टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत इंग्लंडने न्यूझीलंडवर ४ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने गट २ मध्ये अव्वल स्थान निश्चित करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या निकालामुळे न्यूझीलंडला आता शनिवारी होणाऱ्या पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.
शुक्रवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. विजयासाठी १६० धावांचे आव्हान इंग्लंडने १९.३ षटकांत पूर्ण केले. विल जॅक्स आणि रेहान अहमद यांनी सातव्या गड्यासाठी ४४ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला शानदार विजय मिळवून दिला. अष्टपैलू कामगिरीसाठी विल जॅक्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. हा त्याचा या स्पर्धेतील चौथा सामनावीर पुरस्कार आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद १५९ धावा केल्या. न्यूझीलंडने श्रीलंकेला हरवणाऱ्या त्याच संघाला या सामन्यातही संधी दिली होती. दुसरीकडे, इंग्लंडने जेमी ओव्हरटनच्या जागी फिरकीपटू रेहान अहमदला संघात स्थान दिले. सुरुवातीला न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करत ६.५ षटकांत बिनबाद ६४ धावा केल्या होत्या. त्यावेळी इंग्लंडचा निर्णय चुकीचा ठरतोय की काय, असे वाटत होते.
मात्र, फिरकीपटू आदिल रशीदने ३५ धावांवर खेळणाऱ्या टिम सायफर्टला यष्टिचित करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर ऑफ-स्पिनर विल जॅक्सने २९ धावांवर खेळणाऱ्या फिन ऍलनला बाद केले. आपला पहिलाच विश्वचषक सामना खेळणाऱ्या रेहान अहमदने पहिल्याच चेंडूवर रचिन रवींद्रची विकेट घेत न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडकडून सर्वाधिक ३९ धावा केल्या, मात्र तो विल जॅक्सचा दुसरा बळी ठरला. इंग्लंडकडून रशीद आणि अहमद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
१६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. फिल सॉल्ट आणि जोस बटलर झटपट बाद झाल्यामुळे त्यांची अवस्था २ बाद २ अशी झाली होती. त्यानंतर ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्याने इंग्लंडचा संघ दबावात आला होता. मात्र, विल जॅक्सने नाबाद ३२ आणि रेहान अहमदने नाबाद १९ धावांची खेळी करत सामना फिरवला.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने सामन्यानंतर रेहान अहमदचे विशेष कौतुक केले. रेहान सराव सत्रात काय करू शकतो हे आम्ही पाहिले आहे आणि आज त्याने मैदानात उतरून न्यूझीलंडच्या हातातून सामना हिरावून घेतला, असे ब्रूक म्हणाला.
या पराभवामुळे न्यूझीलंडच्या अडचणी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे, आधीच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या श्रीलंकेविरुद्ध शनिवारी पल्लेकेले येथे होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानला मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.