हज २०२६: मक्का-मदिन्यात फोटो काढण्यावर बंदी? जाणून घ्या सत्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 4 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

मक्का

सौदी अरेबियाने हज २०२६ साठी मक्का येथील ग्रँड मस्जिद (मस्जिद अल-हरम) आणि मदिना येथील प्रेषितांच्या मस्जिदमध्ये (मस्जिद-ए-नबवी) फोटोग्राफीवर कोणतीही बंदी घातलेली नाही. सोशल मीडियावर आणि काही अनधिकृत वेबसाइट्सवर फिरत असलेल्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही.

अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असा दावा केला जात होता की, हज आणि उमराह मंत्रालयाने संपूर्ण हज हंगामात पवित्र स्थळांवर मोबाईल फोनसह सर्व प्रकारच्या फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीवर बंदी घातली आहे. या दाव्यांमुळे आगामी हजसाठी तयारी करणाऱ्या यात्रेकरूंमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, सौदी अरेबियाच्या अधिकृत माध्यमांचा आढावा घेतला असता, अशा कोणत्याही बंदीची पुष्टी झाली नाही. 'सौदी प्रेस एजन्सी' (SPA), हज आणि उमराह मंत्रालय किंवा दोन पवित्र मशिदींच्या काळजी घेणाऱ्या प्राधिकरणाने  २०२६ साठी फोटोग्राफीच्या नियमांमध्ये बदल केल्याचे कोणतेही परिपत्रक किंवा आदेश जारी केलेला नाही.

जुने नियमच कायम

दोन पवित्र मशिदींमध्ये फोटोग्राफीबाबतचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. यानुसार, भाविकांनी आदरपूर्वक वर्तन करावे, रस्ते अडवू नयेत आणि प्रार्थनेत मग्न असलेल्या इतरांना त्रास होईल अशा कृती टाळाव्यात, असे आवाहन केले जाते. हे नियम हज २०२६ साठीही तसेच राहतील.

जोपर्यंत सुरक्षेला धोका निर्माण होत नाही, हालचालींमध्ये अडथळा येत नाही किंवा इतर भाविकांच्या गोपनीयतेचा भंग होत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांनी फोटोग्राफीला परवानगी दिलेली आहे.

अफवा कुठून पसरली?

हा खोटा दावा एका अनधिकृत पोस्टवरून सुरू झाला असावा, असे दिसते. त्यानंतर अनेक ठिकाणी तीच भाषा वापरून ही बातमी पसरवली गेली. यापैकी कोणत्याही बातमीसोबत अधिकृत विधान किंवा कागदपत्र जोडलेले नव्हते.

अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा

यात्रेकरू आणि ट्रॅव्हल ऑपरेटरना सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी फक्त सौदी सरकारच्या अधिकृत वाहिन्यांवरून येणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. पवित्र स्थळांमधील प्रक्रिया, आरोग्य विषयक अटी आणि हालचालींबाबतच्या घोषणा केवळ मान्यताप्राप्त अधिकार्‍यांमार्फतच केल्या जातात.