मलिक असगर हाश्मी / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत 'वंदे मातरम'बद्दल काढलेल्या प्रभावी गौरवोद्गारांमुळे 'आनंदमठ' आणि त्याचे महान रचयिता बंकिमचंद्र चटोपाध्याय पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या चर्चेसोबतच लोकांच्या मनात एक कुतूहल जागे झाले आहे. बंकिमचंद्रांचे शिक्षण नक्की कुठे झाले? कोणत्या अनुभवांमुळे त्यांच्यात ती साहित्यिक चेतना निर्माण झाली, जिने भारताला 'वंदे मातरम'सारखे अमर राष्ट्रगीत दिले?
याच निमित्ताने आज आपण ओळख करून घेणार आहोत एका ऐतिहासिक शैक्षणिक संस्थेची. ती संस्था म्हणजे हुगली मोहसिन कॉलेज. जिथे बंकिमचंद्रांच्या उच्च शिक्षणाची सुरुवात झाली. विशेष म्हणजे या कॉलेजची स्थापना एका मुस्लिम दानशूर व्यक्तीने, मोहम्मद मोहसिन यांनी १ ऑगस्ट १८३६ रोजी केली होती.
बंकिमचंद्र आणि कॉलेजचे नाते
पश्चिम बंगालच्या परगणा जिल्ह्यातील कांठलपाडा गावात २७ जून १८३८ रोजी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी हुगली मोहसिन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
त्या काळी हे कॉलेज बंगालमधील उच्च शिक्षणाचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जायचे. जरी त्यांनी पुढे १८५७ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बी.ए. ची पदवी मिळवली असली, तरी मोहसिन कॉलेजमधील शिक्षणाने त्यांच्या आयुष्यात निर्णायक भूमिका बजावली. इथेच त्यांनी इंग्रजी, इतिहास, तत्त्वज्ञान आणि बंगाली साहित्याचा सखोल अभ्यास केला. पुढे जाऊन त्यांच्या साहित्याचा हाच कणा ठरला.
हुगली मोहसिन कॉलेजमध्ये त्यांच्या विद्यार्थी दशेतील अनेक आठवणी आजही जपून ठेवल्या आहेत. कॉलेजच्या प्रशासकीय इमारतींमध्ये बंकिमचंद्रांचे फोटो आजही दिमाखात लावले आहेत. हे कॉलेज जणू त्यांच्या साहित्यिक प्रवासाची साक्ष देत उभे आहे.
मोहसिन साहेबांचे योगदान
हुगली मोहसिन कॉलेजची स्थापना मोहम्मद मोहसिन यांनी केली होती. त्यांनी आपली सर्व संपत्ती शिक्षण आणि समाजाच्या भल्यासाठी अर्पण केली. १८३६ मध्ये सुरू झालेले हे कॉलेज 'मेकॉले रिपोर्ट' नंतर भारतात सुरू झालेल्या सुरुवातीच्या आधुनिक संस्थांपैकी एक आहे. ज्या काळात उच्च शिक्षणासाठी संसाधने खूप कमी होती, तेव्हा एका मुस्लिम समाजसेवकाने असे कॉलेज सुरू करणे ही एक ऐतिहासिक घटना होती. तसेच हे सामाजिक सलोख्याचे एक दुर्मिळ उदाहरणही होते.
आज हे कॉलेज आपल्या १८९ वर्षांच्या वारश्यासह भक्कमपणे उभे आहे. भारतीय शिक्षण व्यवस्था ही विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक समुदायांच्या एकत्रित प्रयत्नांतून उभी राहिली आहे, याचा हा जिवंत पुरावा आहे.
शैक्षणिक वाटचाल
सध्या हुगली मोहसिन कॉलेज वर्धमान विद्यापीठाशी संलग्न आहे. त्यापूर्वी १८५७ मध्ये स्थापन झालेल्या कलकत्ता विद्यापीठाशी ते जोडलेले होते. या कॉलेजमध्ये विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात.
विज्ञान विभागात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शरीरशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि अर्थशास्त्र शिकवले जाते. तर कला आणि वाणिज्य विभागात बंगाली, इंग्रजी, संस्कृत, हिंदी, उर्दू, इतिहास, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान आणि अकाउंटन्सी (वाणिज्य) असे विषय उपलब्ध आहेत.
कॉलेजला नुकतेच 'नॅक'कडून (NAAC) 'बी++' ग्रेड मिळाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) याला 'कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स' आणि भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने 'स्टार कॉलेज'चा दर्जा दिला आहे. याशिवाय 'डीएसटी-फिस्ट' (DST-FIST) योजनेअंतर्गत कॉलेज विज्ञान शिक्षणाला अधिक बळकट करत आहे. हुगली जिल्ह्यात हिंदूंक खालोखाल मुस्लिमांची संख्या मोठी आहे आणि ही विविधता कॉलेजमध्येही दिसून येते.
सध्या इथे मोठ्या संख्येने मुस्लिम विद्यार्थी आणि कर्मचारी आहेत. हे संस्थान सुरुवातीपासूनच सर्व समाजांना सोबत घेऊन चालणारे शिक्षणाचे एक उत्तम मॉडेल राहिले आहे, हेच यावरून सिद्ध होते.
प्राचार्यांचे मनोगत
कॉलेजचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम प्रमाणिक म्हणतात, "विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार रुजवून त्यांना दर्जेदार शिक्षण देणे हे आमचे ध्येय आहे. इथून बाहेर पडणारा विद्यार्थी केवळ ज्ञानी नसावा, तर तो एक जबाबदार जागतिक नागरिक बनावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."
हे संस्थान केवळ शिक्षणातच नाही, तर संशोधनातही अग्रेसर आहे. उर्दू, भूगर्भशास्त्र आणि शरीरशास्त्र यांसारखे काही विभाग विद्यापीठाचे स्वतंत्र पीएचडी केंद्र म्हणून मान्यताप्राप्त आहेत.
संशोधनाला चालना देण्यासाठी कॉलेजमध्ये एक विशेष समिती काम करते. ही समिती शोधनिबंध सादर करणे, विद्यार्थ्यांचे छोटे संशोधन प्रकल्प आणि देश-विदेशातील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करते. यामुळे विद्यार्थ्यांना प्रगत संशोधन आणि जागतिक शैक्षणिक घडामोडींशी जोडले जाण्याची संधी मिळते.
एक ऐतिहासिक वारसा
हुगली मोहसिन कॉलेज ही केवळ एक शैक्षणिक संस्था नाही, तर तो भारतीय इतिहासाचा एक जिवंत अध्याय आहे. जिथे बंकिमचंद्रांसारख्या महान साहित्यिकाने धडे गिरवले आणि एका मुस्लिम दानशूराने शिक्षणाला नवी दिशा दिली. जवळपास दोन शतकांपासून हे कॉलेज समाजाला नवे विचारवंत, लेखक, वैज्ञानिक आणि प्रशासक देत आहे.
आज जेव्हा 'वंदे मातरम' आणि 'आनंदमठ'ची चर्चा देशात पुन्हा एकदा घुमत आहे, तेव्हा हुगली मोहसिन कॉलेजचा वारसा आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून देतो. ती म्हणजे भारताचा सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा नेहमीच विविधता, समावेशकता आणि सामायिक प्रयत्नांवर आधारलेला राहिला आहे.
बंकिमचंद्रांची स्वप्ने, मोहसिन साहेबांचे औदार्य आणि भारताचा सामायिक वारसा यांना सलाम करत हे कॉलेज आजही उत्कृष्ट शिक्षणाचा एक भक्कम स्तंभ म्हणून उभे आहे.