 
                                
भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती. हा दिवस देशभर 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा केला जातोय. 'भारताचे बिस्मार्क' आणि 'लोहपुरुष' म्हणून ओळखले जाणारे सरदार पटेल हे ५६५ संस्थानांच्या विलीनीकरणासाठी ओळखले जातात.
संस्थानांच्या विलीनीकरणाचा विषय सरदार वल्लभभाई पटेलांनी अगदी कौशल्याने हाताळला. भारत एकसंध होण्यात त्यांचं योगदान सर्वमान्य आहे. पण काश्मीर प्रश्नावर सरदार पटेल यांचे मत काय होते आणि त्यांची भूमिका काय होती, हे जाणून घेऊया.
सरदार वल्लभभाई पटेल यांचे राजकीय सचिव असलेले व्ही. शंकर त्यांच्या 'माय मेमोयर्स विथ सरदार पटेल' या पुस्तकात लिहितात, 'जम्मू आणि काश्मीर भारताचा भाग होईल अशी महात्मा गांधींना अपेक्षा होती आणि त्यांनी द्विराष्ट्र सिद्धांत नाकारला होता.' ते लिहितात की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा निर्णय पूर्णपणे जम्मू आणि काश्मीरचे शासक महाराजा हरिसिंह यांच्यावर सोपवला होता.
'महाराजांना आपले आणि आपल्या राज्याचे हित पाकिस्तानबरोबर जाण्यात आहे, असे समजले तर ते (पटेल) आपल्या मार्गात येणार नाहीत,' असे सरदार पटेलांचे व्यवहार्य मत होते. परंतु नंतरच्या काळात पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले आणि सरदार पटेलांना काश्मीर भारतात विलीन करण्याची संधी चालून आली. भारताने काश्मीरचा राजा हरिसिंगाशी करार करून काश्मीर भारतात विलीन करून घेतले.
स्वातंत्र्यपूर्व काळात माउंटबॅटन यांचे राजकीय सल्लागार तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांचे सचिव म्हणून काम पाहिलेले व्ही.पी. मेनन यांनी भारतातील संस्थानांच्या विलीनीकरणाविषयी एक पुस्तक लिहिले आहे. मेनन यांनी त्यांच्या 'इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स' नावाच्या पुस्तकात तत्कालीन घडामोडींचा तपशील दिला आहे.
ते लिहितात की, १८ ते २३ जून १९४७ ला लॉर्ड माउंटबॅटन काश्मीरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महाराजा हरिसिंह यांना सांगितले की, 'जर काश्मीर पाकिस्तानसोबत गेले तर भारत सरकारसोबतचे संबंध कमकुवत होणार नाहीत.' एवढेच नाही, तर सरदार पटेल यांच्याकडून या संदर्भात पूर्ण आश्वासनही देण्यात आल्याचे माउंटबॅटन म्हणाले होते.
तसेच शेषराव मोरे यांनी आपल्या 'काश्मीर एक शापित नंदनवन' या पुस्तकात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या काश्मीरविषयक दृष्टिकोनाबद्दल चर्चा केली आहे. त्यांच्या मते, सरदार वल्लभभाई पटेल यांचे काश्मीरविषयक धोरण हे अतिशय व्यवहार्य होते. काश्मीर हा मुस्लिमबहुल होता तसेच त्याची सीमाही पाकिस्तानला लागून आहे. त्यामुळे पाकिस्तान फाळणीच्या अटींनुसार काश्मीर पाकिस्तानात विलीन होऊ शकत होता.
परंतु पाकिस्तानने हल्ला केला आणि सरदार वल्लभभाई पटेल, पंतप्रधान नेहरू यांनी वेळ न घालवता तातडीने करार करून काश्मीरसुद्धा भारतात विलीन करून घेतला आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग झाला. एकंदरीतच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यामुळे भारत आज एकसंध आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
