ग्लोबल चेस लीगच्या (GCL) तिसऱ्या पर्वाला रविवारी मुंबईत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी यजमान 'अपग्रॅड मुंबा मास्टर्स' (UpGrad Mumba Masters) संघाने खेळावर वर्चस्व गाजवत दमदार कामगिरी केली. मात्र, भारताचे दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि कोनेरू हम्पी यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, देशातील अव्वल तीन ग्रँडमास्टर - गुकेश डी, अर्जुन एरिगेसी आणि प्रज्ञानंद आर - यांनी आपले सामने बरोबरीत (Draw) सोडवले.
मुंबईची विजयी सलामी
भारतीय 'आयकॉन' खेळाडूंच्या नेतृत्वाखालील दोन संघांना सुरुवातीलाच धक्का बसला. यामध्ये आनंदचा 'गंगेस ग्रँडमास्टर्स' आणि विश्वविजेता गुकेशचा 'पीबीजी अलास्कन नाइट्स' या संघांचा समावेश आहे. या दोन्ही संघांना तिसऱ्या पर्वाच्या सलामीच्या सामन्यात वेगवेगळ्या प्रकारे पराभव स्वीकारावा लागला. मात्र, यजमान मुंबई संघाने आपल्या अभियानाची सुरुवात विजयाने आणि अत्यंत दिमाखात केली.
आनंद विरुद्ध मॅक्सिम लढत
दिवसाच्या दुसऱ्या लढतीत मॅक्सिम वचियर-लाग्रेव्हच्या (MVL) नेतृत्वाखालील 'मुंबा मास्टर्स'ने आनंदच्या 'गंगेस ग्रँडमास्टर्स'वर १७-४ असा मोठा विजय मिळवला. त्यांनी सहापैकी चार बोर्डवर बाजी मारली.
टॉप बोर्डवर मॅक्सिमने विश्वनाथन आनंदचा पराभव केला. याशिवाय मुंबई संघाकडून शाखरियार मामेदियारोव, हरिका द्रोणावल्ली आणि बर्दिया दानिश्वर यांनी आपापले सामने जिंकून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.