अजमेर शरीफमध्ये बसंत उत्सवाने झाले गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 h ago
अजमेर शरीफमध्ये बसंत उत्सवाने झाले गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन
अजमेर शरीफमध्ये बसंत उत्सवाने झाले गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन

 

अजमेर शरीफ

ख्वाजा गरीब नवाज यांच्या अजमेर शरीफ दरगाहमध्ये आज पारंपारिक 'बसंत' उत्सव अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दरगाहचे वंशपरंपरागत सज्जादानशीन यांचे वारसदार (जानशीन) हजरत सय्यद नसीरुद्दीन चिश्ती यांच्या अध्यक्षतेखाली हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. हा उत्सव भारताच्या समृद्ध 'गंगा-जमुनी' संस्कृतीचे आणि जातीय सलोख्याचे जिवंत उदाहरण ठरला.

या खास प्रसंगी, दरगाहच्या वंशपरंपरागत कव्वालांनी निजाम गेटपासून आस्ताना-ए-शरीफपर्यंत मिरवणूक काढली. त्यांच्या हातात 'बसंत गडबा' (पिवळ्या फुलांचे पात्र) होते आणि ते मुखातून 'बसंती कलाम' (सुफी काव्य) गात होते. या पारंपरिक वातावरणात हजरत सय्यद नसीरुद्दीन चिश्ती यांनी ख्वाजा साहेब (र.अ.) यांच्या पवित्र मजारवर 'बसंत' अर्पण केला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हजरत सय्यद नसीरुद्दीन चिश्ती म्हणाले, "अजमेर शरीफमध्ये साजरा होणारा बसंत उत्सव ही भारताच्या अनमोल परंपरेचे प्रतीक आहे. येथे विविध धर्म आणि पंथांचे लोक प्रेमाने आणि बंधुभावाच्या भावनेने एकत्र येतात आणि एकमेकांच्या प्रथांचा आदर करतात."

ते पुढे म्हणाले की, भारताच्या परंपरा, विधी, संस्कृती आणि मूल्यांनी शतकानुशतके समाजाला एकत्र ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सुफी परंपरांनीच एकमेकांच्या श्रद्धा आणि आध्यात्मिक पद्धतींबद्दल आदर निर्माण केला असून, त्यामुळे जातीय सलोखा अधिक दृढ झाला आहे. सुफी संत आणि आध्यात्मिक महापुरुषांनी या परंपरांचे जतन केले, म्हणूनच आजही दरगाहमध्ये बसंतसारखे सण भक्तीने साजरे केले जातात.

"भारत एक मजबूत आणि मौलवान माळ आहे, ज्यामध्ये विविध धर्म, सभ्यता आणि संस्कृतींचे मोती सुंदरपणे गुंफलेले आहेत. याच वैविध्यामुळे देशाला जागतिक ओळख मिळाली आहे," असे उद्गार चिश्ती यांनी काढले. धर्माच्या नावावर द्वेष आणि फूट पाडू पाहणाऱ्यांना हा सोहळा एक स्पष्ट संदेश आहे, कारण खरा धर्म हा मानवता, शांतता आणि हृदये जोडण्याची शिकवण देतो. गेल्या ८०० वर्षांहून अधिक काळ अजमेर शरीफ दरगाह केवळ प्रेम, शांतता आणि द्वेष निर्मूलनाचा संदेश पसरवत असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले.