५९९ डॉलर्सचा 'मॅकबुक निओ' लाँच; स्वस्त विंडोज लॅपटॉपच्या वर्चस्वाला बसणार धक्का

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

ॲपलने बुधवारी (४ मार्च २०२६) आपल्या उत्पादनांच्या श्रेणीत एक ऐतिहासिक बदल करत आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 'मॅकबुक निओ' (MacBook Neo) जागतिक बाजारपेठेत उतरवला आहे. अमेरिकेत याची किंमत अवघी ५९९ डॉलर्स (सुमारे ५०,००० रुपये) ठेवून ॲपलने सर्वांनाच चकित केले आहे. भारतात या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत ६९,९०० रुपये असून, विद्यार्थ्यांसाठी हा लॅपटॉप ५९,९०० रुपयांत उपलब्ध होणार आहे.

विंडोज आणि क्रोमबुकला थेट आव्हान

गेल्या अनेक वर्षांपासून ५० ते ७० हजार रुपयांच्या लॅपटॉप सेगमेंटमध्ये एचपी, डेल, लेनोवो आणि एसर या विंडोज लॅपटॉप कंपन्यांचे वर्चस्व होते. तसेच शिक्षण क्षेत्रात स्वस्त क्रोमबुकचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता. ॲपलने 'निओ'च्या माध्यमातून आता थेट या मोठ्या ग्राहक वर्गाला आपलेसे करण्याची रणनीती आखली आहे. अनुभवी विश्लेषकांच्या मते, या एका उत्पादनामुळे ॲपलच्या महसुलात मोठी भर पडू शकते.

आयफोन चिपची जादू

मॅकबुक निओचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात वापरलेली ए१८ प्रो (A18 Pro) ही चिप. हीच चिप ॲपलने आपल्या आयफोन १६ प्रो (iPhone 16 Pro) मध्ये वापरली होती. लॅपटॉपमध्ये पहिल्यांदाच आयफोनची चिप वापरून ॲपलने उत्पादन खर्च कमी केला आहे, तरीही कामगिरीच्या बाबतीत हा लॅपटॉप कुठेही मागे पडत नाही. इंटेल कोअर अल्ट्रा ५ (Intel Core Ultra 5) असलेल्या विंडोज लॅपटॉपच्या तुलनेत मॅकबुक निओ ५० टक्के जास्त वेगवान असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये आणि डिझाइन

  • डिस्प्ले: १३ इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले (२४०८ x १५०६ रिझोल्यूशन) आणि ५०० नीट्स ब्राइटनेस.

  • प्रोसेसर: ६-कोअर सीपीयू आणि ५-कोअर जीपीयूसह ए१८ प्रो चिप.

  • बॅटरी: एका चार्जवर तब्बल १६ तासांचा बॅटरी बॅकअप.

  • रॅम आणि स्टोअरेज: ८ जीबी युनिफाइड मेमरी आणि २५६ जीबी किंवा ५१२ जीबी एसएसडी स्टोअरेज.

  • रंग: सिल्व्हर, इंडिगो, ब्लश आणि सायट्रस अशा चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध.

  • इतर: १०८० पी फेसटाइम कॅमेरा, मॅजिक कीबोर्ड, टच आयडी (५१२ जीबी मॉडेलमध्ये), आणि दोन यूएसबी-सी पोर्ट्स.

हा लॅपटॉप फॅनलेस (Fanless) आहे, त्यामुळे तो चालताना अजिबात आवाज करत नाही. तसेच यात 'ॲपल इंटेलिजन्स' (AI) फीचर्सचा वापर अत्यंत प्रभावीपणे करता येतो. जे ग्राहक मॅकबुक एअर महाग असल्यामुळे विंडोजकडे वळत होते, त्यांच्यासाठी मॅकबुक निओ हा एक परिपूर्ण पर्याय ठरला आहे. यामुळे ॲपलच्या इकोसिस्टममध्ये नवीन वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.

मॅकबुक निओसाठी प्री-ऑर्डर सुरू झाली असून ११ मार्च २०२६ पासून त्याची विक्री सुरू होणार आहे.