कॅन्सरवर मात करून जनजागृतीचा ध्यास घेतलेल्या 'इनू'ला महाराष्ट्र शासनाचा साहित्य सन्मान!

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
महाराष्ट्र शासनाचा सन्मान स्विकारताना लेखक युनुस सय्यद
महाराष्ट्र शासनाचा सन्मान स्विकारताना लेखक युनुस सय्यद

 

भक्ती चाळक 

संकटे माणसाला संपवायला येतात की घडवायला? या प्रश्नाचे जिवंत उत्तर शोधायचे असेल तर युनुस सय्यद यांच्याकडे पाहावे लागेल. फर्ग्युसन कॉलेजमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेत असताना रक्ताच्या कर्करोगाने त्यांच्या आयुष्यात अचानक प्रवेश केला. पुढील वर्षभर मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. त्या काळात त्यांना तब्बल १३ वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागला. दोन वेळा तर प्रकृती इतकी खालावली की जगण्याची आशा उरली नव्हती. आयसीयूमध्ये त्यांना पाहणाऱ्या मित्रांना ही आपली शेवटची भेट असेल असेच वाटले होते. मात्र आज युनुस मृत्यूला हुलकावणी देत हजारो रुग्णांसाठी आशेचा किरण बनले आहेत. त्यांच्या याच संघर्षावर आधारित 'इनुची गोष्ट' या पुस्तकाला नुकताच महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा 'लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार' प्राप्त झाला आहे.

पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना युनुस म्हणाले की, "पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी मी कोकणात कॅन्सर अवेअरनेसचं काम करत होतो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड याठिकाणी. एका ठिकाणी मी मेडिकल ऑफिसर्स आणि प्रायमरी हेल्थ सेंटरच्या कर्मचाऱ्यांचे पॅलिएटिव्ह सेंटर आणि कॅन्सर पेशंटची कशी काळजी घ्यावी यावर सेशन घेत होतो. आणि योगायोगाने मी त्या गावात होतो जिथून लक्ष्मीबाई टिळकांचं गाव तिथून जवळ होतं आणि पुरस्कार देखील त्यांच्याच नावाने आहे. तर लक्ष्मीबाई टिळकांचं जे सासरचं गाव आहे ते तिथं होतं. आणि योगायोगाने ज्या विषयावर पुस्तक आहे त्याच कॅन्सर अवेअरनेसचं काम देखील मी करत होतो."
 

अनुभवातून जन्मलेली 'इनुची गोष्ट'

कर्करोगावर उपचार घेत असताना युनुस यांना अनेक अडचणी आल्या. उपचारांचा मोठा खर्च, योग्य आहार, इंजेक्शन घेताना घ्यायची काळजी आणि पाणी पिण्याच्या शास्त्रीय पद्धती अशा अनेक गोष्टींची माहिती सामान्य रुग्णांकडे नसते. बऱ्याचदा अनेक गोष्टी अनुभवातूनच शिकाव्या लागतात. आवाज-द-व्हॉईस'सोबत बोलताना युनुस सांगतात, "मला आलेल्या या सर्व समस्यांवर मी स्वतः तोडगे शोधले. माझ्या या प्रवासाचा आणि अनुभवांचा फायदा इतर रुग्णांना व्हावा, या विचाराने मी डायरी लिहायला सुरुवात केली." याच डायरीचे रूपांतर पुढे पुस्तकात झाले. युनुस यांचे टोपणनाव 'इनू' असल्यामुळे पुस्तकाला 'इनुची गोष्ट' हे नाव दिले गेले आणि त्याची टॅगलाईन 'अजून मी जिवंत आहे' अशी ठेवण्यात आली.

आईचा अफाट त्याग आणि मुंबईतील स्ट्रगल

युनुस यांच्या या प्रवासात त्यांच्या आईचा वाटा सर्वात मोठा आहे. त्यांच्या आईने कधी गाव सोडून पुणेही पाहिले नव्हते. युनुस यांच्या उपचारासाठी त्या थेट मुंबईच्या स्लम एरियात रेंटवर रूम घेऊन राहिल्या. युनुस सांगतात, "माझ्यापेक्षा जास्त स्ट्रगल माझ्या आईचा होता. मुंबईची गर्मी, तिथले वातावरण आणि माझ्या आजारपणामुळे होणारी ओढाताण तिने वर्षभर सहन केली." आजारपणामुळे अंथरुणावर असताना युनुस जुन्या गोष्टी आठवून लिहून काढत असत. त्या कठीण काळात सोबत असलेल्या आईला आणि मित्रांना विचारून त्यांनी प्रत्येक घटना शब्दांत गुंफली.
 

