'ही-मॅन' ते 'सत्यकाम': धर्मेंद्र नावाचं गारूड!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र

 

मंजीत ठाकूर

हिंदी सिनेसृष्टीचा तो काळ ॲक्शन हिरो, मसाला चित्रपट आणि बड्या स्टारडमचा होता. त्या झगमगाटातही धर्मेंद्र यांनी प्रवाहाविरुद्ध पोहत अशा काही चित्रपटांत काम केले, जे मुख्य प्रवाहापेक्षा पूर्णपणे वेगळे होते.

आज आपण धर्मेंद्र यांना ओळखतो ते 'शोले'मधल्या ‘बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना’ अशी डरकाळी फोडणाऱ्या रागीट नायकाच्या रूपात. पण या 'मसल मॅन' प्रतिमेच्या पलीकडे जाऊन त्यांनी एक संवेदनशील मन जपले. सामाजिक रूढींशी दोन हात करणारे आणि अंतर्मनाचा ठाव घेणारे नायक त्यांनी पडद्यावर जिवंत केले.

सिनेमाच्या दुनियेत धर्मेंद्र यांची ओळख 'ही-मॅन' अशीच. पण या ब्लॉकबस्टर प्रतिमेला छेद देत त्यांनी 'डोळ्यांनी अभिनय' करणारे चित्रपटही केले.

अशा चित्रपटांच्या यादीत अग्रक्रमाने नाव येते ते 'बंदिनी'चे. १९६३मध्ये हा चित्रपट आला तेव्हा धर्मेंद्र यांची कारकीर्द नुकतीच बहरू लागली होती. हुगळी नदीच्या काठावरच्या त्या तुरुंगाने प्रेक्षकांना जाणीव करून दिली की, 'स्वातंत्र्य' हे केवळ राजकीय नसते, तर ते मानसिकही असते.

'बंदिनी'मध्ये धर्मेंद्र यांनी साकारलेला डॉ. देवेंद्र आजही लक्षात राहतो. कपाळावर 'ही-मॅन'चा शिक्का असताना अशी संयत भूमिका स्वीकारणे त्या काळी धाडसाचेच होते. पण एका जेल-डॉक्टरचा शांत, संवेदनशील आणि नजरेला नजर देण्यापूर्वी विचार करणारा स्वभाव त्यांनी अगदी सहजतेने वठवला.

या चित्रपटाचे परीक्षण करताना 'द क्विंट'मध्ये एका समीक्षकाने नंतर लिहिले होते, "एक तरुण, करिश्माई आणि संवेदनशील जेल डॉक्टर... जो 'कैदी म्हणजे वाईट माणसं' यावर विश्वास ठेवत नाही. माझ्या पिढीसाठी धर्मेंद्र आणि तुरुंग म्हणजे 'शोले'मध्ये पाण्याच्या टाकीवर उभे राहून 'चक्की पीसिंग' ओरडणारी प्रतिमा. पण 'बंदिनी'मध्ये ते काहीतरी वेगळेच आहेत."

केवळ 'ॲक्शन-रॉबस्ट' हिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांनी ही चौकट मोडून काढत अभिनयाची वेगळी उंची गाठली.

त्यांच्या कारकिर्दीतील असाच दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९६६चा 'अनुपमा'. दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जींच्या या चित्रपटात धर्मेंद्र यांनी अशोक नावाच्या शिक्षक-कवीची भूमिका साकारली. हे पात्र म्हणजे कणखरपणा आणि नजाकत यांचा सुरेख संगम होता.

डॉ. स्नेहा कृष्णन यांनी या चित्रपटाबद्दल लिहिले, "धर्मेंद्र यांनी आपल्या सुरुवातीच्या काळातच एक उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला आहे. पडद्यावरचा त्यांचा वावर काळजी घेणारा, प्रेरक आणि लोभसवाणा आहे."

'अनुपमा'मधील शिक्षक-कवीच्या रूपातील त्यांच्या संयत स्वभावाने त्यांच्यातील अभिनेत्याचा आणखी एक पैलू उलगडला. हे पात्र त्यांच्या दणकट फिल्मी प्रतिमेपासून कोसो दूर होते. यात ना हातात मोठी मशीनगन होती, ना कोणता थरारक ॲक्शन सिक्वेन्स. होती ती फक्त एक संथ संवेदना आणि सांस्कृतिक बेड्या तोडण्याची कहाणी. धर्मेंद्र यांच्या डोळ्यांत आणि त्यांच्या संयमात तो साधेपणा दिसला, ज्याने त्या काळातील 'नायक' या संकल्पनेलाच आव्हान दिले होते.

धर्मेंद्र यांच्या अशा वेगळ्या वाटेवरच्या चित्रपटांची यादी 'सत्यकाम' शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. १९६९मध्ये आलेला हा चित्रपट त्यांच्या अभिनय प्रवासातील मैलाचा दगड मानला जातो.

यात त्यांनी सत्यप्रिय आचार्य नावाच्या एका तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक इंजिनियरची भूमिका केली होती. आपल्या तत्वांसाठी तो त्या काळातील सामाजिक जडणघडण, नातेसंबंध आणि व्यवस्थेशी एकाकी झुंज देतो.

'द इंडियन एक्सप्रेस'ने नंतर या चित्रपटाचा उल्लेख करताना लिहिले की, हृषिकेश मुखर्जींच्या 'सत्यकाम'मध्ये धर्मेंद्र यांनी त्यांची सर्वात वास्तववादी कामगिरी केली होती. हा चित्रपट पाहताना त्यांच्या डोळ्यांची खोली आणि आवाजातील चढउतार तर भिडतातच, पण या चित्रपटातील त्यांचे 'मौन' (किंवा पॉज) अभिनयाला एका वेगळ्याच उंचीवर नेते.

'सत्यकाम'च्या क्लायमॅक्समध्ये, जेव्हा धर्मेंद्र यांचे पात्र पाहते की त्याचा आयुष्यभराचा आदर्श डोळ्यांदेखत तुटत आहे—तेव्हा त्यांच्या नजरेत निराशा, दृढनिश्चय आणि स्वतःलाच पडलेल्या प्रश्नांचा कोलाहल... हे तिन्ही भाव एकाच वेळी दिसतात.

हा भाग अलाहिदा की सिने-समीक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले, पण प्रेक्षकांना ते चित्रपटगृहापर्यंत खेचून आणू शकले नाहीत. बॉक्स ऑफिसच्या गणितात जरी हे यश नसले, तरी अभिनयाच्या दृष्टीने हा धर्मेंद्र यांचा 'कळस' मानला जातो.

अभिनयाच्या दृष्टीने धर्मेंद्र यांचा आणखी एक चित्रपट महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे १९७५मध्ये आलेला 'चुपके चुपके'. विशेष म्हणजे यात ते अमिताभ बच्चन यांच्यासोबत होते.

हा चित्रपट नेहमीच्या व्यावसायिक मसाल्यापेक्षा वेगळा होता. चित्रपटात विनोद होता, पण त्यातला साधेपणा आणि बुद्धिमत्ताही होती. धर्मेंद्र यांनी प्राध्यापक परिमल त्रिपाठी आणि कार ड्रायव्हर प्यारे मोहन इलाहाबादी अशा दोन भूमिका यात साकारल्या.

'हिंदुस्तान टाईम्स'ने यावर टिप्पणी केली होती: 'एक अजरामर कहाणी... आणि धर्मेंद्र, ज्यांनी आपल्या निखळ हास्य आणि उबदार ऊर्जेने कॉमेडीला एक नवीन आयाम दिला.'

सत्तरच्या दशकाचा उत्तरार्ध अमिताभ बच्चन यांच्या 'अँग्री यंग मॅन' प्रतिमेने गाजवला होता. पण गब्बरचा धुव्वा उडवणाऱ्या धर्मेंद्र यांनी या चित्रपटात आपल्या मिश्कील हास्याने आणि साधेपणाने शर्मिला टागोरसह प्रेक्षकांचेही काळीज जिंकले.

'चुपके चुपके'मध्ये धर्मेंद्र यांनी संवादफेक, देहबोली आणि टायमिंग या सर्वांमध्ये जी सहजता दाखवली, ती लाजवाब होती. या चित्रपटाने सिद्ध केले की, एक अभिनेता म्हणून ते आपल्या कलेत पारंगत आहेत.

पण 'चुपके चुपके'च्या आधी १९६६मध्ये धर्मेंद्र यांचा आणखी एक चित्रपट आला होता, 'फूल और पत्थर'.

जरी हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्याही यशस्वी ठरला आणि त्याला अनेकदा धर्मेंद्र यांचा 'सुपरस्टार' बनण्याचा चित्रपट मानले जाते, तरी याला त्यांच्या 'ऑफ-बीट' वाटेची सुरुवातही म्हणता येईल. कारण यात त्यांनी पडद्यावर कमालीची संवेदनशीलता दाखवली होती.

'फूल और पत्थर'मध्ये त्यांनी ‘हिरो’ असण्यासोबतच मानवी कमकुवतपणाचा स्वीकारही दाखवला—त्या काळातील 'हिरो'च्या प्रतिमेसाठी हे नक्कीच एक धाडसी पाऊल होते.

धर्मेंद्र सुपरस्टार होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत सुपरस्टारच राहिले. नक्कीच, शोले, लोहा, हकीकत, धर्म-कांटा यांसारख्या चित्रपटांनी त्यांना रसिकप्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनवले.

पण धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत दाखवून दिले की ते केवळ 'ही-मॅन' नाहीत. पात्राच्या नसानसात उतरण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. त्यांच्या या क्षमतेने त्यांना केवळ कमर्शियल स्टार नाही, तर एक सिद्धहस्त कलाकार बनवले.

'सत्यकाम'ने सिनेमाच्या जगाचा निरोप घेतला आहे. पण जोपर्यंत भारतात सिनेमा आणि कलेची चर्चा होईल, तोपर्यंत धर्मेंद्र त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वासह, त्यांच्या धडाकेबाज ॲक्शनसाठी आणि अभिनयाच्या खोलीसाठीही आठवले जातील.

(लेखक ‘आवाज द व्हॉइस’चे ऑडिओ-व्हिडिओ एडिटर आहेत.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter