ग्रँट रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला दिमाखात उभे असलेले इराणी कॅफे 'बी. मेरवान अँड कंपनी'
मुंबईच्या ग्रँट रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला दिमाखात उभे असलेले आणि खवय्यांचे लाडके इराणी कॅफे 'बी. मेरवान अँड कंपनी' (B. Merwan and Co.) अखेर बंद झाले आहे. तब्बल १११ वर्षांच्या अविरत सेवेनंतर या ऐतिहासिक हॉटेलने मुंबईकरांचा निरोप घेतला. १ जानेवारी २०२६ पासून हॉटेलच्या बाहेर 'आम्ही बंद आहोत' अशी पाटी लागली असून, मावा केक आणि बन-मस्कासाठी प्रसिद्ध असलेल्या या वास्तूवर आता कायमचे टाळे लागले आहे.
१९१४ मध्ये बोमन मेरवान यांनी सुरू केलेले हे हॉटेल मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग होते. मात्र, आता कुटुंबातील सदस्यांचे वाढते वय आणि मनुष्यबळाची कमतरता यामुळे हा कठीण निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाबद्दल बोलताना तिसऱ्या पिढीतील मालक आणि गेल्या ८ वर्षांपासून हॉटेलचा कारभार पाहणारे दारायस अंकलेसरिया यांनी मुलाखतीत सांगितले की, "बी. मेरवान चालू ठेवण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने अपार कष्ट घेतले. मात्र, एका भागीदाराचे नुकतेच निधन झाले आणि आम्ही सर्वजण आता वृद्ध होत आहोत. त्यामुळे हॉटेल बंद करणे हाच आमच्यासाठी योग्य निर्णय होता. हे हॉटेल केवळ शहराचीच नाही, तर आमच्या कुटुंबाचीही शान होते."
मावा केकचा सुगंध इतिहासजमा
सकाळी ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांची नाश्त्यासाठी इथे नेहमीच झुंबड उडत असे. विशेषतः येथील मवा केकची चव चाखण्यासाठी लोक लांबून येत असत. अनेकदा सकाळी ९ वाजेपर्यंतच येथील सर्व मावा केक संपून जात. स्वस्त आणि चवदार नाश्ता हे या हॉटेलचे वैशिष्ट्य होते. उंच छत, गोलाकार लाकडी खुर्च्या आणि संगमरवरी टेबले यामुळे या हॉटेलला एक खास विंटेज लूक प्राप्त झाला होता.
२०१४ मध्येही हे हॉटेल बंद होणार असल्याच्या चर्चा होत्या, पण त्यावेळी दुरुस्तीनंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले होते. मात्र, यावेळी हा निर्णय अंतिम आहे. हॉटेल बंद झाल्याने मुंबईकरांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे. काहींना तर आपला शेवटचा चहा किंवा मवा केक खाण्याची संधीही मिळाली नाही, याचे दुःख वाटत आहे.