केवळ आत्मकथा नव्हे, तर 'लाईफ गाईड'

'इनुची गोष्ट' हे पुस्तक केवळ कर्करोग रुग्णांपुरते मर्यादित राहिले नाही. एकाच वर्षात १३ आजारांशी लढून बाहेर पडलेल्या तरुणाची ही कथा वाचून अनेक सामान्य लोकही प्रेरित होत आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने ८० पुस्तकांतून या पुस्तकाची निवड केली. वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी प्रौढ वाङ्मय प्रकारातील आत्मचरित्रासाठी राज्य पुरस्कार मिळवणारे युनुस हे या वर्षीचे सर्वात तरुण साहित्यिक ठरले आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही साहित्यिक किंवा मोठ्या शैक्षणिक पार्श्वभूमीशिवाय केवळ अनुभवाच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले आहे.

युनुस पुढे सांगतात, "माझे पुस्तक पुणे बुक फेस्टिवलमध्ये २०२४ च्या शेवटी प्रकाशित झालं. प्रकाशित झाल्यानंतर त्याला पुणे बुक फेस्टिवलचाच 'नवलेखक' नावाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर मग ते पुस्तक बऱ्याच कॅन्सर पेशंटला वगैरे वाचता यायला लागलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे उपचार झालेले रुग्णालय टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मागील वर्षी कॅन्सर डेला मला गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि तिथे पण पुस्तकाचा अनौपचारिक प्रकाशन सोहळा झाला." 

कर्करोग जनजागृतीसाठी 'आरंभ'

युनुस यांनी केवळ पुस्तक लिहून थांबण्याचे ठरवले नाही, तर आरंभ नावाची एनजीओ स्थापन केली आणि ते प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत. ते सांगतात, "कर्करोग झाला म्हणजे आयुष्य संपले असे समजू नका. सध्या आधुनिक वैद्यकशास्त्रात इम्युनोथेरपी आणि टार्गेट थेरपीसारखे चांगले पर्याय उपलब्ध आहेत." त्यांनी टाटा हॉस्पिटलमधील उपचारांच्या प्रक्रियेवर बनवलेला व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला. त्यातील कित्येक लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि अडीच हजार लोक प्रत्यक्षात उपचारासाठी दाखल झाले. आज त्यातील ८५ टक्क्यांहून अधिक लोक सकारात्मक आयुष्य जगत आहेत.
 

सामाजिक जाणिवांचे भान 

युनुस सध्या 'कर्करोग जनजागृती यात्रा' काढत आहेत. पुणे ते कोल्हापूर आणि कोकण अशा भागांत ते मेडिकल ऑफिसर्स आणि सामान्य लोकांसाठी सेमिनार घेतात. या वर्षी ७ हजार लोकांपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यांच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानांवर महाराष्ट्रातील कर्करोग रुग्णालयांची यादी आणि सरकारी योजनांची माहिती दिली आहे. 

युनुस सांगतात, "मागच्या वर्षी मी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना एक पत्र दिलं. त्यामध्ये HPV व्हॅक्सीन आणि पॅलिएटिव्ह सेंटर संदर्भात काम केलं पाहिजे अशी मागणी केली होती. आणि सुदैवाने ९ फेब्रुवारीला पॅलिएटिव्ह सेंटर संदर्भात त्यांनी जीआर (GR) काढला आणि आता महिला दिनानिमित्त १४ वर्षांच्या मुलींना HPV व्हॅक्सीन देण्याचं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे."

येणाऱ्या काळात युनुस स्पर्धा परीक्षेच्या प्रवासावर आधारित कादंबरी आणि कर्करोगाशी संबंधित प्रेरणादायी कथासंग्रह लिहिणार आहेत. वास्तव कल्पनेपेक्षाही भयंकर असते, त्यामुळे जे प्रत्यक्ष पाहिले त्यावरच लिहिण्याचा त्यांचा मानस आहे. युनुस सय्यद यांचा हा प्रवास 'हार न मानणाऱ्या' प्रत्येक माणसासाठी एक मोठी ऊर्जा देणारा आहे.
 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter