माजी भारतीय क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हे तेलंगणा मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतानाचे क्षण
माजी भारतीय क्रिकेट कर्णधार आणि काँग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन यांनी शुक्रवारी तेलंगणा मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनामध्ये आज पार पडलेल्या छोटेखानी सोहळ्यात राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. अजहरुद्दीन यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे तेलंगण कॅबिनेटमधील मंत्र्यांची संख्या सोळावर पोचली आहे. आणखी दोघांचाही मंत्रिमंडळात लवकरच समावेश होऊ शकतो.
रेवंत रेड्डी मंत्रिमंडळातील पहिले अल्पसंख्याक समुदायाचे मंत्री
आगामी ज्युबिली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्य मंत्रिमंडळात अल्पसंख्याक प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी काँग्रेस सरकारने उचललेले हे एक महत्त्वाचे राजकीय पाऊल आहे. ज्युबिली हिल्स पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली असून येथील मुस्लिम मतदारांना गळाला लावण्यासाठी अजहरुद्दीन यांना संधी देण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.
अहवालानुसार, पूर्वी मंत्रिमंडळात अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व नव्हते. त्यामुळे तेलंगणा काँग्रेसने अझरुद्दीन यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांना विनंती केली होती. त्यांनतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) सुद्धा अझरुद्दीन यांच्या नावाला मंजुरी दिली. या निवडीमुळे माजी क्रिकेटपटू हे रेवंत रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील पहिले अल्पसंख्याक समुदायाचे मंत्री ठरले आहेत.
शपथ घेतल्यानंतर अझरुद्दीन यांनी एनडीटीव्हीशी बोलताना आपल्या राजकीय प्रवासावर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी आपल्या राजकीय प्रगतीचे श्रेय मुख्यमंत्री रेड्डी यांना दिले. तसेच त्यांनी शपथविधीच्या तारखेचा एक विलक्षण योगायोगही सांगितला. ते म्हणाले "माझ्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवातही ३१ डिसेंबरला झाली होती आणि आज ३१ ऑक्टोबर आहे. जणू काही नियतीचे चक्र पूर्ण झाले आहे."
तेलंगणा सरकारने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अझरुद्दीन यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर सदस्य (MLC) म्हणून नियुक्त केले होते. त्यांनी २०२३ च्या निवडणुकीत ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु त्यात त्यांना यश आले नाही.
महिला क्रिकेट संघाचे कौतुक
अझरुद्दीन यांनी मुलाखतीदरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघाल्या यशाचे कौतुक केले. या संघाने गुरुवारी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याविषयी ते म्हणाले, "समारंभाच्या तयारीमुळे दुर्दैवाने कालचा सामना पाहता आला नाही. या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जने उत्कृष्ट खेळी केली. भारतीय महिला क्रिकेट संघाचे विजयाबद्दल अभिनंदन करतो."
ते पुढे म्हणाले, "विश्वचषकासाठी भारतीय संघाला माझ्या शुभेच्छा. भारतीय महिला क्रिकेट संघ चषक घरी आणेल अशी मी आशा करतो, प्रार्थना करतो आणि त्यासाठी पाठिंबा देखील देत आहे."
खातेवाटप लवकरच अपेक्षित असले तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अझरुद्दीन क्रीडा किंवा अल्पसंख्याक कल्याण खात्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्या समावेशामुळे ते रेवंत रेड्डी मंत्रिमंडळातील अल्पसंख्याक समाजातील पहिले मंत्री ठरले आहेत.