेला दिलेले एक शांत पण प्रभावी उत्तर आहे. भारताची खरी ताकद ही विविधतेचा स्वीकार करून ती एकतेचे साधन म्हणून साजरी करण्यात आहे, याची आठवण हा सण करून देतो.

भारताची तुलना एका मौलवान माळेसारखी करता येईल, ज्यामध्ये विविध धर्म, संस्कृती आणि सभ्यतांचे मोती विणलेले आहेत. दर्गामधील बसंतची परंपरा हा त्यातीलच एक अनमोल मोती आहे. ही परंपरा राष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैविध्यात भर घालते आणि जागतिक स्तरावर भारताची ओळख 'विविधतेत एकता' असलेला देश म्हणून अधोरेखित करते.

दर्गामधील बसंत हा केवळ एक विधी नाही, तर तो पिढ्यानपिढ्या चालत आलेला सांस्कृतिक वारसा आहे. तो हा कालातीत संदेश देतो की, माणसाची ओळख धार्मिक लेबलांवरून नाही, तर माणुसकी आणि सामायिक आपलेपणावरून ठरते. याच विचारसरणीने शतकानुशतके आव्हाने आणि बदल असूनही भारताची एकता टिकवून ठेवली आहे.

जोपर्यंत दर्गामध्ये बसंतसारख्या परंपरा साजरी होत राहतील, तोपर्यंत भारताच्या सामायिक संस्कृतीचा आत्मा जिवंत राहील. प्रेम, शांतता आणि सहअस्तित्व ही मूल्ये भारताचा प्राण आहेत आणि हे सण त्याचे जिवंत पुरावे आहेत.

(लेखक अजमेर दरगाहचे विद्यमान अध्यात्मिक प्रमुख (सज्जादानशीन) यांचे वारसदार आणि 'ऑल इंडिया सुफी सज्जादानशीन कौन्सिल'चे अध्यक्ष आहेत.)