जगभरात विविध समुदायांमध्ये भीषण युद्धे सुरू असताना, हा आंतरधर्मीय 'चेंजमेकर' भारताच्या पुढील पिढीमध्ये शांततापूर्ण सहअस्तित्व वाढवत आहे. विविध धार्मिक पार्श्वभूमीतून आलेले कोलकात्याचे ओवैस असलम, धर्माधर्मांमध्ये आंतरधर्मीय संवाद निर्माण करण्यासाठी शांतपणे काम करत आहेत.
'इंडिया प्लुरॅलिझम फाउंडेशन'चे संस्थापक म्हणून, ते तरुण आणि महिलांमध्ये आंतरधर्मीय सामंजस्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. "संवादाच्या शक्तीवर माझा अतूट विश्वास आहे. सहानुभूती आणि शिक्षण हीच माझी शस्त्रे आहेत. माझी आजी ज्यू, आजोबा मुस्लिम आणि आईचे आजोबा ख्रिश्चन असल्याने, माझ्यामध्ये ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लामिक मुळे आहेत. मी माझ्या घरात सलोखा नांदताना पाहिला. याच गोष्टीने मला हे काम पुढे नेण्याची प्रेरणा दिली," असे असलम म्हणाले.
संस्थेचे राष्ट्रीय नेतृत्व कार्यक्रम परस्पर आदर आणि अहिंसक संवादाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यावर भर देतात. "नो माय रिलिजन" (माझा धर्म जाणून घ्या) हा उपक्रम विद्यार्थ्यांना हिंदू, इस्लाम, ज्यू, ख्रिश्चन, जैन आणि इतर विविध धर्मांबद्दल थेट अभ्यासक आणि विद्वानांकडून शिकण्यासाठी आमंत्रित करतो. यामुळे रूढीवादी कल्पनांना छेद मिळतो. प्रार्थनास्थळांवरील आणि धर्म-आधारित संघटनांमधील धार्मिक नेत्यांनाही कार्यशाळांद्वारे संवेदनशील केले जाते.
"सलाम शालोम" ही कार्यशाळा ज्यू-द्वेष आणि मुस्लिम-द्वेषाचा सामना करण्यासाठी नियमितपणे आयोजित केली जाते. गेल्या वर्षी, त्यांनी कोलकात्यातील सिनेगॉगला भेट देऊन रचनात्मक आंतरधर्मीय संवादाला सुरुवात केली. शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, त्यांनी आशा, वाढ आणि सामायिक जबाबदारीचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण केले.
गाझा आणि इस्रायलमधील सध्याच्या परिस्थितीवर ते म्हणतात की, मानवी जीवनाचा आदर केला गेला पाहिजे आणि प्रत्येकाने स्वेच्छेने सहअस्तित्व स्वीकारले पाहिजे. ते पुढे म्हणाले, "धर्माच्या नावावर इतके ध्रुवीकरण आणि रक्तपात पाहणे दुर्दैवी आहे. जीव वाचवण्याचे कालातीत ज्ञान ज्यू आणि इस्लाम दोन्ही धर्मांच्या केंद्रस्थानी आहे. पवित्र कुराण (५:३२) म्हणते - 'जर कोणी एक जीव वाचवला, तर जणू त्याने संपूर्ण मानवजातीचा जीव वाचवला.' आणि तालमूड सॅनहेड्रिन ३७ अ म्हणते - 'जो कोणी एक जीव वाचवतो, त्याला धर्मग्रंथानुसार संपूर्ण जग वाचवल्याचे मानले जाते'. आपण सर्व अब्राहम (अ.) यांची लेकरे आहोत. दोन्ही समाजांनी करुणा आणि न्यायाचा मूळ संदेश स्वीकारायला शिकले पाहिजे."
चहाच्या टपरीपासून ते शाळेच्या वर्गांपर्यंत, ते शांतता निर्माण करणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम घेऊन फिरताना दिसतात. हे फाउंडेशन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आंतरधर्मीय संबंध समृद्ध करण्यासाठी आणि परस्परसंबंधांची एक इकोसिस्टीम तयार करण्यासाठी शांतता सराव कार्यशाळा आयोजित करते.
आंतरधर्मीय 'अड्डा' आणि तळागाळातील परस्पर आदर
कोलकात्याच्या रस्त्यांवरून मौल्यवान शहाणपण मिळते. राजकारणी मंदिरे आणि मशिदींवरून वाद घालताना दिसतात, पण इथे 'अड्डा' किंवा संवादाने एक सकारात्मक वळण घेतले. असलम म्हणतात, "कोलकात्यातील खरा आंतरधर्मीय संवाद चहावाल्याच्या आणि चणेवाल्याच्या गाडीजवळच होतो. 'आंतरधर्मीय अड्डा: मिरची, मसाला आणि परस्पर आदर' यांसारखे सर्जनशील उपक्रम, शहरातील रस्त्यावरील विक्रेत्यांकडून शक्तिशाली संभाषणे टिपतात. येथे अन्न, श्रद्धा आणि मैत्री अनेकदा औपचारिक ठिकाणांपेक्षा अधिक सहजपणे एकत्र येतात."
महिलांना पुढे नेण्यासाठी पाठिंबा
"शांती सलाम" हा उपक्रम हिंदू आणि मुस्लिम तरुण, महिला आणि धार्मिक नेत्यांना एकत्र आणून सामायिक मूल्यांचा शोध घेतो. यामुळे दृष्टिकोन सहिष्णुतेकडून सक्रिय सहअस्तित्वाकडे वळतो. हे फाउंडेशन महिलांना तळागाळात आंतरधर्मीय प्रयत्नांचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम करते. त्यांना संवाद आणि संघर्ष परिवर्तनात सहभागी होण्यासाठी तयार करते. संस्थापकांचा विश्वास आहे, "भारतातील आंतरधर्मीय कार्य महिलांच्या नेतृत्वाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही - विशेषतः सामुदायिक स्तरावर."
भजन, बिस्मिल्ला आणि बंधुभाव: सामायिक अध्यात्मातून एकतेचा उत्सव
ओवैस असलम यांनी आंतरधर्मीय सलोख्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण समाजापुढे मांडले आहे. कोलकात्याच्या 'श्री सत्य साई सेवा केंद्रा'त हिंदू आणि मुस्लिम नेते एकता आणि सेवेचा संदेश साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. ते म्हणाले, "ही सभा भारताच्या बहुलवादी भावनेचा पुरावा होती. येथे धर्म सामायिक मानवतेद्वारे जोडले जातात. या कार्यक्रमात भावपूर्ण भजन आणि कुराण पठण झाले, ज्यामुळे परस्पर आदराचे एक शक्तिशाली वातावरण निर्माण झाले."
असलम यांना मिळालेली जागतिक ओळख
ओवैस असलम यांनी आंतरधर्मीय संबंधांमध्ये आपले कौशल्य वाढवण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. त्यांनी वुल्फ इन्स्टिट्यूट, केंब्रिज, केएआयसीआयआयडी, ऑक्सफर्ड इंटरफेथ आणि युनिव्हर्सिटी फॉर पीस येथे कार्यक्रम केले आहेत.
'इंडिया प्लुरॅलिझम फाउंडेशन' ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशन आणि 'रुबरू' यांच्या सहकार्याने वार्षिक 'आंतरधर्मीय युवा नेतृत्व कार्यक्रमा'ची व्याप्ती वाढवत आहे. यात दरवर्षी १०० हून अधिक तरुण 'चेंजमेकर्स'ना आंतरधर्मीय शिक्षणाला संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांशी (SDGs) जोडून, समुदायावर केंद्रित सामाजिक कृती प्रकल्प तयार करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते.
श्रद्धा ही संघर्षाचे नव्हे, तर लोकांना जोडण्याचे एक माध्यम बनावी, अशी जागा निर्माण करण्याचे ओवैस असलम यांचे ध्येय आहे. आणि त्यासाठी ते हे कार्य असेच पुढे सुरू ठेवणार आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -