आज १५ ऑक्टोबर, 'मिसाईल मॅन' आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती. डॉ. कलाम यांच्या जीवनाचा एक पैलू, ज्यावर सहसा चर्चा होत नाही, तो म्हणजे त्यांचे धार्मिक विश्वास. अनेकदा असे मानले जाते की, शास्त्रज्ञ धार्मिक किंवा अध्यात्मिक प्रवृत्तीचा नसतो. पण डॉ. कलाम याला अपवाद होते. ते श्रद्धाळू आणि धार्मिक आचरण करणारे मुस्लिम होते. त्यांनी आपल्या धर्मातूनच सर्वसमावेशकतेची आणि मानवतेची प्रेरणा घेतली.
डॉ. कलामांचे वैयक्तिक जीवन इस्लामच्या तत्त्वांना साजेसे होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण रामेश्वरम येथील मदरशात झाले. त्यांचे वडील स्थानिक मशिदीचे इमाम होते. ते रमजानमध्ये न चुकता रोजे ठेवत आणि दररोज नमाज पठण करत. एका पत्रकाराने त्यांच्याविषयीचा एक अनुभव सांगितला आहे. राष्ट्रपती असताना, रमजानच्या पहिल्याच दिवशी ते मानेसर येथील एका कार्यक्रमात आले होते आणि ते रोजा ठेवून होते. त्यांच्यासमोर पाण्याचा ग्लास असूनही त्यांनी त्याला स्पर्श केला नाही. त्यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या इफ्तारचा खर्चही स्वतःच्या पैशातून केला. दान आणि सामाजिक जबाबदारीच्या इस्लामिक मूल्यांचे हे प्रतीक होते.
त्यांच्या कार्यकाळात माहिती अधिकारी राहिलेल्या एस.एम. खान यांनी आपल्या 'द पीपल्स प्रेसिडेंट' या पुस्तकात डॉ. कलाम यांचे दिल्लीतील फातेहपुरी मशिदीत शुक्रवारची नमाज अदा करतानाचे फोटो प्रकाशित केले आहेत. तसेच, त्यांनी अहमदाबादमधील सुफी संत शेख अहमद यांच्या दर्ग्यावर चादर अर्पण केल्याचे आणि दाऊदी बोहरा मुस्लिमांचे अध्यात्मिक गुरू सय्यदना बुरहानुद्दीन यांच्याशी चर्चा केल्याचेही फोटो आहेत.
"मोठ्या लोकांसाठी, धर्म हा मित्र बनवण्याचा एक मार्ग असतो; लहान लोक धर्माला लढण्याचे साधन बनवतात," हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य त्यांच्या धार्मिक विचारांचे सार सांगते. ही शिकवण त्यांना लहानपणापासूनच मिळाली होती. त्यांचे वडील, एक श्रद्धाळू मुस्लिम असूनही, रामेश्वरम मंदिराचे मुख्य पुजारी आणि तेथील चर्चच्या पादरी यांचे जवळचे मित्र होते.
डॉ. कलाम यांनी आपल्या आत्मचरित्रात दिल्ली शहराचा उल्लेख ‘हजरत निजामुद्दीन यांचे शहर’ असा केला आहे. सुफी संतांबद्दलच्या आदराचे प्रतीक होते. ते सुफी संत रुमी यांच्यावरही खूप वाचत असत. त्यांनी अरुण तिवारी यांच्यासोबत लिहिलेल्या 'ट्रान्सेंडन्स' या पुस्तकात, इस्लाम आणि इतर धर्मांविषयी आपले म्हणणे मांडताना कुराणातील अनेक आयतींचा उल्लेख केला आहे.
'टर्निंग पॉइंट्स' आणि 'विंग्ज ऑफ फायर' यांसारख्या पुस्तकांमध्ये डॉ. कलाम यांनी सांगितले आहे की, प्रामाणिकपणा, नम्रता आणि सेवा यांसारख्या मूळ इस्लामिक मूल्यांनी त्यांच्या निर्णयांना कसे मार्गदर्शन केले. त्यांनी 'टर्निंग पॉइंट्स'मध्ये एक प्रसंग सांगितला आहे. त्यांचे वडील गावचे सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर, एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या घरी एक भेटवस्तू आणून दिली. कलामांनी ती भेट वडिलांना दिली, तेव्हा ते खूप रागावले.
