ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर मारून झेप पकडताना उपकर्णधार श्रेयस अय्यरच्या बरगड्यांना मोठी दुखापत झाली परिणामी अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला सध्या सिडनीतील एका रुग्णालयात उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
भारताने विजय मिळवलेल्या या सामन्यात अॅलेक्स कॅरीचा झेल श्रेयस अय्यरने बॅकवर्ड पॉइंट येऊन पाठीमागे धावत जात अप्रतिमरीत्या पकडला. झेल पकडताना तो बरगड्यांवर जोरात आपटला. श्रेयस अय्यर ड्रेसिंगरूममध्ये परतल्यावर बेशुद्ध पडला तसेच शरीरातील चेतनाही कमी होत चालली होती. त्यामुळे स्कॅन करण्यासाठी त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्या प्लीहाला दुखापत झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले.
जमिनीवर जोरात आपटल्यामुळे त्याच्या बरगड्या दुखावल्या. श्रेयसवर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे आणि सुधारणाही होत आहे, असे बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. बीसीसीआयची वैद्यकीय टीम सिडनी आणि भारतातील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क ठेवून आहे. त्याच्या या दुखापतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. भारतीय संघाचे डॉक्टर श्रेयससह रुग्णालयात आहेत आणि दररोजच्या प्रगतीचा आढावा घेत आहेत.
पुढील दोन ते सात दिवस श्रेयस निरीक्षणाखाली असेल. स्कॅन केल्यानंतर आलेल्या रिपोर्टसमध्ये श्रेयसच्या बरगड्यांचा आता अंतर्गत रक्तस्त्राव झाला हे समजताच त्याला तत्काळ अतिदक्षता विभागात हलवण्यात आले, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिली. श्रेयस अय्यर जवळपास तीन आठवडे क्रिकेटपासून दूर राहील, असे अगोदर सांगण्यात आले होते, परंतु सध्याचे दुखापतीचे स्वरूप पाहता त्याला तंदुरुस्तीसाठी अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.