अविनाश दुधे
विदर्भाचं नंदनवन अशी ओळख असलेल्या चिखलदऱ्याला नियमित भेट देणाऱ्या मंडळींपैकी फारच कमी लोक असे असतील जे मोहम्मद अशरफ आणि त्यांच्या नॉव्हेल्टी स्टोअर्सला ओळखत नाहीत. हे नॉव्हेल्टी स्टोअर्स ३१ ऑक्टोबरला ६० वर्षाचे झालं आहे.
आज चिखलदऱ्याचं मिनी डिपार्टमेंटल स्टोअर वा सुपर बाजार म्हणता येईल अशा नॉव्हेल्टी स्टोअर्सची सुरुवात ३१ ऑक्टोबर १९६५ ला एका फार्मसीच्या रुपाने झाली. तेव्हा केवळ १९ वर्षाचे असलेल्या अशरफ यांनी आदिवासीबहुल चिखलदऱ्यात ६० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी अगदी छोटे औषधी विक्री केंद्र सुरु केलं.
तेव्हा केवळ १३८० लोकसंख्या असलेल्या चिखलदऱ्याच्या गरजा फारच कमी होत्या. आठवड्यातून मुश्किलीने पाच-दहा लोक डोकेदुखी, पोटदुखी, किरकोळ ताप यावरील औषध घ्यावयास यायचे. हळूहळू अशरफ यांनी आहे त्या जागेत जनरल स्टोअर सुरु केले. गावकऱ्यांना ज्या काही जीवनावश्यक वस्तू लागतील त्या ते नजीकच्या अचलपुरातून बोलावून देत असत.
असे करता करता रोजच्या जगण्यातील आवश्यक वस्तू जसे - दात घासण्यासाठी मंजन, कंगवा, टॉवेल, साबण,सेफ्टी पीन्स, पॉवडर, इतर सौंदर्यप्रसाधने, अंडरपॅंट, बनीयन, चपला, बूट, घड्याळी, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर,वह्या, कागद, इतर शालेय साहित्य, बिस्कीट, चॉकलेट, लाइट, बॅटरी, सेल, कोल्ड्रिंक, आईसक्रीम, वेफर्स अशा हजारो वस्तू अशरफ भाई दुकानात ठेवायला लागलेत.
वस्तू हजारो असल्यात तरी आज एवढ्या वर्षानंतरही नॉव्हेल्टी स्टोअर्स आकाराने फार मोठं नाही. पण सगळं काही तिथे मिळतं. त्यांचं स्टोअर म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. ग्राहकाने कुठलीही गोष्ट मागितली अशरफभाई कुठल्या तरी कोपऱ्यातून सेकंदात ती हजर करतात.
चिखलदऱ्यात प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा नॉव्हेल्टी स्टोअर्सलाच आली. पाहिला STD PCO नॉव्हेल्टीत, फॅक्स त्यांच्याकडेच, इंटरनेट नॉव्हेल्टीतच. वर्तमानपत्र-मासिक विक्रीचे एकमेव केंद्र अनेक वर्षापासून नॉव्हेल्टीच.
नॉव्हेल्टीच्या या वैशिट्यामुळे येथे ग्राहकांची कायम गर्दी असते. शहरातील चकचकीत फॅशनेबल कपड्यातील पर्यटकापासून आदिवासी पाड्यातील माणसापर्यंत साऱ्यांची गर्दी नॉव्हेल्टीतच. नॉव्हेल्टीत सगळं काही मिळते हे त्याचं एक कारण असलं तरी अशरफभाईंची मिठी जुबान हे प्रमुख कारण.
६० वर्षांपासून नॉव्हेल्टी स्टोअरची गर्दी टिकून आहे ती अशरफभाईंमुळे. माणूस छोटा असो वा मोठा असो, श्रीमंत असो वा गरीब, शहरी असो वा आदिवासी अशरफभाई सर्वांशी अतिशय प्रेमाने, नम्रपणेच वागणार. २१ च्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत चिखलदऱ्यात हे एकमेव जनरल स्टोअर, फार्मसी, दुकान होते. आज अनेक झाले आहेत, पण गर्दी असते ती नॉव्हेल्टी स्टोअरमध्येच. याचं कारण माणसाची निकड जाणून अशरफभाई वागतात.
अनेक आदिवासींजवळ पुरेसे पैसे नसतात . वास्तूचे भाव ऐकून ते परत जायला निघतात. त्यांचा चेहरा पाहून अशरफभाई त्यांना थांबवतात . सध्या जेवढे असेल तेवढे दे. बाकी पुढील वेळी जमेल तसे दे, असे म्हणत ते त्यांना दिलासा देतात . आज चिखलदऱ्यात ग्रामीण रुग्णालय आहे. काही खासगी डॉक्टरही आहेत . पण अनेक आदिवासींसाठी अशरफभाईच डॉक्टर आहेत. ताप, सर्दी , खोकला , डोकेदुखी , उलटी अशा किरकोळ दुखण्यासाठी ते अशरफभाईंच्या औषधावर विश्वास ठेवतात. मात्र गंभीर काही असलं तर अशरफभाई रुग्णाला त्वरेने रुग्णालयात पाठवतात. त्यांच्या या माणूस जपण्याच्या स्वभावाने त्यांनी अक्षरश: हजारो माणसं जोडली आहेत .
आज अशरफभाई ७९ वर्षाचे आहेत. पण अजूनही किमान १२ तास ते कार्यरत असतात. बसलेले अशरफभाई दिसणे ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे.वैयक्तिक जीवनात त्यांनी अनेक संकटे सोसलीत. अनेक जिवलग त्यांनी गमावलेत.एका किडनीवर ते काम करतात. पण चेहऱ्यावरचे हास्य कायम असतं. चिखलदऱ्यात येणारे नेते, महसूल व वन अधिकारी, डॉक्टर्स, उद्योजक, वर्तमानपत्रांचे मालक, मोठे पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर अशा अनेक मोठ्या लोकांसोबत त्यांचा स्नेह आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारी ही माणसं चिखलदऱ्याच्या निसर्गात रमण्याअगोदर काही क्षण तरी अशरफभाईंकडे बूड टेकवतात. चहाच्या घोटासोबत ख्यालीखुशालीचे आदानप्रदान करतात. बदलत्या चिखलदऱ्याबाबत चर्चा करतात. चिखलदऱ्याचा इतिहास, भूगोल सगळं माहित असलेले अशरफभाई साठ वर्षातील विदर्भाच्या नंदनवनाच्या अनेक जुन्या, रंजक आठवणी सांगतात.
पण आपल्या वैयक्तिक जीवनातील समस्या ते कोणाजवळही कधीही उगाळत नाही. किंवा त्या संबंधांचा फायदा कधी उठवत नाही.वैयक्तिक जीवनात त्यांनी अनेक संकटे सोसलीत. अनेक जिवलग त्यांनी गमावलेत.एका किडनीवर ते काम करतात. पण त्याबाबत ते कधी बोलत नाहीत.
त्यांच्या प्रसन्नचित्त असण्याचं रहस्य विचारलं तर 'खुदाकी मेहरबानी' एवढं दोन शब्दाचे उत्तर ते देतात. पैसे कमवण्याच्या, प्रॉपर्टी जमवण्याच्या अनेक संधी त्यांच्याकडे होत्या. पण अशरफभाई आपल्या छोट्या नॉव्हेल्टी स्टोअर्समध्ये समाधानी राहिले. नंतर आलेल्या अनेकांनी लाखो-करोडो रुपये जमवले. जमिनी, मालमत्ता गोळा गेली. पण यांना त्याचीही असूया नाही. त्याबाबत आपण विचारणा केल्यास 'खुदाकी मर्जी. उसकी कृपा से शांतीसे जी रहे है', एवढंच ते सांगतात. त्यांची समाधानी, संतुष्ट वृत्ती त्यांच्या देहबोलीतून ओथंबत राहते. दरवळत राहते आणि ती तुम्हालाही शांत करत जाते.