जनसेवक ते 'प्रधान सेवक', मोदींनी कशी बदलली भारताची राजकीय दिशा?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जीवनप्रवासातून आणि राजकारणातून हे सिद्ध केले आहे की, संघर्ष आणि सेवेचे संस्कार कोणत्याही व्यक्तीला अशक्य वाटणाऱ्या उंचीवर पोहोचवू शकतात. १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातच्या लहानशा वडनगर शहरात जन्मलेल्या नरेंद्र दामोदरदास मोदी यांचे बालपण अत्यंत सामान्य परिस्थितीत गेले.

त्यांचे वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत, तर आई हीराबेन दुसऱ्यांच्या घरांमध्ये काम करत असत. याच परिस्थितीत वाढलेल्या नरेंद्र मोदी यांनी गरिबी, अभाव आणि संघर्षाला जीवनाचा भाग बनवून खूप काही शिकले. हेच अनुभव त्यांना भविष्यात करोडो भारतीयांची पीडा समजून घेण्याची ताकद देणारे ठरले.

आपल्या सुरुवातीच्या काळात मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे धाव घेतली आणि एक प्रचारक म्हणून संघटनेची शिस्त व राष्ट्रसेवेचे धडे गिरवले. आणीबाणीच्या काळात त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावली. १९७४ च्या गुजरात नवनिर्माण आंदोलनाने त्यांना राजकीय चेतना दिली आणि तेव्हाच त्यांनी कवितेच्या माध्यमातून तत्कालीन सत्तेला आव्हान दिले.

त्यांच्या लिहिलेल्या ओळी - "जेव्हा कर्तव्याने हाक दिली, तेव्हा पावले पुढे पडत गेली, उंबरठे हादरले, सिंहासने डळमळली" - या स्पष्ट करतात की, त्यांचा राजकीय दृष्टिकोन केवळ सत्ता मिळवण्याचा नव्हता, तर तो बदलाचे एक आवाहन होता.

२००१ मध्ये जेव्हा गुजरात भूकंपाने उद्ध्वस्त झाला, तेव्हा भाजपने नरेंद्र मोदी यांच्यावर राज्याचे नेतृत्व सोपवले. मुख्यमंत्री म्हणून, त्यांनी पुढील तेरा वर्षे गुजरातला विकासाच्या एका अशा मॉडेलशी जोडले, ज्याने राष्ट्रीय राजकारणालाही प्रभावित केले.

गुजरातचा विकास मॉडेल हळूहळू भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आणि नंतर राष्ट्रीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला. २०१४ मध्ये, नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत 'नामदार विरुद्ध कामगार' आणि 'प्रधान सेवक' ही ओळख घेऊन निवडणुकीच्या मैदानात प्रवेश केला. त्यांनी स्वतःला सत्तेचा मालक नव्हे, तर जनतेचा सेवक म्हटले आणि हीच भावना त्यांच्या राजकीय प्रवासाची सर्वात मोठी शिदोरी बनली.

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सत्तेला विशेषाधिकार नव्हे, तर सेवेची संधी म्हटले. यामुळेच त्यांनी पंतप्रधान निवासापासून ते संसदेपर्यंत, प्रत्येक ठिकाणी स्वतःला 'प्रधान सेवक' म्हणून संबोधले.

त्यांच्या कार्यकाळात अनेक अशा योजना सुरू झाल्या, ज्यांनी देशाचे राजकारण आणि समाजाचे नाते नव्या पद्धतीने परिभाषित केले. स्वच्छ भारत अभियानाला त्यांनी केवळ सरकारी योजना न बनवता, ते एक जनआंदोलन बनवले आणि करोडो लोकांना त्यात सामील केले.

उज्ज्वला योजनेने गरीब महिलांना धुरापासून मुक्ती दिली आणि दहा कोटींपेक्षा जास्त कुटुंबांपर्यंत गॅस कनेक्शन पोहोचले. जन धन योजनेने पन्नास कोटींपेक्षा जास्त भारतीयांना बँकिंग प्रणालीशी जोडले. आयुष्मान भारत योजनेने पन्नास कोटी लोकांना आरोग्य सुरक्षा दिली आणि तिला जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हटले गेले.

मोदी नेहमीच म्हणत राहिले की, ही कामे त्यांच्यामुळे नव्हे, तर जनता-जनार्दनाच्या आशीर्वादामुळे आणि सहभागामुळे शक्य झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाचा एक मानवी चेहरा त्यांच्या आई हीराबेन यांच्याशी जोडलेला आहे. मोदी अनेकदा सांगतात की, कशाप्रकारे त्यांच्या आईने दुसऱ्यांच्या घरांमध्ये धुणी-भांडी करून कुटुंबाचे पालनपोषण केले आणि त्याच संघर्षाने त्यांना प्रत्येक गरिबाचे दुःख समजण्याची शक्ती दिली. 

२०१५ मध्ये, अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान फेसबुक मुख्यालयात मार्क झुकरबर्ग यांनी त्यांना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले, तेव्हा मोदी भावूक झाले आणि अश्रूंसह त्यांनी आपल्या आईच्या संघर्षाची आठवण काढली. मुख्यमंत्री झाल्यावर आईने त्यांना फक्त एवढेच सांगितले होते - "बेटा, जे योग्य वाटेल ते कर, पण लाच घेऊ नकोस." हीच शिकवण त्यांच्या राजकीय जीवनाची सर्वात मोठी शिदोरी बनली.

मोदींच्या राजकीय प्रवासाची आणखी एक ओळख म्हणजे महिला सक्षमीकरण. त्यांनी २०१० मध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याची वकिली केली होती. पंतप्रधान झाल्यानंतर, त्यांनी 'नारी शक्ती वंदन अधिनियम' मंजूर केला, ज्याला महिला आरक्षण विधेयक म्हटले जाते. उज्ज्वला योजना आणि 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' अभियानानेही महिला सक्षमीकरणाला नवी गती दिली.

तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती हेही नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा महत्त्वाचा भाग राहिले आहेत. त्यांनी २०१० मध्येच म्हटले होते - "आयटी प्लस आयटी बरोबर आयटी, म्हणजेच इंडियन टॅलेंट प्लस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बरोबर इंडिया टुमॉरो." त्यांच्या नेतृत्वाखाली 'डिजिटल इंडिया' अभियान सुरू झाले आणि भारताने केवळ मोबाईल कनेक्टिव्हिटीच नव्हे, तर डिजिटल पेमेंट प्रणालीमध्येही जगाला चकित केले. आज भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि अंतराळ तंत्रज्ञानात आपली पकड मजबूत करत आहे.

राष्ट्रवाद आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर मोदींचे नेतृत्व नेहमीच स्पष्ट राहिले. त्यांनी स्पष्ट केले की, दहशतवादाला ना माफ केले जाईल, ना सहन केले जाईल. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर, भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले - " घरात घुसून मारू." २०२५ मध्ये 'ऑपरेशन सिंदूर'ने हे दाखवून दिले की, भारत आता दहशतवादाचे सूत्रधार आणि त्यांच्या समर्थकांना वेगवेगळे मानत नाही.

जागतिक मंचावर नरेंद्र मोदी यांनी भारताची प्रतिष्ठा नव्या उंचीवर पोहोचवली. त्यांनी योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आणि २१ जूनला 'आंतरराष्ट्रीय योग दिन' घोषित करवला. त्यांना सौदी अरेबियाचा 'शाह अब्दुलअजीज पुरस्कार', रशियाचा 'ऑर्डर ऑफ द होली एपोस्टल अँड्र्यू', फ्रान्सचा 'ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' यांसह अनेक देशांनी सर्वोच्च नागरी सन्मान दिले.

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आणि हा विजय भारतीय राजकारणातील एक अद्वितीय अध्याय ठरला. सलग तीन वेळा पूर्ण बहुमत मिळवून, त्यांनी हे सिद्ध केले की जनतेचा विश्वास केवळ त्यांच्या नेतृत्वावर नाही, तर त्यांच्या कामावर आणि दूरदृष्टीवरही आहे. त्यांनी जनतेला स्पष्ट संदेश दिला की, भारताचे भविष्य आत्मनिर्भरता आणि जागतिक नेतृत्वाच्या दिशेने निश्चित होईल.

नरेंद्र मोदी यांचा राजकीय प्रवास हे दर्शवतो की, राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्याचे साधन नाही, तर समाजाची सेवा करण्याची एक संधी आहे. गरीबीतून बाहेर पडून जागतिक मंचापर्यंत पोहोचलेल्या मोदींनी हे सिद्ध केले आहे की, जनतेशी थेट संवाद, योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम आणि आंतरराष्ट्रीय मंचावर दृढ उपस्थिती हीच कोणत्याही नेत्याची खरी ओळख असते.

आज नरेंद्र मोदी यांना लोक पंतप्रधानांपेक्षा अधिक 'प्रधान सेवक' मानतात. त्यांच्या राजकारणाने भारतीय लोकशाहीला ही शिकवण दिली आहे की, जो नेता जनतेतूनच येतो, तोच त्यांच्या मनातले ओळखून त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करू शकतो.