हज कमिटी ऑफ इंडियाने (Haj Committee of India) हज २०२६ साठी निवड झालेल्या यात्रेकरूंना मोठा दिलासा दिला आहे. 'कुर्रा' (Qurrah - सोडत) आणि 'वेटिंग लिस्ट'मधून निवड झालेल्या यात्रेकरूंसाठी हजची रक्कम भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.
हज कमिटीने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी एक नवीन अधिसूचना जारी केली. यानुसार, हजची रक्कम भरण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
हज कमिटीने १३ ऑगस्ट २०२५ रोजी हज २०२६ साठी सोडत काढली होती. यानंतर २९ सप्टेंबर रोजी २२,५३० यात्रेकरूंची पहिली आणि १४ ऑक्टोबर रोजी ७,६३६ यात्रेकरूंची दुसरी वेटिंग लिस्टही जारी करण्यात आली. या सर्वांना एकूण २,७७,३०० रुपये (पहिला हप्ता - १,५२,३०० रु. + दुसरा हप्ता - १,२५,००० रु.) भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२५ ही अंतिम तारीख देण्यात आली होती.
आता हज कमिटीने या तारखेत वाढ केली आहे. "ज्या यात्रेकरूंची निवड कुर्रा किंवा वेटिंग लिस्टमधून झाली आहे आणि ज्यांनी अद्याप २,७७,३०० रुपयांची संपूर्ण रक्कम भरलेली नाही, त्यांना वाढीव मुदतीत म्हणजेच ७ नोव्हेंबरपर्यंत आवश्यक रक्कम भरण्याचा सल्ला दिला जात आहे," असे हज कमिटीने म्हटले आहे.
यात्रेकरू हज कमिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर (hajcommittee.gov.in) किंवा 'हज सुविधा ॲप' (Haj Suvidha App) द्वारे ई-पेमेंट करू शकतात. यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI चा वापर करता येईल. याशिवाय, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) किंवा युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) मध्ये हज कमिटीच्या खात्यात बँक ट्रान्सफरद्वारेही पैसे भरता येतील.
पेमेंट जमा केल्यानंतर, यात्रेकरूंनी १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. यामध्ये स्वाक्षरी केलेला हज अर्ज (HAF), पेमेंटची पावती (pay-in-slip) आणि वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (medical and fitness certificate) यांचा समावेश आहे.
हज कमिटीने अद्याप हज २०२६ च्या विमान प्रवासाचे वेळापत्रक (Flight Schedule) जाहीर केलेले नाही. मात्र, देशभरातून १८ 'एम्बार्केशन पॉइंट्स' (Embarkation Points) असतील, हे स्पष्ट केले आहे. यात श्रीनगर, गया, गुवाहाटी, इंदूर, जयपूर, नागपूर, दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, कोचीन, चेन्नई, अहमदाबाद, लखनौ, कन्नूर, कालिकत आणि विजयवाडा यांचा समावेश आहे.
२०२६ मधील हजचा संभाव्य कालावधी २४ मे ते २९ मे २०२६ असा अपेक्षित आहे. तथापि, 'झुल हिज्जा' महिन्याच्या चंद्रदर्शनानंतरच अंतिम तारीख निश्चित होईल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -