सर्फराज खान याने सय्यद मुश्ताक अली टी-२० करंडकातील स्वतः खेळत असलेल्या पहिल्याच लढतीत शतकी धमाका केला. त्याने अवघ्या ४७ चेंडूंमध्ये नाबाद १०० धावांची खेळी केली. त्यानंतर शार्दुल ठाकूर याने २३ धावा देत पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दोघांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर मुंबईच्या संघाने मंगळवारी झालेल्या अ गटातील लढतीत आसामवर ९८ धावांनी शानदार विजय संपादन केला. मुंबई संघाने सलग चौथ्या विजयाला गवसणी घातली. सर्फराझ खान याचीच सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
मुंबईच्या संघाकडून आसाम संघासमोर २२१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले, मात्र आसाम संघाचा डाव १९.१ षटकांत १२२ धावांवर आटोपला. शिवशंकर रॉय याने सर्वाधिक ४१ धावा केल्या. त्याला मोठी खेळी करता आली नाही. इतर फलंदाजांकडूनही निराशा झाली. शार्दुल ठाकूर याने २३ धावा देत निम्मा संघ गारद केला. साईराज पाटील व अथर्व अंकोलेकर यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
सूर्यकुमार अपयशी
सूर्यकुमार यादव याच्याकडे भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व आहे, मात्र आंतरराष्ट्रीय सामना असो किंवा देशांतर्गत सामना त्याच्या वैटमधून गेल्या काही सामन्यांमध्ये धावाच निघालेल्या नाहीत, या लढतीतही तो अवघ्या २० धावांवर बाद झाला. साईराज पाटील याने या लढतीत नाबाद २५ धावांची खेळी केल्यानंतर दोन फलंदाजही बाद केले. त्याने मुंबईच्या विजयात अष्टपैलू चमक दाखवली.
संक्षिप्त धावफलक मुंबई
२० षटकांत ४ बाद २२० धावा (आयुष म्हात्रे २१, अजिंक्य रहाणे ४२, सर्फराइझ खान नाबाद १००-४७ चेंडू ८ चौकार, ७ षटकार, सूर्यकुमार यादव २०. सूर्याश शेडगे ९. साईराज पाटील नाबाद २५, सादीक हुसेन १/३९) विजयी वि. आसाम १९.१ षटकांत सर्व बाद १२२ चावा (शिवशंकर रॉय ४१, शार्दुल ठाकूर ५/२३. साईराज पाटील २/१२, अथर्व अंकोलेकर २/१७