त्यांनी एका हदीसचा (प्रेषितांची शिकवण) उल्लेख करत, 'पदाचा गैरवापर करू नये' अशी कठोर शिकवण दिली. हा धडा कलाम आयुष्यभर विसरले नाहीत. म्हणूनच, राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यावर आणि मृत्यूनंतर, त्यांच्या संपत्तीत काही हजार पुस्तके आणि काही जोड्या कपड्यांशिवाय काहीही नव्हते.
आपल्या 'विंग्ज ऑफ फायर' या आत्मचरित्रात ते लिहितात, "मी नेहमीच एक धार्मिक व्यक्ती राहिलो आहे, या अर्थाने की मी देवाशी एक कार्यरत भागीदारी टिकवून ठेवली आहे." ते अनेकदा म्हणत की, जेव्हा त्यांना एखाद्या समस्येवर तोडगा मिळत नसे, तेव्हा तो त्यांना सकाळच्या 'फजर'च्या नमाज पठण करताना मिळत असे.
आपल्या 'इग्नाइटेड माइंड्स' या पुस्तकात डॉ. कलाम यांनी एका हेलिकॉप्टर अपघातातून वाचल्यानंतर पडलेल्या एका विलक्षण स्वप्नाचा उल्लेख केला आहे. या स्वप्नात, ते पौर्णिमेच्या रात्री वाळवंटात उभे होते आणि त्यांच्यासोबत इतिहासातील पाच महान व्यक्तिमत्त्वे होती - महात्मा गांधी, अल्बर्ट आईनस्टाईन, सम्राट अशोक, अब्राहम लिंकन आणि खलिफा उमर (हजरत उमर इब्न अल-खत्ताब).
या स्वप्नात हजरत उमर त्यांना म्हणाले होते: "जेरुसलेममध्ये प्रवेश केल्यावर मी शिकलो की, सर्व माणसे समान आहेत. इतरांना तुमच्या मार्गावर चालण्यास भाग पाडण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही जबरदस्तीने यशस्वी होणार नाही. तुम्हाला तुमच्या आचरणाने त्यांना जिंकावे लागेल." डॉ. कलाम यांच्यासाठी हजरत उमर हे केवळ एक धार्मिक नेते नव्हते, तर नैतिक नेतृत्व आणि वैश्विक बंधुत्वाचे प्रेरणास्रोत होते.
खऱ्या अर्थाने 'सर्वधर्म समभाव' जपणारे जीवन
डॉ. कलाम यांनी आचार्य महाप्रज्ञ यांच्यासोबत 'द फॅमिली अँड द नेशन' हे पुस्तक लिहिले, ज्यात त्यांनी नमाजच्या आध्यात्मिक महत्त्वाबद्दल लिहिले आहे. तसेच, 'यू आर बॉर्न टू ब्लॉसम' या पुस्तकाच्या पहिल्याच अध्यायात त्यांनी इस्लाम, तौहीद आणि कुराण यावर सविस्तर चर्चा केली आहे.
डॉ. कलाम यांनी आपला धर्म आणि श्रद्धा अत्यंत वैयक्तिक ठेवली, पण त्याचा प्रभाव त्यांच्या प्रत्येक कृतीत आणि विचारात दिसून येतो. ते नेहमी म्हणत, "राष्ट्र हे सर्व धर्मांपेक्षा मोठे आहे." त्यांच्यासाठी, एक चांगला मुस्लिम असणे आणि एक चांगला भारतीय असणे हे विरोधाभासी नव्हते. एखादी व्यक्ती आपल्या धर्माच्या मुळाशी घट्टपणे जोडलेली राहूनही इतर सर्व धर्मांच्या मूल्यांचा तितकाच आदर करू शकते आणि खऱ्या अर्थाने 'सर्वधर्म समभाव' जगू शकते, याचे डॉ. कलाम मूर्तिमंत उदाहरण होते.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -