सुखी होण्याचे सुफी रसायन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

समीर दि शेख

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत गावच्या जत्रांना बरेचदा ‘उरूस’ या विशिष्ट नावाने ओळखले जाते. उरूस हा शब्द आपल्याकडे इतका रूळलाय की आपल्याला तो मराठीतच वाटतो. मात्र तो आहे  ‘उर्स’ या मुळच्या अरबी शब्दाचा अपभ्रंश. त्या भाषेत तो दोन अर्थांनी वापरला जातो. एक म्हणजे लग्न समारंभ आणि दुसरा अधिक वापरला जाणारा अर्थ म्हणजे ‘सुफी संतांचा स्मृतिदिन.’

आपल्याकडे उरूस म्हणजे यात्रा, उत्सव, सण आणि उत्साह असे समीकरण बनले असल्यामुळे मुळात त्या दिवशी त्या सुफी संतांची पुण्यतिथी असते, हे कुणाला खरेही वाटणार नाही. पण उरूस म्हणजे सण आणि आनंद हे काहीसे विसंगत वाटणारे समीकरण काही फक्त आपल्याकडेच आहे अशातला भाग नाही. जगभर सुफी संताच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे उर्सच्या दिवशी आनंदाचे आणि भक्तीभावाचे जल्लोषी स्वरूपच पाहायला मिळते.

कुणालाही साहजिक प्रश्न पडेल की पुण्यतिथी किंवा स्मृतिदिन हा उत्सवाचा दिवस नक्कीच नसतो, मग सुफी संतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी उरूस का भरतात? तो आनंदाचा दिवस थोडीच आहे? मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सुफीजममध्ये सुफी संतांचा स्मृतीदिवस आनंदाचा आणि भाग्याचाच दिवस समजला जातो. कारण त्या दिवशी तो सुफी संत अल्लाहला म्हणजे ईश्वराला जाऊन मिळतो.

आयुष्यभर सुफी संत ज्या ‘फनाह फी अल्लाह’साठी ‘जद्दोजहद’ करतो त्यात त्याला अखेर त्यादिवशी यश मिळते आणि तो ईश्वराशी तादात्म्य पावतो. आणि म्हणूनच तो दिवस उरूस म्हणून साजरा केला जातो. याविषयी भारतातील प्रसिद्ध सुफी संत मोइनुद्दिन चिश्ती म्हणतात, ‘सुफी संतासाठी मृत्यू म्हणजे ईश्वराकडे नेणारा पूल आहे.’ त्यामुळेच ‘फनाह फी अल्लाह’ म्हणजे स्वतःचे अस्तित्व विसरून ईश्वराशी एकरूप होणे हा सुफी विचारातील आनंदाचा परमोच्च बिंदू. 

अध्यात्माकडे कल असणारी आणि आपल्या भक्ती परंपरेच्या जवळ जाणारी विचारधारा म्हणजे सुफीजम. ईश्वरभक्ती आणि मानवसेवा या दोन मूल्यांवर ही विचारधारा प्रामुख्याने आधारलेली आहे. या मार्गाला अरबीत ‘तसव्वूफ’ असेही म्हटले जाते. बाह्य धार्मिक कर्मकांडे आणि कायदे म्हणजे शरीयत. ती सामान्यांसाठी पुरेशी असते. मात्र अध्यात्मिक विकास आणि ‘परमसुख’ यांची ओढ असणाऱ्याने ‘शरीयत’वर न थांबता हा पुढचा प्रवासही करायचा असतो त्याला ‘तरीकत’ म्हणतात.

तरीकत म्हणजे सुफी होण्याचा अध्यात्मिक मार्ग. गुरु-शिष्य म्हणजे मुर्शिद-मुरीद परंपरेतून आकाराला आलेल्या या तरीकतच्या मार्गावरून होणारा प्रवास तुम्हाला ‘हक़िक़त’कडे घेऊन जातो. हक़िक़त म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची आणि त्याभोवतीच्या भौतिकविश्वाची खरी ओळख. आणि अंतिमत: हा मार्ग तुम्हाला ‘मारीफत’कडे म्हणजेच अंतिम सत्याकडे नेतो. आत्मसाक्षात्काराकडून ईश्वरी साक्षात्काराकडे घेऊन जाणारा हा मार्ग म्हणजेच सुफिजम. या प्रवासासाठी प्रेम आणि सेवाभाव ही दोनच साधने उपयोगी पडतात.   

आनंदाच्या परमोच्च अनुभूतीची यात्रा
सूफी विचार हा अध्यामिक आणि काहीसा विरक्तीची ओढ असणारा विचार असला तरी यात ‘आनंदाची सशक्त परिकल्पना आढळते. नव्हे, यात सर्वाधिक भर सआदत म्हणजे आनंदावरच देण्यात आलाय असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. सुफी केवळ या जगातील सुखाची कल्पना करत नाही. तर त्याच्या सुखाच्या परिकल्पनेत पृथ्वीवरील मर्यादित जीवन आणि अमर्याद पारलौकिक जीवन अनुस्यूत असते.

खरा आनंद म्हणजे नेमका काय, तो कसा प्राप्त करायचा यावर सुफींनी विस्तृत चर्चा केलेली आढळते. महान तत्वज्ञ आणि सुफी अल गझाली (१०५७-११११) याने तर यावर एक पुस्तकच लिहिले. आणि  पुस्तकाचे नाव आहे ‘किमिया ए सआदत’ म्हणजे ‘सुखाचे रसायन’ किंवा ‘The Alchemy of Happiness’.

बाह्य आणि भौतिक गोष्टींतून मिळणारे सुख हे खरे सुख नसून, आत्मसाक्षात्काराकडून ईश्वरी साक्षात्काराकडे होणारा प्रवास म्हणजे खरे सुख आहे असे गझालीसह सर्व सुफी मानतात. प्रेम हे ते परमसुख मिळवण्याचे माध्यम असल्याचे ही मंडळी मानतात. त्यामुळेच सुफी विचारधारा आध्यात्मिकता आणि प्रेम यांचा सुंदर मेळ साधते. रूढीपरंपरेत न अडकता जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारी आणि प्रेमाच्या आधारे ईश्वरी साक्षात्काराची भाषा करणारी ही विचारधारा. साहजिकच या विचारधारेचे पाईक असणाऱ्या सुफी संतांच्या काव्य रचनेत प्रेम आणि त्यातील उत्कटता स्वर्गीयता आली नसती तर नवलच.

सुफींनी प्रेमाच्या सात पायऱ्या सांगितल्या. दिलकशी (आकर्षण), उन्स (शारीरिक आकर्षण), इश्क (प्रेम), अकीदत (श्रद्धा), इबादत (भक्ति), जूनून (उन्माद), मौत (मृत्यु). एखाद्या व्यक्तीवर केलेले प्रेम बहुतेकदा तिसऱ्या पायरीवर येऊनच थांबते. सुफींचे उत्कट प्रेम मात्र बहुतेकदा शेवटच्या चरणापर्यंत जाते आणि ते ईश्वराशी एकरूप होऊन जातात.

परमसुखाची प्राप्ती
सुफी विचार बाह्य गोष्टीं रूढी-परंपरा यातून आनंद मिळवण्यापेक्षा ‘स्वतःमध्ये डोकावण्यावर’ भर देतो. भौतिक विरक्ती अर्थात फकिरीने सुखप्राप्ती होते, असे हा विचार मानतो. या फकिरी प्रवृत्तीला ‘जुहद’ असे म्हणतात. भौतिक सुखाची लालसा साधक आणि ईश्वर यांच्यातील सर्वांत मोठा अडथळा ठरतो. त्यामुळेच ‘किमिया ए सआदत’मध्ये गझाली म्हणतो, ‘भौतिक सुख-समृद्धी आणि प्रतिष्ठा यांमधून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करणे मृगजळाच्या मागे धावण्यासारखे आहे. खरे सुख कशात असेल तर अध्यात्मिक उन्नती आणि ईश्वरी इच्छा यांत आहे.’

त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे न धावता शाश्वत सुखाचा शोध घेण्यास सुफी विचार प्रवृत्त करतो. ‘ठेविले अनंते तैसेची रहावे| चित्ती असो द्यावे समाधान ||.’ या तुकारामाच्या तत्वज्ञानाशी याचे काही अंशी साधर्म्य सापडते. मात्र या सुखप्राप्तीसाठी ‘तैसेची’ रहाण्याऐवजी सुफी विचार काही ‘साधना’ सुचवतो.

ईश्वराचे नामस्मरण अर्थात ज़िक्रूल्लाह
सुखी होण्यासाठी ईश्वराचे नामस्मरण अर्थात ज़िक्र उल अल्लाह म्हणजेच ज़िक्रूल्लाहला सुफी विचारात मोठे महत्त्व आहे. षडरिपुंच्या-सुफिंच्या भाषेत ‘नफ्स’च्या- आहारी गेल्यामुळे व्यक्तीचे हृदय काळवंडून गेलेले असते. नामस्मरण हे काळे डाग पुसून त्याला स्वच्छ करते. आणि त्याने अंतरीचा दिवा अधिक प्रकाशमान होतो, असे ते मानतात. सुफिंच्या लयबद्ध ‘ज़िक्र’च्या अनेक पद्धती असून सुफी मार्गावर आलेल्या साधकाला नियमितपणे ही साधना करावी लागते.

ईश्वरी इच्छेपुढे नतमस्तक होण्यातच खरे सुख
इस्लाम या शब्दाचा अर्थ ‘ईश्वरी इच्छेपुढे नतमस्तक होणे’ असला तरी प्रत्येक मुस्लीम म्हणवणाऱ्याला ही किमिया जमेलच असे नाही. ईश्वरी इच्छेतच समाधान मानण्यात खरे सुख असल्याचे सुफी मानतात. यालाच ते ‘तवक्कल’असे म्हणतात. जगातील इच्छा-अपेक्षा आणि त्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या नैराश्यापासून साधकाचा बचाव करणारी अध्यात्मिक ढाल म्हणजे ‘तवक्कल’. एकदा का ‘तवक्कल’ तुमच्या ठायी आला की ‘रिदा’चे म्हणजे ‘तृप्ती’चे सुख साधकाला मिळते. ‘डिप्रेशन’ आणि ‘एनझायटी’ग्रस्तांची लाट येण्याच्या काळात ‘तवक्कल’मुळे काहीअंशी मन:शांती मिळते का याचा मानसशास्त्रीय अभ्यास करणे रंजक ठरेल.

सुफींनी Pleasure आणि Happiness या दोन गोष्टींमध्ये भेद केल्याचे दिसते. सोप्या शब्दांत हा भेद सांगायचा तर pleasure म्हणजे क्षणिक आनंद तर happiness म्हणजे चिरकाल टिकणारी अनुभूती. Pleasure एखाद्या व्यक्तीच्या पायाशी लोळण घेत असेल तरी तो सुखी म्हणजे happy असेलच असे नाही, तर एखाद्याच्या वाट्याला suffering म्हणजे दुख आले तरी तो त्यातून दुखी होईलच असे नाही. हे सांगताना सुफी जगतात ‘पिरांचे पीर’ म्हणवले जाणारे बगदादचे अब्दुल कादर जिलानी उर्फ गौसपाक आपल्या पुस्तकात प्रेषित मोहम्मद यांचे एक वचन उद्धृत करतात. त्यात ते म्हणतात, ‘दु:ख वाट्याला येणारेही कधी आनंदी असतात, आणि आनंदी माणसाच्या वाट्यालाही भोग येतात.’

परोपकार आणि मानवसेवेतून सुखाची अनुभूती 
सुफी आनंदाला ईश्वरी कृपा समजतो. रहमान म्हणजे दयाळू असलेला परमेश्वर व्यक्तीच्या सत्कर्माला सुखाच्या रूपाने दाद देतो, असे सुफी समजतात. त्यामुळे सत्कर्म करत राहणे, मानवसेवासाठी सदैव तत्पर राहणे, स्वतःपेक्षा इतरांच्या गरजांना अधिक प्राधान्य देणे, स्वत:ला इतरांच्या सेवेला वाहून घेणे या प्रकारच्या परोपकारी कृत्यांना सुफींनी खूप महत्त्व दिल्याचे दिसते.

दक्षिण आशियातले एक प्रसिद्ध आणि समकालीन सुफी सय्यद सरफराज पाकिस्तानात सनदी अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. ‘कलंदर’ नावाच्या त्यांच्या वेबसाईटवर त्यांची शेकडो लेक्चर्स आहेत. दशकभरापूर्वी त्यातील जवळपास सर्व लेक्चर्स मी लक्षपूर्वक ऐकले. त्या सुफी विचारांचा मोठा प्रभाव माझ्या तरुण मनावर पडला. त्यांचे एक वाक्य मनात कायम घर करून राहिले. त्यात ते म्हणतात, ‘तुम खल्क ए खुदा के फुटमॅट बन जाओ, देखना खुदा तुमके अपने सर का ताज बना देगा.’ म्हणजे तुम्ही स्वतःला ईश्वराच्या लेकरांचे पायपुसणे बनवा, मग बघा ईश्वर तुम्हाला त्याचा मस्तकावरचा मुकुट बनवेल. स्वतःतील ‘मी’पण संपवण्याची आणि सुखाच्या दिशेने जाणारी ही महत्त्वाची पायरी आहे असे सुफी मानतात.    

म्हणजेच सुफी सामाजिक कार्य आणि त्यातून मिळणाऱ्या आत्मिक समाधानाला सुखाचा स्रोत मानतात. आणि म्हणूनच ‘खल्क ए खुदा की खिदमत’ला म्हणजेच ईश्वराच्या लेकरांच्या सेवेला, त्यांच्या गरजा भागवण्याला ते अतीव महत्त्व देतात. आपल्याकडे ‘हाणून मारून मुसलमान’ अशी म्हण अस्तित्वात असली तरी उपखंडातील अपवाद वगळता आजचे सर्वच मुस्लीम सुफिंच्या या ‘खिदमत’मुळे मुस्लीम झाल्याचे समाजशास्रज्ञ सांगतात. सुफिंच्या खानकाह म्हणजे आश्रमात तिब्ब आणि लंगर म्हणजे सुश्रुषा आणि अन्नदान यांद्वारे मानवसेवा केल्याचे मुबलक दाखले इतिहासात मिळतात. समन्वयाची प्रेमळ भाषा, निगर्वी आणि स्वच्छ आचरण व सेवाभावी वृत्ती यांमुळे लोक सुफिंकडे आकर्षित झाल्याचे दिसते. 

अब्दुल कादर जिलानीपरमआनंदाची व्याख्या करताना एके ठिकाणी म्हणतात,‘निसर्गाशी उत्तम नाते निर्माण करत जगणे,सत्कर्म करत लोकांची सेवा करणे आणि ‘खुदा की रझा’म्हणजे ईश्वरी इच्छेपुढे नतमस्तक होणे यातून येणारी अनुभूती म्हणजे परमआनंद.’आत्मशुद्धि, चित्तशुद्धि हा सुखी होण्याचा मार्ग असल्याचे सुफी मानतात. त्यांच्यामते, मानवसेवेतून आणि ईश्वर समर्पणातून या दोन्ही गोष्टी साध्य होतात.

सुखाचे पांथस्थ - गुरु शिष्य परंपरा आणि सोह्बत
सुफींमध्ये गुरूला मुर्शिद किंवा पीर असे म्हणतात. गुरूला सुफींमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. ईश्वराची आणि परमसुखाची अनुभूती करायची असेल तर गुरूच्या मार्गदर्शनाने आणि कृपेनेच ती होऊ शकते असे सुफी मानतात. त्यामुळे सुफींमध्ये मुर्शिद आणि मुरीद अर्थात गुरु-शिष्यांच्या जोड्या जगप्रसिद्ध आहेत. आपल्या भारतात आमीर खुसरो आणि त्यांचे गुरु निझामुद्द्दिन अवलिया ही गुरुशिष्याची जोडी लोकप्रिय आहे. तुती ए हिंद म्हणजे भारताचा बोलका पोपट म्हणून मध्ययुगात प्रसिद्ध असलेला हरहुन्नरी खुसरोने आपल्या गुरुच्या प्रेमाखातर लिहिलेल्या आज रंग है री,जेहाल ए मिस्कीन आणि असंख्य कव्वाली आजही तरुणाईमध्ये लोकप्रिय आहेत.

आज अमेरिकेतील सर्वाधिक लोकप्रिय कवी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो १३व्या शतकातला रुमी आणि त्याचा कलंदर गुरु शम्स तब्रेजी यांचे अध्यात्मिक नातेही आणि त्यातून जन्मलेल्या महान कविता आज जगभरातील वाचकांसाठी आनंदाची आणि अनुभूती देणाऱ्या आहेत. आपल्या गुरुविषयी तो म्हणतो, ‘मौलवी हरगीज ना शुद मौला ए रूम, ता गुलामे शम्स तब्रेजी ना शुद’ म्हणजे केवळ मौलवी असलेलो मी खचितच या रूम प्रदेशाचा अध्यात्मिक गुरु झालो नसतो, जर शम्स माझ्या आयुष्यात आला नसता.’

आश्रम, सह साधक आणि संगीत
सुफिजममध्ये गुरु-शिष्य परंपरेतून मिळणाऱ्या अध्यात्मिक ज्ञानाला अतिशय महत्त्व देण्यात आले आहे. गुरुकृपेसाठी गुरु आणि गुरुबंधूंची सेवा करत त्यांच्याकडून ज्ञान मिळवावे लागे. त्यासाठी अनेक सुफींनी आपली खानकाह म्हणजे आश्रम बनवले. त्यालाच आता दर्गाह म्हटले जाते. इथे साधक आपल्या सहकाऱ्यांसह गुरुकडून म्हणजे मुर्शिदकडून अध्यात्मिक ज्ञान मिळवतो. ते अध्यात्मिक ज्ञान ज्याने तो ईश्वराला जाणून घेऊ शकेल आणि त्या अनुभूतीतून त्याला सच्चिदानंद मिळवता येईल.

या परमसुखाची अनुभूती मिळवण्यासाठी सुफी गुरु आपल्या शिष्यांना ‘तयार’ करत. त्यासाठी मुराकबा म्हणजे ध्यानधारणेच्या विविध विधी असत, वर उल्लेख केल्याप्रमाणे मेहफिल ए जिक्र म्हणजे नामस्मरणाची मैफिल होत असत. नामस्मरणासोबतच काही सुफिंच्या खानकाहमध्ये दर गुरुवारी ‘मेहफिल ए समा’चे ही आयोजन व्हायचे. भारतातील चिश्ती हा सर्वात मोठा सुफी सिलसिला म्हणजे परंपरा आहे. त्यामध्ये ‘मेहफिल ए समा’ला म्हणजे ईश्वराच्या नामस्मरणात संगीताचा वापर करण्याला मुभा होती. संगीताच्या आधारे ईश्वराशी लवकर तादात्म्य पावता येते या अनुभूतीतून कव्वालीसारखे ‘सुफी संगीत’ आकाराला आले आणि त्यांच्या मैफिलीतून सुफी साधकांची तंद्री लागत असे आणि काही काळासाठी का होईना त्यांना त्या परमसुखाची अनुभूती होत असे. या अनुभवाला ‘वज्द’ असे म्हटले जात असे.

एकूणच जीव ईश्वराशी एकरूप होणे यालाच सुफी परमसुख मानत. मात्र तिथपर्यंतचा प्रवासही आनंदी व्हावा, यात्रेतील टप्प्यांमध्ये सुखाची अनुभूती व्हावी यासाठी सुफी कायम प्रयत्नशील राहिले. त्यामुळेच केवळ पाच वेळच्या नमाजवरआणि ३० दिवसांच्या उपवासावरच न थांबता त्यांनी त्याहून अधिक साधना करत स्वतःला आणि ईश्वराला जाणून घेण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसते. सदाचाराची ही जद्दोजहद म्हणजे धडपडच त्यांना ‘सिरात ए मुस्तकीम’वर म्हणजे सदमार्गावर ठेवते. आणि कुराणच्या पहिल्याच श्लोकात म्हटल्याप्रमाणे या ‘सिरात ए मुस्तकीम’वर राहिल्यामुळे अंतिमत: त्यांच्यावर ईश्वराची कृपा होते. म्हणजेच या जगात आणि मृत्यूनंतरच्या जगातही त्यांना परमसुखाची अनुभूती होते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter