दानिश अली
अनेक वर्षे, 'पुलवामा' हे नाव भीती, संताप आणि शोकांतिकेचे प्रतीक बनले होते. दहशतवाद, दहशतवाद्यांचे मोठे अंत्यविधी आणि २०१९ चा आत्मघाती हल्ला, या नावाशी एक असा कलंक जोडला गेला होता, जो पुसणे जवळजवळ अशक्य वाटत होते. पण त्याच मातीतून आता आशा आणि जिद्दीची एक नवी कहाणी जन्माला येत आहे. या बदलाचे नेतृत्व करत आहेत मुगलपुरा गावातील ३० वर्षीय सामाजिक कार्यकर्ते मुदस्सिर डार. काश्मीरच्या तरुणांना फुटीरतावाद, ड्रग्ज आणि हिंसेच्या विळख्यातून बाहेर काढून शांतता आणि प्रगतीच्या मार्गावर आणणे, हे त्यांचे ध्येय आहे.
दहशतवादाचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुदस्सिर यांचा प्रवास त्यांच्या शालेय दिवसांमध्येच सुरू झाला होता, जेव्हा त्यांनी 'वर्ल्ड स्काऊट मूव्हमेंट'मध्ये प्रवेश केला. मानवतेच्या सेवेची शपथ घेऊन, त्यांनी त्यालाच आपल्या जीवनाचा उद्देश बनवले, ज्यासाठी त्यांना प्रतिष्ठित 'राष्ट्रपती पुरस्कार' आणि 'राज्यपाल पुरस्कार' यांनी सन्मानित करण्यात आले.
मुदस्सिर डार यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण २०१४ मध्ये मिळाले. विनाशकारी पुराने संपूर्ण खोऱ्याला उद्ध्वस्त केले होते. अनेक लोक असहाय्य होते. त्यावेळी मुदस्सिर यांनी स्वयंसेवकांना एकत्र केले आणि पुलवामा व शोपियानमध्ये मदतकार्याचे नेतृत्व केले. त्यांनी अन्न, ब्लँकेट्स आणि वैद्यकीय मदत पुरवली. मोठ्या स्तरावरील सामाजिक कार्याचा हा त्यांचा पहिला अनुभव होता, ज्यामुळे त्यांचा हा विश्वास अधिक दृढ झाला की, लोकांपर्यंत पोहोचण्यात तरुणांच्या नेतृत्वाखालील उपक्रम सरकारपेक्षाही जलद असू शकतात.
पण २०१९मध्ये पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्या झाला. त्यात ४४ सीआरपीएफ जवान शहीद झाले. या घटनेने त्यांच्या जीवनाची दिशा कायमची बदलून टाकली. हल्ल्यानंतर लगेचच दिल्लीत आलेला अनुभव सांगताना मुदस्सिर म्हणतात, ते आजारी चुलत भावासोबत होते. तेव्हा केवळ त्यांच्या आधार कार्डवर पुलवामाचा पत्ता असल्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये खोली देण्यास नकार देण्यात आला होता.
ते म्हणतात, "त्या क्षणाने मला कायमचे बदलून टाकले. जर काही लोकांनी दहशतवादाचा मार्ग निवडला असेल, तर संपूर्ण जिल्ह्याने तो कलंक का सहन करावा? त्या दिवशी मी प्रण केला की, मी जगाच्या नजरेत पुलवामाची प्रतिमा बदलूनच शांत बसेन."
हा प्रण लवकरच कृतीत बदलला. मुदस्सिर यांनी काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचा प्रभाव असलेल्या गावांमध्ये तरुणांचे समुपदेशन सुरू केले. दहशतवाद्यांच्या अंत्यविधीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या लेलहरसारख्या गावातल्या एका दुःखी तरुणाला त्यांनी दहशतवादात सामील होण्यापासून रोखले. चकमकीत आपल्या बहिणीला गमावल्यानंतर हा तरुण शस्त्र उचलण्याच्या तयारीत होता. मौलवी, मानसशास्त्रज्ञ आणि स्थानिक पोलिसांसोबत सततच्या संवादातून, मुदस्सिर यांनी त्याला समजावले की जिहाद म्हणजे जीव घेणे नव्हे, तर जीव वाचवणे आहे. आज तो तरुण जम्मू-काश्मीरच्या वीज विकास विभागात कार्यरत आहे.
मुदस्सिर अभिमानाने सांगतात की, आजवर त्यांनी १७ तरुणांना बंदूक उचलण्यापासून वाचवले आहे. ते निश्चयाने सांगतात, "कुराण सांगते की, एक जीव वाचवणे हे संपूर्ण मानवतेला वाचवण्यासारखे आहे. जर मी आयुष्यात दुसरे काही केले नाही, तरी हे पुरेसे आहे."
'रिकामे डोके सैतानाचे घर असते' हे ओळखून, मुदस्सिर यांनी खेळाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याचे ठरवले. लेलहर, करीमाबाद आणि गुलजारपोरा यांसारख्या गावांना एकेकाळी ‘ब्लॅकलिस्टेड’ क्षेत्र म्हटले जात होते. तिथे क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. ही तीच मैदाने होती, जिथे कधीकाळी दहशतवाद्यांचे अंत्यविधी निघत असत. आज ती उत्कंठा, हशा, स्पर्धा आणि एकतेची साक्षीदार बनली आहेत.
लेलहरमध्ये मुदस्सिर यांनी ऐतिहासिकदृष्ट्या पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकवण्याचा कार्यक्रम आयोजित केला. ते म्हणतात, "पहिल्यांदा, मैदानावर १२५ तिरंगे फडकावण्यात आले होते."भारताकडे एकेकाळी संशयाने पाहणारे हजारो गावकरी स्वेच्छेने पुढे आले होते. "त्यांना दाखवून द्यायचे होते की ते भारताचा भाग आहेत. आणि पुलवामा केवळ शोकांतिकेचे शीर्षक नाही, तर जिद्दीची एक कहाणी आहे."
दहशतवादाविरोधातील लढ्यासोबतच खोऱ्यातील तरुण आयुष्ये उध्वस्त करणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधातही मुदस्सिर लढाई लढत आहेत. त्यांनी तरुणांसाठी जागरूकता अभियान, युवा समुपदेशन सत्र आणि पुनर्वसनाची व्यवस्था केली आहे.
मुदस्सिर यांनी नेहमीच फुटीरतावाद आणि राष्ट्रविरोधी शक्तींचा सामना केला आहे. त्यांनी वेळोवेळी राष्ट्रीय वृत्तपत्रांमधील आपल्या लेखांमधून काश्मीरविषयी एक नवीन दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला आहे. दहशतवादाचे महिमंडण करणाऱ्या प्रचाराच्या विरोधात त्यांनी नवे नरेटिव्ह देण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या या कृतीने भीतीशिवाय जीवन जगू इच्छिणाऱ्या सामान्य काश्मिरींना सक्षम करण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
मुदस्सिर यांनी दहशतवादाचे बळी ठरलेल्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरु केलेल्या उपक्रमाचेही नेतृत्व केले. त्यांनी वैयक्तिकरित्या सुमारे ४०० कुटुंबांपर्यंत पोहोचून जवळपास १,००० पीडितांची ओळख पटवली. ही कुटुंबे दशकांपासून शांत होती, भीतीच्या छायेत जगत होती आणि स्वतःला एकटे समजत होती.
मुदस्सिर यांच्या अथक प्रयत्नांन फळ २९ जून २०२५ रोजी एका महत्त्वपूर्ण क्षणी मिळाले. दक्षिण काश्मीरच्या ९५ कुटुंबांनी अनंतनागमध्ये थेट नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत आपली व्यथा मांडली. "जेव्हा हे पिडीत नायब राज्यपालांनी दिलेल्या आश्वासनानंतर भावूक होऊन रडू लागले, तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता," मुदस्सिर सांगतात. यावेळी प्रशासनाने प्रत्येक पीडित कुटुंबापर्यंत पोहोचून, त्यांना न्याय, नोकरी आणि पुनर्वसन देण्याचे वचन दिले . यानंतर, जिल्ह्यांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आणि अनेक पीडितांच्या कुटुंबीयांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
मुदस्सिर यांचे टीकाकार, विशेषतः फुटीरतावादी समर्थक, त्यांना ‘मुखबिर’ (खबरी) म्हणतात, पण ते याकडे दुर्लक्ष करतात. " माझी चेष्टा करणारी मुले आता मला 'मुदस्सिर भैया' म्हणून माझ्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. तेव्हा योग्य मार्गावर असल्याची पावती मला मिळते."
मुदस्सिर यांचे मिशन अजून संपलेले नाही. ही लढाई मोठी असली तरी त्यांनी वाचवलेला प्रत्येक जीव आणि शांततेसाठी काढलेली प्रत्येक रॅली एका चांगल्या काश्मीरच्या दिशेने टाकलेले आश्वासक पाऊल आहे, हे मात्र खरे!